ठाणे : गेल्या महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे (Heat) अनेक शहरांना पाणीबाणीच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर पाणीसंकटाचे (Water crisis) सावट ओढावले होते. त्यामुळे प्रत्येक नागरिक मान्सूनची (Monsoon) आतूरतेने वाट पाहत होता. त्यातच जून महिन्याला सुरुवात होताच राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मात्र ऐन पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यांवर पाणीकपातीचे (Water Shortage) संकट सुरुच असल्याचे दिसून येते. अशातच दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणेकरांनाही पुन्हा एक दिवसासाठी पाणी येणार नसल्याने पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे परिसरातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच गुरुवार २७ जून रोजी सकाळी १२ ते शुक्रवार २८ जूनपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, तसेच पाणी भरून ठेवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
‘या’ भागात पाणीपुरवठा बंद
काटई नाका ते शीळ टाकी या बारवी गुरुत्व जलवाहिनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा, वागळे या भागातील पाणीपुरवठा ठप्प होईल. त्याचबरोबर प्रभावित झालेल्या प्रमुख भागांमध्ये दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील भाग वगळता), कळवा, रूपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक १, नेहरू नगर आणि कोलशेत याभागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने सांगितले.