Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनमी स्वत:ला शोधताना

मी स्वत:ला शोधताना

माेरपीस: पूजा काळे

तुझ्या माझ्यातला ‘मी’चा प्रवास म्हणजे सुख-दुःखातल्या वाटेवरचा विलक्षण ध्यास. वलयांकित अशा खाच-खळग्यातल्या या प्रवासात, जरी पडले, तरी उठून उभं राहण्याचा अगम्य, इच्छाशक्तीचा सहवास. आपल्या परीनं जगण्याला नवा अर्थ देणारा अहोरात्र वनवास. तुझं, माझं असणं म्हणजे स्वतःचा स्वत:नेचं घेतलेला अवघा शोध. मी स्वतःला शोधताना, अंती एकची उरते. भाववेड्या स्वप्नासंगे, राती एकली निजते. हे एकाकीपण असं रातीलाचं का बरं यावं? अशातचं या घनघोर, काळभोर रातीला जागं करून, बैचेन करण्याइतपतं या स्वप्नांना चैन पडत नसावं. म्हणूनचं मनावर स्वार होत ही स्वप्न रात्रीला त्यायोगे माझ्यातल्या ‘मी’ला हैराण करतात. मग ‘मी’ अशी चाचपडत उठते. हे सत्य की स्वप्न, कळेस्तोवर उजाडलेलं असतं भकास. नदीच्या प्रवाहाला धार लागते. पाणी अधिक खळखळतं.

शीतल झुळकीवर स्वार होत वारा झाडांशी सलगी करतो. सोळावं वरीस असल्याच्या आवेगानं हसरा पारीजात मृत्तिका रंगात सरमिसळून घोळवून घेतो स्वत:ला. दूरवर पक्षांचा किलबिलाट, मोराचा केकारव, कोकिळेची कुहूकुहू बोली सर्वार्थानं अंगावर रोमांच उभं करायला आणि काय काय हवं असत? निसर्गाच्या सानिध्यात रमणाऱ्या देहाला उण्याची दुनिया सतावत नसली, तरी रात्रीच्या एकांतातलं बेभरवशासारखं जगणं, क्लेषदायक असतं. काळोख्या रात्री झोपेला चाळवून स्वत:ला हवी तशी फुलविण्याची आस धरणारी स्वप्न जागी करतात. महच्त्वाकांक्षा राक्षसी असू शकतात एखादवेळी; पण स्वप्न राक्षसी नसतात. स्वप्न खरी-खुरी, शांत-अल्लड, वेल्हाळ-खोडकर असतात.

भाकरीसोबत स्वप्नं या दोन गोष्टींची परीपूर्तता यावर अवलंबून असलेली माणसं आहोत आपण. तेव्हा मनासारखं घडलं की, स्वप्नील दुनियेत भटकंती करतो स्वच्छंदपणे. हा अनुभव वारंवार घेत असताना, मऊशार जांबूनी, गुलाबी रजईतला झोपेचा अंमल डोळ्यावर असतो. मनाच्या नकळत उसवलेला धागा सलतो कुठ तरी. मी लगबगीनं उठते, पाण्याचा भपकारा मारते तोंडावर. तांबडं फुटावयास अवधी असतो एव्हाना. रीतसर जुन्या-नव्या गाण्यांचा अल्बम काढते. पसाभर भिजलेला मनातला पाऊस गपगार असतो. सरींवर सरी कोसळत असतात अंगणात. सूर छेदणाऱ्या रागीणी आशा, लता बेसूर वाटू लागतात. थोडं वेगळं म्हणून सुरेशजींचे गाणं आठवतं. सूर भिडताचं रममाण होते मी. “पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.” मनाचिया गुंती वाहत जाते. या अवस्थेपर्यंत कोलमडलेलं मन, भंगलेली स्वप्नं यांचा मेळ साधताना, शोधते मी मला स्वत:ला. यावेळचे प्रश्न सुटणारे नसतात. अधिक जटिल होत जाणारे असतात. हा प्रवास कुठे संपणार कुणास ठाऊक? तरीही नशिबाला दोष न देता, आनंदाने स्वीकारते त्याला. कुठल्या मक्तेदारीला बळी पडण्याइतपत दुबळी नाहीय मी. स्त्री मन हळवं असलं, तरी लढण्याचं सामर्थ्य अंगी असतचं तिच्या.

तुम्हालाही माझ्याप्रमाणं कोणे एके काळी प्रेमाच्या अत्युच्च शिखरानं मोहवलं असेलच की! असं काय होत त्याच्यात; जे आवडलं होत मला. आज माझं मलाचं हसू येत. निर्लेप मनाच्या गाभाऱ्यातलं प्रेम जे कधी फुललं नाही. बहरलं नाही. प्रेमाच्या पल्याड दिसू लागल्यावर, प्रेमाशी संबंधित कैक विषयाला फाटे फुटावेत, तसे फुटले फाटे निवडुंगासम. कडेलोट झाला प्रेमात. शेवट शून्याशी आला. पडले एकटी जेव्हा तेव्हा होती शिदोरी अनुभवांची. मग काय सज्ज झाले, लढायला सगळ्या सामर्थ्यानिशी. दिस नकळत जाई, गीत गात असे कोणी. वरपांगी दुःख माझे, आळवते ग् विराणी. मनावर लिंपण चढले. मी स्वतःला शोधताना, पाण्यात रंगले. रामनामे श्रीहरींच्या, भाव दर्शनात दंगले. एकदा का स्वतःला ओळखण्यात तुम्ही पारंगत झालात की, या ‘मी’चं अस्तित्व खुलतं. त्यावेळी द्वैत-अद्वैताच्या भेटी पारलौकिक ठरत नाहीत. लौकिकत्व मिळविलेला चैतन्यरूपी आरसा तो. इथं तर मी आहे सर्वस्व. माझे मजला आहे भान.

एकतारी धून वाजे, मीरा गाई कृष्ण गान. मीरा ही मीचं आहे. आयुष्याला सामोरं जाताना आलेल भान ही मीचं आहे. संकट धडे देतात आणि त्यातून उलगडते रहस्यमय जीवनसार. वीण घट्ट होते. सिद्धता येते. आत्मभान ते स्वयंसिद्धा हा खडतर प्रवास खऱ्या अर्थानं जगताना, आपणचं आपल्याशी केलेला वैचारिक, मानसिक करार जो विशिष्ट इप्सित साध्य करतो. त्यातून जी उभी राहते, ती रणरागिणी होय. आता योग्य दिशेनं पावलं चालू लागतात. हरी सावळ्याच्या दर्शनाला धावतात. कधी गरीबाचे हात होतात. कधी संत वचनाला जागतात. तर कधी कृपावंत दाता होतात. या सगळ्यात तावून सुलाखून माझं, मी पण घडलेलं असतं. रातराणी अबोल मी, कळीचा मोगरा मी. आसमंती भरुनी उरावे, निशिगंधित परिमळ मी. रोज पहावे त्यात मजला आरशाहून सुंदर मी.

गुंतूनी गुंत्यात माझ्या, सोडवावे प्रश्न मी. असेन मी नसेन मी, परी जगा कळेन मी. मागे स्वकर्तृत्वाच्या पाऊलखुणा ठेवेन मी. ध्येय गवसतं, हाती उरतं अंतिम सत्य. जे चेहऱ्यात स्थिरावतं, माधुर्यात सामावतं. त्याहूनही मनाचा मोठेपणा, हृदयाची सर्जनशीलता यानं देहरूपी भांड भरून ओसंडून वाहतं. त्याचं क्षणी माझी मी स्वतंत्र होते, उडते, पंख पसरवते, भरारी घेते अवकाशात. हेच ते ठिकाण, जिथं आशावादी वळणवाट गवसलीय माझी मजला. इथं माझ्यातल्या मी तत्त्वाचा शोध संपलेला असतो. मी निर्भया शांत चित्ताने मार्गस्थ होते, अंतिम ध्येय गाठण्यासाठी. अंतिम ध्येय गाठण्यासाठी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -