
आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा
शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे : नितेश राणे
मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी आपल्या भाषणावेळी लोकसभेत भगवान शंकर, कुरान आणि गुरु नानक यांचा फोटो दाखवला. 'जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत', असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. राहुल गांधींच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनीही आक्षेप घेतला. या प्रकरणावर आज भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'राहुल गांधींनी पुन्हा असं केलं तर हिंदू समाज देखील आपला तिसरा डोळा उघडेल', असा घणाघात नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, काल देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर जी टीका केली, अपमान केला, त्यानुसार राहुल गांधी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशात ९० टक्के हिंदू लोक राहतात. हिंदूराष्ट्र म्हणून आमच्या देशाची ओळख आहे. या देशाचा हिंदू आतापर्यंत शांत आहे, म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत होते, ते या देशात सुखाने राहू शकतात. ज्या दिवशी खरंच या देशातील हिंदू अशांत होईल, हिंसक होईल तेव्हा काल ज्यांना राहुल गांधी खूश करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना बिर्याणी आणि शीरखुरमा यांच्यातील फरकही कळणार नाही.
आमच्या देशात हिंदूंचा असा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परत असं केलं तर हिंदू समाज देखील आपला तिसरा डोळा उघडेल. ज्या प्रकारे त्यांनी गुरुनानक आणि भगवान शंकर यांचा फोटो दाखवला त्याप्रमाणे त्यांनी मोहम्मद पैगंबर यांचा फोटो दाखवण्याची हिंमत का नाही केली? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
आमचा हिंदू समाज शांत आहे त्यामुळे...
नितेश राणे म्हणाले, मुळात ज्यांना राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं वाटत नाही, त्यांनी याचा विचार केला पाहिजे की आमदार, खासदार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी याअगोदर ते हिंदू आहेत. हिंदूंचा जो अपमान राहुल गांधींनी केला तेच वक्तव्य जर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर त्यांची जीभ कापून टाकली असती. आमचा हिंदू समाज शांत आहे त्यामुळे हे सगळं होत आहेत. नाहीतर राहुल गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या लोकांना खूश करण्याचा प्रयत्न चालू आहे, ते आमच्या देशात १ टक्काही उरणार नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे
धर्मवीर १ मध्ये उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) ५ टक्के वस्त्रहरण झालं, धर्मवीर २ मध्ये उरलेसुरले कपडे काढण्याचं काम पण होईल. मग त्यांना पानं लावायला लागतील. शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन हा उद्धव ठाकरेच आहे बाकी कोणी नाही. उद्धव ठाकरेला बाजूला केलं असतं तर शिवसेना आज एकसंघ असती आणि ताकदीचा पक्ष असती, असं नितेश राणे म्हणाले.