Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलफजिती मोराची!

फजिती मोराची!

  • कथा : रमेश तांबे

एका रानात एक मोर राहायचा. त्याला आपल्या पिसांचा केवढा अभिमान वाटायचा. त्याला वाटायचं या जगात सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. काय माझा तोरा, काय माझा पिसारा! त्याला आपल्या पिसांचा खूपच गर्व झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या पक्ष्यांचा सरळ सरळ अपमान करायचा. कावळ्याला म्हणायचा, “कावळ्या कावळ्या केवढा तू काळा; दिसतोस कसा रे तू अगदी बावळा!” कावळा बिचारा गुपचूप बसायचा. त्याला वाटायचं खरंच मी आहेच काळा. मोर किती सुंदर! असं म्हणून तो निराश होऊन कोपऱ्यात बसायचा. कावळ्याकडे बघून मोराला आनंद व्हायचा.

मग मोर आणखीनच जोशात यायचा. उडणाऱ्या पोपटाला म्हणायचा, “पोपटा पोपटा हिरव्या पोपटा; पाठीवर तुझ्या गवताचा धोपटा, पिसांना तुझ्या एकाच रंग; बघताना मला लोक होतात दंग” बिचारा पोपट गुपचूप बसायचा. त्याला वाटायचं खरंच मला आहे एकच रंग. मोराच्या पिसांवर कितीतरी रंग. मोर किती सुंदर! असं म्हणून तो आपल्या ढोलीत लपून बसायचा. पोपटाकडे बघून मोराला आनंद व्हायचा. मग मोर आणखीनच जोशात यायचा. उडणाऱ्या कबुतराला म्हणायचा, “कबुतरा कबुतरा तुझा रंग किती राखाडी, दिसतोय तू कसातरी! लोकांना तू आवडत नाही; माझा पिसारा आहे खूपच भारी! “बिचारे कबुतर निराश व्हायचे. त्याला वाटायचं खरंच माझा रंग आहे राखाडी. मोर किती सुंदर! असं म्हणून कबुतर भिंतीच्या वळचणीला जाऊन बसायचं. कबुुतराकडे बघून मोराला आनंद व्हायचा. मग मोर आणखीनच जोशात यायचा. आता मोराला खूपच अहंकार झाला होता. तो प्रत्येकाचा अपमान करू लागला. साऱ्या पक्ष्यांच्या राज्यात मोराच्या वाईट वागण्याची चर्चा होऊ लागली. या मोराचा आपण काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे याची गरज सर्वांना भासू लागली. मोराच्या गर्विष्ठपणाची बातमी चिमणीला समजली. मग चिमणीने एक योजना आखली. सर्व पक्ष्यांना त्याची कल्पना दिली. मोराचा नक्षा उतरवायचा हे ठरवून चिमणीने मोराला बातमी दिली. पक्ष्यांच्या मोठ्या सभेत तुझा सत्कार करण्यात येणार आहे. तुझ्या सुंदर पिसाऱ्याचा तुलाच नाही तर सगळ्या पक्ष्यांना अभिमान वाटतो. म्हणून पक्ष्यांचा राजा गरुड महाराजांच्या हस्ते तुझा सत्कार करण्यात येणार आहे. हे ऐकून मोराला आनंद झाला आणि पक्ष्यांच्या सभेला सत्कार घेण्यासाठी हजर राहिला.

पक्ष्यांचा राजा गरुड सिंहासनावर बसला होता. शेकडो पक्षी समोर, आजूबाजूला उभे होते. चिमणीने मोराला सत्कारासाठी बोलावले. मोर नाचत नाचत पिसारा फुलवत पुढे आला. गरज नसताना सगळ्यांच्या समोर जाऊन आपला तोरा दाखवू लागला. तेवढ्या चिमणी म्हणाली, “बघा बघा मोराचा पिसारा किती सुंदर! किती देखणा!” सगळ्यांनी चिमणीच्या बोलण्यावर आपला आनंद व्यक्त केला. पण तोही खोटा खोटाच!

तेवढ्यात पिसारा फुलवलेल्या मोराची मागची बाजू सर्वांना दिसू लागली. तोच चिमणी म्हणाली, “बघा बघा पक्ष्यांनो, मोराची पाठची बाजू कशी उघडी पडली. बघा बघा पक्ष्यांनो नाचण्याच्या नादात, पिसारा फुलवण्याच्या नादात आपण मागून उघडे पडलो हे त्याला कळतदेखील नाही. त्याला जराही लाजलज्जा वाटत नाही आणि त्या मोराचे पाय बघा किती विचित्र, काटकुळे अन् वेडेवाकडे!” सारेच पक्षी म्हणाले, “अरेरे, अरेरे पिसारा दाखवायच्या नादात आपली मागची बाजू सगळ्यांना दाखवतो… शी शी शी…!” सभा जोरात ओरडली. तोच मोराला आपली चूक कळली. त्याने झटकन आपला पिसारा बंद करून आपली मागची बाजू लपवली. मोर अगदी शरमिंदा झाला होता. सभेपुढे आपण उघडा झालो याची त्याला लाज वाटू लागली. मग त्या गर्दीतून कसाबसा वाट काढत मोर तिथून निघून गेला. अशा प्रकारे चिमणीने मोराला चांगलाच धडा शिकवला.

त्यानंतर मात्र मोराने उगाचच पिसारा फुलून इतर पक्ष्यांचा अपमान करणे बंद केले. आता जेव्हा जेव्हा त्याला स्वतःला आनंद होतो, तेव्हाच तो पिसारा फुलवतो! आणि अशा पिसारा फुलवलेल्या आनंदी आणि विनम्र मोराला पाहून सारेच आनंदित होतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -