फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक लोकांच्या संपर्कात येत असतो. अनेक प्रकारच्या स्वभावाचे लोकं आपल्याला भेटतात. काही लोकांमुळे प्रचंड मनस्ताप, मानसिक यातना सुद्धा आपण सहन करतो. समाजात, कुटुंबात वावरताना आपल्याला लोकांच्या वेगवेगळ्या विकृत वृत्तीचा त्रास होऊ नये, वेळीच चुकीची लोकं लक्षात यावीत म्हणून आजपर्यंत अनेक लेखामार्फत सर्वसामान्य लोकांना समजेल या शब्दांत मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीच्या स्वभाव, सवयी असलेले लोकं आणि त्यांच्यापासून काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगत आहोत. आज आपण machiavellianism ही मानस शास्त्रीय संकल्पना समजावून घेणार आहोत आणि अशी माणसं वेळेत ओळखून त्यांच्यापासून सावध आणि लांब राहणे किती आवश्यक आहे यावर प्रकाश झोत टाकणार आहोत. अशा स्वभावाच्या लोकांचा नैतिकतेशी अजिबात संबंध नसतो. स्वतःचा चुकीचा हेतू साध्य करण्यासाठी हे लोकं कोणत्याही थराला जातात आणि इतरांना सर्व बाबतीत गृहीत धरून त्यांना देखील चुकीच्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात.
सतत खोटे बोलणे, कोणत्याही मार्गाने विश्वासघात करणे, दिशाभूल करणे यामध्ये हे लोकं तरबेज असतात. या स्वभावाचे लोकं इतर सगळ्यांकडे फक्त साधन म्हणून पाहतात. त्यांचे विशिष्ट हेतू साध्य करण्यात कोण कसा आणि किती उपयुक्त आहे इतकंच त्यांना त्या व्यक्तीशी घेणं देणं असत. ज्या व्यक्ती त्यांचे चुकीचे हेतू साध्य करण्यात अडथळा ठरतात अथवा त्यांना विरोध करतात त्यांना हे लोकं आयुष्यातून लांब करतात, अपमानित करतात तसेच त्यांच्याबद्दल खूप बदनामी करून चुकीच्या आणि खोट्या गोष्टी पसरवतात. अशा लोकांमध्ये कोणतेही मूल्य, तत्त्व, नसतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांची मानसिकता असते की तत्त्व पाळणे, नितिमूल्य जतन करणे हा आपल्या प्रगतीतील अडथळा आहे. मूल्य पाळत बसलं तर आपली प्रगती, यश मंदावते त्यामुळे झपाट्याने हवं ते मिळवायचं असेल तर मूल्य, मर्यादा, नीतिमत्ता दूर ठेवणेच आवश्यक आहे.
Machiavellianism ही विकृत वृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना वेठीला धरणे, धारेवर धरणे, उन्माद करून, उद्रेक दाखवून इतरांना आपल्याला स्वीकारायला भाग पाडणे, आपल्या चुकीच्या वर्तनाला सगळ्यांनी होकार द्यावा यासाठी सतत प्रयत्न करत असते. अशा व्यक्ती स्वतःच्या भावनांचा वापर करून इतरांना घाबरवतात, धमकी देतात आणि जे हवं ते साध्य करून घेतात. उदाहरणार्थ कोणतीही व्यक्ती काही चुकीच करत असताना तिला जर कोणी सांगायचा प्रयत्न केला की, हे करू नको यातून तुला तसेच आम्हाला पण त्रास होऊ शकतो, हे योग्य नाही, बरोबर नाही तर अशा वेळी machiavellianism या विकृतीचा स्वभाव असलेली व्यक्ती स्वतःचा जीव देण्याची धमकी देईल किंवा मी कुठेही निघून जाईल, मी स्वतःच काहीही करून घेईल असा मोठा ड्रामा करून इतरांना घाबरवून सोडते जेणेकरून कोणी परत त्याला आडवायला जात नाही. या मनोवृत्तीचे लोकं त्यांना कोणी नैतिकता सांगायला लागलं, चांगला शिकवायला लागलं तर त्याला स्वतःपासून लांब ठेवतात पण कधीच थांबत नाहीत सुधारत नाहीत.
अशा लोकांना जेव्हा स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही जवळ करायचं असतं तेव्हा ते त्या व्यक्तीला भावनिक करून, स्वतःच सर्व श्रेय पणाला लावून खतपणी घालतात. त्यांची बाजू कितीही चुकीची असेल तरी ती पटवून देतात आणि एकदा समोरील व्यक्तीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला की त्याचा ते स्वतःच्या कामासाठी फायदा करून घेतात. स्वतःचा हेतू साध्य करणे एवढेच ध्येय असल्यामुळे हे लोकं भावनांशून्य असतात. अशा लोकांना कोणतंही मॉरल कंपास नसल्याने कोणी त्यांच्यावर कितीही प्रेम केले, विश्वास ठेवला, काळजी केली, कोणी त्यांच्यासाठी कितीही झुरलं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. या स्वभावाच्या व्यक्तीबद्दल असेही म्हणता येत नाही की, माणूस मनाने खूप चांगला आहे पण त्याच्यात काही वाईट गुण आहेत कारण machiavellianism व्यक्ती सर्वच बाबतीत चुकीची वागत असते.
एखादा दुर्गुण असलेल्या व्यक्तीला स्वीकारणे, समजावून घेणे शक्य होते पण machiavellianism वृत्तीची लोकं व्यवसायात, व्यावसायिक संबंधामध्ये, आर्थिक, व्यवहारात, कुटुंबात, समाजात, पती-पत्नीच्या, नात्यात, अन्य कोणत्याही नाते संबंधात पण फक्त स्वतःच्या पद्धतीनेच वागतात. हे लोकं स्वतःच्या सोईनुसार कोणाला पण चांगला, वाईट ठरवतात, त्यांना हवे तसे मत ते इतरांबद्दल तयार करून पसरवतात आणि अनेक कमकुवत मानसिकतेची लोकं त्याला बळी पडतात. आपल्या मर्यादेत सगळ्यांनी राहावं, सगळ्यांनी आपण जे करू तेच खरं मानून स्वीकारावं यासाठी हे लोकं इतरांना इमोशनली बांधून ठेवतात, इतरांची ते भावनिक पिळवणूक करतात. अशी लोकं हुशार खूप असतात पण स्वतःच्या हुशारीचा उपयोग ते चुकीचा हेतू साध्य करायला करतात. या लोकांच्या आजूबाजूला शक्यतो असेच लोकं टिकतात किंवा राहतात जे स्वतः पण तितकेच मतलबी स्वार्थी आणि फायद्यासाठी जवळ आलेले असतात. समोरचा तसा आहे, तर त्याची मन मर्जी सांभाळायची, त्याची अनैतिक कृत्यामध्ये साथ द्यायची, तो म्हणेल त्याला हाजी हाजी करायचं आणि त्याचा वापर पण आपल्यासाठी पुरेपूर करून घ्यायचा अशा मनोवृत्तीचे लोकं अशा ठिकाणी एकत्र येतात.
आपल्याला दैनंदिन आयुष्य जगत असताना अशा वृत्ती, असे स्वभाव वेळीच लक्षात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण कोणीही अशा लोकांना बदलू शकत नसतो त्यामुळे आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा आणि मानसिक खच्चीकरणं होण्यापेक्षा वेळीच दूर होणं केव्हाही उत्तम. ज्या ज्या वेळी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी, न आवडणाऱ्या गोष्टी आपल्यावर जबरदस्तीने लादण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, आपल्याला अनैतिक गोष्टी स्वीकारायला भाग पाडत असेल, चुकीच्या कामात सहभागी व्हायला सांगत असेल त्या त्या वेळी आपण सजग आणि सावध राहून त्या गोष्टी टाळणे, त्यापासून लांब राहणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्याला कोणी कितीही गोड बोलून, प्रेम दाखवून अनैतिक कामं करण्यात सहभागी करत असेल, चुकीच्या गोष्टीत साथ द्यायला भाग पाडण्यासाठी आपल्याला इमोशनल केलं जात असेल तर त्या ठिकाणी स्पष्ट नकार देणे आवश्यक आहे. अशा प्रवृत्तीच्या माणसांना आपण बदलू तर शकत नाही, ते कोणाचं ऐकून कधीही सुधारत नाहीत, स्वतःची चूक ते स्वीकारत नाहीत त्यामुळे आपण कुठल्याही वाईट कृत्यात सहभागी होणार नाही, यासाठी अशा व्यक्तींपासून स्वतःला लांब ठेवणं हाच एकमेव उपाय असतो. आपण जर भावनिक होऊन, प्रेम, नाते, जवळीकता, माणुसकी, आपुलकी, सहानुभूती या भावनांमुळे अशा लोकांना, त्यांच्या मनाला सांभाळत बसलो, तर ते स्वतःच नुकसान करत असतानाच आपलं पण नुकसान नक्कीच करतील. एखादी व्यक्ती चुकते आहे, नीतिमत्ता सोडून वागते आहे. पाहिल्यावर त्याला योग्य सल्ला जरूर द्यावा पण तो जर आपल्यालाच भावनिक करून त्याचा चुकीचा हेतू साध्य करत असेल, तर वेळेत जागे व्हावे.
[email protected]