Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलयेता आजोळी भेटाया कविता आणि काही काव्यकोडी

येता आजोळी भेटाया कविता आणि काही काव्यकोडी

येता आजोळी भेटाया…

आजोळचे गाव माझे
आहे चिमुकले
भल्या मोठ्या डोंगराच्या
कुशीत वसलेले…

गावातल्या नदीची
काय सांगू बात
गाव सुखी करण्यात
तिचा मोठा हात…

नदीत डुंबण्याचा
लागे जीवास छंद
स्वच्छंदपणे बागडण्यात
आगळाच आनंद…

गावच्या डोंगरावर
गावदेवीचे देऊळ
वाऱ्याने घंटानाद
रोज घुमतो मंजूळ…

हिरवीगार झाडे
पांखरांचे येथे थवे
शेतशिवार फुललेले
रान गाणे गाते नवे…

पिकं झोकात डोलती
हीच श्रीमंती, सुबत्ता
कष्टावर हवी श्रद्धा
गाव हाच गिरवी कित्ता…

नाही परका कोणीच
नाही कुणाचे गुपित
आपुलकीचा मळा
फुले गावाच्या मातीत…

येता आजोळी भेटाया
जाते मरगळ विरून
उत्साह, चैतन्य सारा
घेतो उरात भरून…

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड 

१) प्रवासी थांबतात,
आगगाडीही थांबते
माणसांना घेऊन
पळत ती सुटते…

तिकिटासाठी येथे
माणसांच्या रांगा
गाडीच्या थांब्याला
काय म्हणती सांगा?

२) ज्वलनासाठी, जगण्यासाठी
आणि उद्योगधंद्यासाठी,
खेळासाठी, वाहतुकीसाठी
आणि उपयोग ऊर्जेसाठी.

भोवताली असूनही
डोळ्यांना दिसत नाही
सांगा बरं कोणामुळे
फुगा फुगत जाई?

३) एरंडाच्या पानांसारखी
तिची पाने असतात
मिऱ्यासारख्या काळ्या बिया
तिच्या आत बसतात.

लहान-मोठ्या आकारात
पिवळ्याधमक दिसतात
पिकल्यावर साखरेसारख्या
कोण गोड हसतात?

उत्तर –
१) रेल्वे स्टेशन 
२) हवा
३) पपई 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -