पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर बाब असून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहूल गांधी यांच्यावर केली आहे.
सोमवारी संसदीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात विविध मुद्द्यांवरुन केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि शंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेस सध्या अभय मुद्रेमध्ये आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हिंसाचारात गुंतल्याची टीकाही केली.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावळी स्वतः पंतप्रधान मोदी त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि राहूल गांधी यांच्यावर टीका केली. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. या सगळ्यानंतर आता राहुल गांधींवर चौफेर टीका सुरु झाली आहे.
अमित शहांनी केली माफीची मागणी
राहुल गांधींच्या भाषणाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, इस्लाममधील अभय मुद्रेबाबत त्यांनी इस्लामच्या तज्ज्ञांचे मत घ्यावे. गुरू नानक यांच्या अभय मुद्रेबाबत गुरुद्वारा समितीचे मतही घ्यावे. अभयबद्दल बोलणाऱ्या लोकांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला घाबरवले होते. आणीबाणीच्या काळात दिल्लीत दिवसाढवळ्या हजारो शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणाबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाचे नेते आहेत. माझी संस्कृती, मूल्ये हे सांगतात की, वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक जीवनात आणि या आसनावरही, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना वाकून नमस्कार करा आणि आवश्यक असल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करा आणि सारख्याच वयाचे आहेत, त्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. – ओम बिर्ला, लोकसभा अध्यक्ष
आयुष्यभर जबाबदारी न घेता सत्ता उपभोगणाऱ्या राहुल गांधींनी आज पहिल्यांदाच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही अत्यंत बेजबाबदार विधान केले आहे. अध्यक्षपदावर त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि अत्यंत निषेधार्ह आहे. अयोध्येतील नुकसानभरपाईबाबत राहुल गांधी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी बोलले. ४२१५ दुकानदारांना १२५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात आली आहे. याशिवाय लोकसहभागातून दुकानेही स्थलांतरित करण्यात आली आहेत. – आश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री
लोकसभेतील अत्यंत बेजबाबदार भाषणाद्वारे विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदार पदाची बदनामी केली असून त्यांनी असत्य दावे केले. गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात सभापती बिर्ला यांना गांधींनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली. कारण ते दिशाभूल करणारे विधान करून सुटू शकत नाहीत. – केंद्रीय मंत्री, किरेन रिजिजू
भारताचा मूळ आत्मा हिंदू आहे. हिंदू सहिष्णुता, उदारता आणि कृतज्ञतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणात आकंठ बुडालेले आणि स्वतःला एक्सीडेंटल हिंदू म्हणवणाऱ्यांच्या युवराजांना ही बाब कशी काय समजणार? राहुल गांधी यांनी जगभरातील कोट्यवधी हिंदू लोकांची माफी मागायला हवी. तुम्ही एका समुदायाला नाही, तर भारताच्या आत्म्यावर हल्लाबोल केला आहे. – योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
राहुल गांधींनी लोकसभेत हिंदूंचा अपमान केला आहे. सगळे हिंदू हिंसा करतात हे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सगळ्या हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. राहुल गांधींनी हे त्यांचे वक्तव्य मागे घेतले पाहिजे. लोकसभेत त्यांनी सगळ्या हिंदू समाजाची माफी त्यांनी मागितली पाहिजे. राहुल गांधींचे विधान आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे. संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला आहे. लोकसभेत त्यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणणं हा अपमान आहे. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य