Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजएक प्रसन्न अनुभव

एक प्रसन्न अनुभव

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

बघता बघता वर्ष सरलं. ‘गुलदस्ता’ या सदराखाली ४ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘सेतू बांधा’ या लेखापासून सुरू झालेला प्रवास आज ३१ डिसेंबर २०२३ रोजीपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. सदर काळात या लेखन प्रवासात अनेक प्रसन्न अनुभव आले. गतवर्षाचे सिंहावलोकन करता करता आता नव्या वर्षात ‘जरा थांबू या!’ असे म्हणून वाचकांचा निरोप घेत आहे. त्यानिमित्त या प्रसन्न प्रवासाचा थोडक्यात लेखाजोखा…

नमस्कार! हां हां म्हणता वर्ष सरलं! भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने उलटता उलटता कॅलेंडरच बदलायची वेळ आली. नवे वर्ष, नव्या संकल्पना त्या आधी गतवर्षाचे सिंहावलोकन!

४ नोव्हेंबर २०२१, ‘सेतू बांधा’ या लेखापासून मी अनेक विषयांवर लेखन करीत आपल्याशी सेतू बांधला. दुसऱ्याच लेखात आनंद घ्या, आनंद द्या! असे म्हणत, विशेष माहिती पुरवली. आज ३१ डिसेंबर २०२३! गेली दोन वर्षं दोन महिने मी आपणाशी लेखनातून संवाद साधत आहे. प्रत्येक सदराचा वाचक वर्ग ठरलेला असतो. आतुरतेनं वाट पाहत असतो. हे मला प्रत्येक लेखावर येणाऱ्या असंख्य प्रतिक्रियांतून समजले.

काही वाचकांच्या प्रतिक्रिया –
१. दोन्ही लेख आवडले. आपल्या हातात लेखणी आहे. तिचा उपयोग अशा प्रकारे लोकजागृतीसाठी करावा हीच एक अपेक्षा. २. परीक्षा हे माणसाला मिळालेलं आव्हान आहे हे मनोमन पटले. या लेखातील प्रत्येक वाक्य मनावर ठसणारे आहे. ३. तू लिहितेस म्हणून आम्हाला चालना मिळते. ४. नॉलेजेबल आर्टिकल, व्हेरी रेअर इन्फॉरमेशन. ५. स्वतःला घडवा, एकाकीपणा, सत्याला सामोरे जा हे सद्यस्थितीवर अचूक व सर्वात सुंदर लेख. ६. लेखात तुझ्यावरील संस्कार डोकावतात. ७. लेखनातला प्रामाणिकपणा, मेहनत पदोपदी जाणवते. ८. इन्फॉर्मेटिव्ह, वर्थ रीडिंग. ९. अप्रतिम शब्दांत संयम ठेवून लेख लिहिला. १०. डॉ. राजा दांडेकर, तुमचा वाचनप्रेरणा लेख शाळेत परिपाठाला बोधपर वाचनासाठी पाठविला. ११. सानेगुरुजींच्या लेखाला अनेकांप्रमाणे मोहन गद्रे यांचा ई-मेल. १२. आता पुस्तक काढा. नेहा मेस्त्री माझी विद्यार्थिनी, कोलाजमधील माझ्या लेखाचा नियमितपणे सर्वात प्रथम स्क्रीनशॉट काढून मला पाठवीत असे.

या प्रतिक्रिया मला ऊर्जा व प्रोत्साहन देत होत्या. साऱ्यांची मी कृतज्ञ आहे. नवनवे विषय वाचताना मी दोन वर्षे पूर्ण व्यस्त होते. असा हा दोन वर्षं, दोन महिन्यांचा प्रसन्न अनुभव!

आयुष्य हे नदीसारखे प्रवाही असते. एका कामातून दुसरे काम हाती येते. अनुभव खूप शिकवतो. आपली झेप समजते. वृत्तपत्र, दिवाळी अंकांतून अधूनमधून लेखन, बाहेर व्याख्यान, प्रमुख पाहुणे, परीक्षक, कोरोना काळांत स्वलेखाचे स्वतःच्या यूट्यूबवर वाचन, छोट्यांसाठी गोष्टीचा ऑडिओ, त्यानंतर हे स्तंभलेखन! आपणच आपल्याला ओव्हरटेक करतो.

२०२१ च्या दिवाळीच्या आधी प्रहार वृत्तपत्राचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर सरांचा, प्रहारच्या रविवारच्या पुरवणीत लिहिण्यासंबंधी फोन आला. दर रविवारी म्हटल्यावर मी हबकले. पण यांनी विश्वास दाखविला, जोर धरला,‘तू लिहू शकतेस’! आलेली संधी सोडू नकोस आणि परमेश्वराची साथ होती! मुख्यतः खांडेकर सरांनी कोणत्याही विषयावर लिहिण्याची मोकळीक दिली होती. त्यामुळे सोपे गेले. म्हणूनच सदरचे नाव ‘गुलदस्ता’! कई प्रकारके चुने हुए फूल, पान और कलियोंको सजाकर बांधा हुआ ये ‘गुलदस्ता’!

गुलदस्तामधून अनेक विषयांवर मला व्यक्त होता आले. एक वर्षानंतरही खांडेकर सरांनी सदर चालू ठेवा असे सुचविले. मला सरांनी पुन्हा संधी दिली. जबाबदारीची जाणीव होती. पुन्हा मला स्वतःला सिद्ध करायचे होते. आज तेही वर्ष पूर्ण झाले आणि मीच निर्णय घेतला, जरा थांबू या! थोडी विश्रांती म्हणजे कामात बदल. थोडं फिरायचंय, जोडीला वाचन, लेखन आहेच. निसर्गालाही रिकामंपण आवडत नाही.

लिहिण्याच्या निमित्ताने समाजाला घडविणारे, दिशा दाखविणाऱ्या अनेक महान व्यक्तींचे जीवनातील प्रसंग, त्यावेळी त्यांनी केलेला विचार समजला. ज्या ज्या व्यक्ती मोठ्या होऊन गेल्या त्यांच्या यशाची सुरुवात एखाद्या छोट्या कामानेच होते. जगातल्या ७५% महान व्यक्ती या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या. टॉलस्टॅाय, अब्राहम लिंकन, चार्ली चाप्लिन, डॉ. कलाम. फक्त आपण जे काही काम करत आहोत ते नक्कीच महत्त्वाचे काम आहे अशी धारणा हवी. एक दिवस तुमचं कामच मोठं कार्य बनून जगासमोर येतं. पंजाब-चंदिगडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रॉक गार्डन हे दिवसभर सायकलवर फिरणाऱ्या नेकचंद या सामान्य माणसाने बनविले होते.

दोन वर्षांच्या कालावधीत १००च्या वर झालेल्या लेखात अनेक विषय हाताळले. मुख्यतः रविवारच्या दिवशीच किंवा त्या आठवड्यात येणाऱ्या दिन विशेषावर लेखन करताना त्याचा इतिहास, नावाची उत्पत्ती, महत्त्व आणि आज त्यावर समाजात चाललेले काम याकडे व्यापकतेने पाहिले. फादर्स डे म्हणता देशाचे, विज्ञानाचे, चित्रपटाचे या साऱ्यांचा समावेश केला. निराशेच्या गर्तेत युवकांनी जिद्दीने जगावं यासाठी, धाडस, संघर्ष असे लेख विशेषत्वाने आवडले. सणांच्या लेखात जुन्या व नव्या संस्कृतीचा मेळ घालून नव्या विचाराचीही जोड दिली. वटपौर्णिमा (एक सावित्री वडाभोवती, दुसरी सावित्री घराबाहेर शिक्षणासाठी), मकर संक्रांत (सकारात्मक बोला, ब्लॅक ब्युटी), गुढी पाडवा : (सुंदर ते वेचावे), शारदीय नवरात्रांत स्त्रियांचा नेव्हीत प्रवेश. सणासोबत जीवन साजरे करायला शिका. लोक काय म्हणतील, आरसा, श्रावण, एकादशी… साऱ्या लेखांची मांडणी गोष्टीतून केली.

आपण समाजापासून वेगळे राहू शकत नाही तसेच पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचारांचीच गरज असते हे भान मला होते. कुठेही पोकळ गप्पा किंवा फक्त उपदेश दिला नाही. मला आयुष्याचा जो अर्थ समजला तो मांडला. लेखातील उदाहरणे पूर्णतः वास्तववादी, दाखले व गोष्टी वाचलेल्या. लेख मार्गदर्शक ठरावा, लेख वाचल्यावर वाचकाला काहीतरी मिळायला हवं असा मनांत नेहमी आग्रह होता. लिहिता लिहिता आपला ठसा उमटतोच. मुख्यतः स्वतःला समाधान मिळणे महत्त्वाचं!
खांडेकर सरांकडून दोन-तीनदा ऐकले होते, ‘तुमचा लेख पुरवणीच्या (कोलाज) पहिल्या पानांवर असतो.’ लेखाचे शीर्षक, विषयाला अनुरूप असे चित्र, त्या बाजूला ठळक अक्षरांत त्या विषयाचे सार, या साऱ्यासाठी सरांचे, कोलाज टीमचे, प्रहार समूहातील सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आपणामुळेच मी हा प्रसन्न अनुभव घेऊ शकले.

समारोपासाठी उपनिषदातील एक रूपक कथा – एका वृक्षाच्या खालच्या फांदीवर माझे मजेत दिवस चालले होते. सहज वर नजर गेली. अगदी शेंड्यावर एक इवलासा पक्षी साद घालत होता. ‘ये’. मी लक्ष दिले नाही. काही वर्षांनी या सर्वाला विटलो. वरचा पक्षी ‘ये’ म्हणतच होता. धीर करून आणखीन वरची फांदी गाठली. पहिल्यांदा खूप छान वाटले. नंतर पुन्हा तेच कपट, तीच स्पर्धा. शेंड्यावरचा पक्षी म्हणाला, ‘ये’. जीवाच्या कराराने पंख फडफडावले. शेंड्यावर पोहोचलो. तो वरचा पक्षी कुठे दिसेना. मी एकटाच तर होतो. मग लक्षात आले, तो वरचा पक्षी म्हणजे माझ्यातील higherself ‘सत्त्वतेज’. तेच मला आयुष्यभर ‘ये ’ म्हणत होते.

सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! पुन्हा भेटू…

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -