मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८ मधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला.
रोहित शर्माची दमदार खेळी आणि स्पिनर्सची कमाल यामुळेच भारताला हा विजय साकारता आला. भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. अर्शदीप सिंहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
याआधी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहितने तडाखेबंद खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह ९२ धावा तडकावल्या.
विराट कोहली या सामन्यात पुन्हा शून्यावर बाद झाला. त्याची शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ. ऋषभ पंतही १५ धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ बॉलमध्ये ३१ धावांची पटापट खेळी केली. तर शिवम दुबेने २२ बॉलमध्ये २८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १७ बॉलमध्ये नाबाद २७ धावांची खेळी केली.
१४व्या षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १५५ इतकी होती. मात्र शेवटच्या ६ षटकांत केवळ ५० धावाच बनू शकल्या.
भारताच्या या विजयासह आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. २७ जूनला हा सामना रंगणार आहे.