Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकै. भैयाजी काणे मेघालय विद्यार्थी कल्याण प्रकल्प, सांगली

कै. भैयाजी काणे मेघालय विद्यार्थी कल्याण प्रकल्प, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी

पूर्वोत्तर भारत म्हणजेच ‘आपले पूर्वांचल.’ पूर्वांचलाला समृद्ध, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे; परंतु उर्वरित भारतापासून ईशान्येकडील प्रदेश दूर असल्यामुळे तसेच अनेक इतर देशांच्या सीमारेषेला लागून असल्यामुळे या राज्यांचे प्रश्न काही वेगळे आहेत. इंग्रज, ख्रिश्चन मिशनरी, इस्लामी आक्रमणे, पूर्वांचलातील पर्यटन स्थळे, लाचित बडफूकन, चित्र्यांग नोंगबाह, उ. तिरतसिंग सारखे स्वातंत्र्य सेनानी आणि शंकरदेव व त्यांचा वैष्णव संप्रदाय या सर्वांची माहिती  अनेकांना असतेच असे नाही. ईशान्यकडच्या देशांजवळ आंतरराष्ट्रीय सीमा सच्छिद्र होती पण ती अलीकडच्या सरकारातील पुढाकारामुळे बऱ्यापैकी बंदिस्त करण्यात आली आहे, पण आतापर्यंत अशा सच्छिद्र सीमेतून  जनजीवनामध्ये अस्थिरता निर्माण झाली.

शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने पूर्वोत्तर भारतातील काही नागरिक धर्मांतरणाला बळी पडले. विशेषतः त्यांचे चेहरे हे मंगोलियन पद्धतीचे असल्यामुळे आपल्या देशातील अन्य राज्यातील नागरिकांच्या चेहऱ्याशी  मिळते-जुळते नसतात व त्यामुळे ते चिनी आहेत, तिबेटी आहेत, नेपाळी आहेत अशा प्रकारचा अपप्रचार  केला गेला. या  अशा परिस्थितीचा मोठा भावनिक परिणाम संवेदनशील व्यक्तींवर झाला नाही तरच नवल. अशीच एक व्यक्ती होती ती म्हणजे संघ कार्यकर्ते भैयाजी काणे गुरुजी, व्यवसायाने शिक्षक होते पण पूर्वोत्तर राज्यांचा अभ्यास करत होते. संवेदनशील असल्याने त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल? याचा विचार सुरू केला व त्यातून त्यांना अशी कल्पना सुचली की तिथल्या मुलांना शिक्षणासाठी इथे आणावे व  त्यांना उर्वरित भारतामध्ये समाविष्ट होण्याच निमित्त मिळावं. उर्वरित भारतातील लोकजीवन, संस्कृती याची जाणीव व्हावी. पण हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं.

तिथल्या मुलांच्या पालकांचा विश्वास प्राप्त करणे आणि त्यांनाही इथे सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आव्हानात्मक काम होतं.  अशी मुले तिथून कशी आणता येतील? म्हणून त्यांनी त्यांचा  शिष्य जयवंत कोंडविलकर यांची निवड केली. त्याच्या आई-वडिलांची समजूत घातली व त्याला घेऊन ते मणिपूरला थेट रवाना झाले. मणिपूर इथल्या मुक्कामात त्यांनी तिथल्या पालकांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांना आपली कल्पना सांगितली, पण तिथल्या पालकांना पटवणे सोपं नव्हतं. ते थोडेच मुलांना लगेच पाठवून देणार होते. म्हणून मग त्यांनी जयवंत कोंडविलकर या आपल्या विद्यार्थ्याला त्यांच्याकडे सुपूर्द केले व त्या बदल्यात त्यांनी तीन विद्यार्थी घेऊन महाराष्ट्राकडे प्रयाण केले व सांगलीचे जुने ऋणानुबंध असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना घेऊन सांगली मुक्कामी येण्याचे निश्चित केले व अशा प्रकारे सांगलीमध्ये पहिल्यांदाच पूर्वांचलातील विद्यार्थी येऊन राहू लागले.

सुरुवातीला कोणा कार्यकर्त्याच्या घरी त्यांची सोय करण्यात आली. त्यानंतर सांगली मुक्कामी वसतिगृहाची सुरुवात झाली. यासाठी भैयाजी काणे यांनी असंख्य प्रयत्न आणि अपार कष्ट, अपार अवहेलना, जीवाला धोका अशा अनेक समस्यांवर मात करत या त्यांच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. या कामाचा आवाका खूप होता. त्यामुळे यानंतर सेवा भारती व जनकल्याण समितीने यात लक्ष घातले व परिणाम स्वरूप सध्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आठ वसतिगृहे आहेत. त्यापैकी चार मुलींची व चार मुलांची असून सांगलीमध्ये मेघालय या राज्यातील विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह आहे. सांगलीमधील या वसतिगृहाची सुरुवात १९७८ साली झाली. सुरुवातीला केवळ तीन विद्यार्थी होते. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली. २००१ साली हा प्रकल्प सांगलीच्या राजवाड्यात मुख्य कार्यालयात सुरू झाला होता. नंतर तो २०१५ सालात सांगलीच्या अभय नगरमध्ये स्थानांतरित झाला.

अभय नगरमधील आता सध्या जिथे प्रकल्प आहे, तो प्लॉट  पेंढारकर यांनी प्रदान केला  आणि  दुमजली इमारत ही समाजातील  दानशुरांच्या सहकार्यातून उभी राहिली आहे. त्यातील प्रामुख्याने टीबी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन तसेच खासदार प्रकाश जावडेकर यांचा खासदार निधी यातून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या वसतिगृहामध्ये पाचवीपासूनच्या मेघालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इथे बारावीपर्यंतचे शिक्षण केले जाते. बारावीनंतरचे शिक्षण पुण्यातील विद्यार्थी वसतिगृहात केले जाते. केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे तर भारतीय संस्कृती, राष्ट्रीय विचार देण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात. लौकिक शिक्षणाबरोबरच त्यांना आपला भारत देश आणि त्याची संस्कृती यासंबंधीचेही संस्कार कळावे हा त्यामागचा उद्देश असतो.

मेघालयातून आलेल्या मुलांना सुरुवातीला खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. या विद्यार्थ्यांच्या भाषेची अडचण असते तसेच तिथला आहारही खूप वेगळा असतो. सांगलीतील भोजनाची चव आणि वातावरण रुळायला थोडा वेळ लागतो. पण मुले रुळतात व नंतर पुढच्या वर्षी यायला मुलांना प्रोत्साहनही देतात. त्यांच्या शिक्षणाची सोय विश्रामबाग येथील कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला इथे केली जाते. तिथे पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण होते. त्यानंतर त्यांना वाणिज्य, शास्त्र तसेच कला व इतर कौशल्य कोर्सेस यांना प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर त्यांना मराठी, हिंदी या भाषेचे शिक्षणही दिले जाते. वसतिगृहामध्ये संगणकाचेही शिक्षण दिले जाते. सध्या सांगली इथल्या वसतिगृहामध्ये २३ विद्यार्थी आहेत.  आतापर्यंत अनेक  जण चांगले विद्यार्थी घडून पुन्हा तिथे जाऊन चांगली कामे करत आहेत. रिवानिया भोई नावाचा माजी विद्यार्थी आर्मीमध्ये देशसेवेसाठी रुजू झाला आहे.

वसतिगृहामध्ये संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी निरलस वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आपला वेळ देत असतात. इथे सरिता व महेंद्र भगत हे दोघे पूर्णकालिक व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. आरोग्य, निवास, शिक्षण, भोजन, संस्कार, निधी अशा प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र व्यक्ती कार्य करत आहेत. त्यामुळेच तीन हजार किलोमीटर दूरवरून हे विद्यार्थी सांगली येथे शिकायला येत आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या विश्वासाला वसतिगृह पुरेपूर उतरले आहे आणि म्हणूनच दरवर्षी मेघालयमधले अनेक विद्यार्थी सांगली इथे यायला उत्सुक असतात. इतक्या वर्षांच्या निर्माण झालेल्या विश्वासार्हतेवर, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामावर, उद्देशाच्या सच्चेपणावर, निष्ठेवर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर पालक आपल्या पाल्याला  सांगलीला पाठवून देतात. वर्षातून एकदा या विद्यार्थ्यांना मेघालयमध्ये त्यांच्या घरी  कार्यकर्ते नेऊन सोडतात व पुन्हा घेऊन येतात. यासाठी कार्यकर्त्यांचे या लांबच्या प्रवासासाठीचे नियोजन चार महिने आधी तयार असते. म्हणजेच त्यांना त्यांच्या गावी नेण्याची, आणण्याची व्यवस्था ही वसतिगृहातर्फे केली जाते. मुलांचा राहण्या, जेवण्याचा तसेच शैक्षणिक शुल्क, गणवेश, कपडे, शैक्षणिक साहित्य या सर्वांचा खर्च, मुलांना शाळेत सोडण्यासाठीच्या वाहनाचा खर्च, आरोग्य, देखभाल, असा सर्व खर्च वसतिगृहातर्फे केला जातो. मुलांना सांगली व्यतिरिक्त इतरही प्रदेश पाहायला मिळावा म्हणून वर्षातून एकदा सहलीला नेले जाते. एक किंवा दोन चित्रपट दाखवले जातात.

या प्रकल्पातून अनेक चांगले विद्यार्थी घडले असून पुन्हा मेघालयात जाऊन ते सुस्थापित  होतात व त्यामुळे तिथले वातावरण हळूहळू सुधारताना  दिसून येत आहे. अनुकूलता आली आहे. हा भारत देश माझा आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना रुजवण्यासाठीचा प्रयत्न थोडाफार यशस्वी होताना दिसत आहे. सध्या केंद्र शासनाने ईशान्य भारताच्या विकासासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण जाहीर केले आहे. याच्याच जोडीला ईशान्य भारतातील राज्ये आणि अन्य राज्ये यांच्यात सामाजिक अभिसरण घडून येऊन नागरिकांत बंधुत्वाचे, आपुलकीचे, मैत्रीचे नाते निर्माण होण्याची गरज आहे. हे काम दीर्घकाळचे आहे आणि ते दरवर्षी नवीन मुलांना अॅडमिशन देऊन सांगली येथील मेघालय वसतिगृह गेली ४५ वर्षे सुरू ठेवले आहे.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -