Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : ‘दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य!

Eknath Shinde : ‘दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य!

मुख्यमंत्री धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दुपारी घाटकोपर भागातील असाल्फ व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली. त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. यामध्ये त्यांनी धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती देत मुंबईला दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त शहर करण्याचे धैर्य हाती घेतल्याचे सांगितले.

पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागल्याने सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनांना विराम देण्यासाठी म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

त्याचबरोबर मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, हे प्राधान्य असून अशा घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे लक्ष्य आहे. याचबरोबर मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त देविदास क्षीरसागर इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई मध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी येथील सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आत मध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे. दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्याचपुढे ते म्हणाले की, २००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली कारण, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुलांनी स्वागत

स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धीका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे.हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -