चिमुकलीचा जागीच मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी
मुंबई : देशभरात मागील काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसागणित किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मुंबईतील बोरिवली (Mumbai Borivali Accident) परिसरात आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने (Best Bus) एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकली आपल्या आजोबा नवलकिशोर प्रमोद आंबिका प्रसाद सिंग यांच्यासोबत दुचाकीवरून जात होती. बोरिवली रोडवरील शिंपोली रोड इटोपिया टॉवर येथे दुचाकी आली असता, पाठीमागून आलेल्या बेस्ट बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकीला दूर फटफटत नेले. यामध्ये चिमुकलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. बोरिवली पोलिसांनी बेस्ट बस चालक सागर तुलसीदास कोळी (३७) याला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.