
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर
मुंबई : समान पाणी वाटपाची योजना काही एका दिवसात झालेली नाही. तीला किमान ८ वर्षांचा कालावधी लागला. असे असले तरी पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय हे लक्षात आले असून आता पाण्याच्या एका एका थेंबाचा हिशोब घेणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पाणी योजनेवर सविस्तर माहीती दिली. याबाबत कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले.
पुण्यात ७२ लाख लोकसंख्या सरकारने गृहित धरली आहे. शहरी भागात प्रतिमाणूस १५० लिटर आपण पाणी देतो. राज्यातील सर्व शहरांसाठी हा निकष आहे. दरम्यान, पुण्यात ११.६० टीएमसी पाण्याची तरतूद आहे. परंतु, तरतुदीच्या विरुद्ध जाऊन १४.६१ टीएमसीला मंजूरी देण्यात आलेली आहे. म्हणजे, तरतुदीपेक्षा ३ टक्के जास्त मंजूरी देण्यात आलेली आहे. दरम्यान, त्यामध्ये सर्वत्र मिळून शहराचा वापर आहे २०.७८ टीएमसी. म्हणजे तरतुदीच्या दुप्पट पुणे शहराला पाण्याचा वापर होत आहे, अशी सविस्तर माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, तरतुदीनुसार पुण्याला सध्या पाणी पाहिजे १२.८२ टीएमसी इतकं. परंतु, आज पुणे २०.७८ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात गळती आहे. विनानोंद पद्धतीने पाणी वाटप होत आहे. या सगळ्याची दखल घेऊन हे पाणी वाटप व्हायला हवे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, पाण्याच्या एका एका थेंबाचा हिशोब व्हायला हवा असेही ते यावेळी म्हणाले. त्याचवेळी यामध्ये सुमारे ४० टक्के गळती आहे. ती २० टक्क्यांवर आणण्याचे काम सुरू असून लवकरच यामध्ये सुधारणा होईल असेही फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितले.