Friday, May 10, 2024

करंटा

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

एका लहानशा गावात वेशीवरील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात एक भिकारी ‘ॐ नमः शिवाय… ॐ नमः शिवाय…’ असा जप करीत हात पसरून भीक मागायचा. गावाच्या वेशीवरून जाणाऱ्या-येणाऱ्यांपैकी कुणी पै-पैसा त्याच्या हातावर टेकवत होता. काहीतरी खायला देत होता. दिवसा जे मिळेल ते खायचं. शिल्लक पैसे कनवटीला लावून त्या पैशांतून रात्री काहीतरी खायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी देवळासमोर भीक मागायची असा त्या भिकाऱ्याचा वर्षानुवर्षांचा दिनक्रम चालू होता.

एके दिवशी तो नेहमीप्रमाणेच ‘ॐ नमः शिवाय… ॐ नमः’ जप करीत भीक मागत होता. वर आकाशातून साक्षात शिवशंकर पार्वतीसह विमानातून चालले होते. त्या विश्वजननी पार्वतीमातेनं ते दृष्य पाहिलं आणि तिचं मन कळवळलं. ती शिवशंकरांना म्हणाली,‘अहो, तुमचा तो भक्त पाहिलात, तुमच्या नावाचा जप करतोय आणि भीक मागतोय. तुमचं सतत नाव घेऊनही त्याला भीक मागावी लागतेय याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?’
शिवशंकर हसले आणि म्हणाले,
‘अगं, आयुष्यभर केवळ भीक मागणं हे त्याच्या नशिबातच लिहिलंय. त्याचं नशीब तूही बदलू शकत नाहीस की मीही बदलू शकत नाही.’
‘असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही एवढे मोठे देव. देवांचेही देव. महादेव आणि या महादेवाचा भक्त भीक मागतोय हे मला तरी नाही पटत. तुम्ही त्याला काहीतरी द्या. त्याची परिस्थिती सुधारा. त्याला श्रीमंत करा.’ पार्वतीनं नाराजीनंच सांगितलं.

शिवशंकर पुन्हा हसले अन् म्हणाले,
‘हे बघ, त्याची परिस्थिती सुधारणं माझ्याच्याने शक्य नाहीये. तू जगन्माता. तू विश्वजननी.
तूच कर काहीतरी.’
‘हो हो देईन मी त्याला मोहरांनी भरलेली थैली.’ पार्वती फणकाऱ्यानं म्हणाली.
‘दे. पण त्याच्या हातात देऊ नकोस. त्याला जरासे तरी कष्ट करू देत.’
‘ठीक आहे.’ पार्वती म्हणाली आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक थैली त्या भिकाऱ्याच्या मार्गावर ठेवली. आता दहा-वीस पावलं तो भिकारी चालला की येणाऱ्या वळणावर ती थैली त्याला दिसणार होती. पार्वतीमातेच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचं समाधान आणि उत्सुकता होती. पण भगवान शिवशंकर मात्र मिश्कीलपणे हसत होते.

तो भिकारी ‘ॐ नमःशिवाय, ॐ नमः शिवाय’ करीत एक-एक पाऊल टाकत होता. हात पसरून भीक मागत होता. ती थैली त्याच्या मार्गावर अगदी दहा पावलांवर होती आणि अचानक त्या भिकाऱ्याच्या मनात विचार आला की, आपल्याला तर हात-पाय, नाक-कान-डोळे सगळं काही व्यवस्थित आहेत म्हणून आपल्याला लोक धडधाकट भिकारी समजून भीक देत नाहीत. मी जर आंधळा असतो, तर लोकांना माझी अधिक दया आली असती आणि मला खूप भीक मिळाली असती. बस्स ठरलं. आजपासून आंधळ्याचं सोंग करून भीक मागायची.

असा विचार करून त्यानं डोळे मिटून घेतले आणि ‘ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय’ म्हणत कोपऱ्यावरून वळला. पार्वतीमातेनं ठेवलेली ती मोहरांची थैली तशीच मागेच राहिली.
पार्वतीमातेनं खिन्नपणे स्वतःशीच बोलल्यासारखी म्हणाली, ‘काय म्हणावं या माणसाला?’
भगवान शिवशंकर खळखळून हसले. म्हणाले, ‘अशा माणसासाठी माझ्याजवळ एकच शब्द
आहे ‘करंटा…!’

अशा प्रकारचे अनेक करंटे आपण नेहमीच पाहतो. घरची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. आई-बाप शाळेची-क्लासची फी भरताहेत, वह्या, पुस्तके, इतर साहित्य कशाला तोटा नाही. तरीही अभ्यास न करता परीक्षेत नापास होणारे, शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे पुढचं संपूर्ण आयुष्य सामान्यातून अतिसामान्याकडे अधोगतीची वाटचाल झालेले अनेक युवक आपण पाहतो. अशी माणसं आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी परिस्थितीला नावं ठेवतात. नशिबाला दोष देतात. क्वचित तर आई-बापांवरही ठपका ठेवतात. एकेकाळी आपल्याबरोबर असलेल्या पण आता स्वकर्तृत्वाने पुढे गेलेल्या यशस्वी लोकांबद्दल वावड्या उठवतात. त्यांचा दुस्वास करतात. पण कधीही आत्मपरीक्षण करीत नाहीत. देवाने दिलेलं कर्मानं घालविणाऱ्या अशांसाठी एकच शब्द आहे. ‘करंटा!’

अनेकदा आपण पाहतो. एखाद्या माणसाला चांगली नोकरी असते. बायको, मुलंबाळं. सुखी संसार चाललेला असतो. सगळं सुरळीत असूनही माणूस एखाद्या व्यसनाच्या आहारी जातो. पान, तंबाखू, गुटका, सिगारेट क्वचित कधीतरी मित्रांबरोबर पिकनिक पार्टीत घेतलेली थोडीशी दारू वरकरणी अगदीच निरुपद्रवी वाटणारी ही व्यसनं पुढे आयुष्याचा घात करतात. गांडुळासारखं गरीब वाटणारं हे व्यसन हां हां म्हणता अजस्त्र अजगराचं रूप धारण करतं आणि आयुष्याला विळखा घालतं. ध्यानात येतं त्यावेळी फार उशीर झालेला असतो. धडधाकट माणसं व्यसनाधीन झाल्यामुळे दुर्धर रोगाला बळी पडतात. आयुष्यभराची कमाई औषधोपचारात खर्च होते. स्वतःलाही शारीरिक पिडा होतात आणि बरोबरीच्या इतरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. गरज नसताना व्यसनांना जवळ करणाऱ्यांसाठी एकच शब्द आहे, ‘करंटा!’

आपण मध्यमवर्गीय पांढरपेशी माणसं. निवडणुका लढवणं, देश चालवणं वगैरे आपला प्रांत नाही हे खरंच. पण देश कुणी चालवावा हे ठरवण्याची संधी मात्र आपल्याला नक्कीच मिळालेली असते. लोकसभा, विधानसभा, महापालिका या सगळ्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी कोण असावेत हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला कायद्याने मिळालेला असतो. पण आपणच मतदानाला घराबाहेर पडतच नाही. ‘सगळेच चोर आहेत.’ असं म्हणून आपण घरीच बसून राहतो.लोकशाहीने दिलेला आपला हक्क न बजावता त्या दिवशी मिळालेल्या सुट्टीत एक दिवसाची पिकनिक-पार्टी करतो. सुजाण नागरिकाचं कर्तव्य पार पाडत नाहीच आणि त्यानंतर मात्र निवडून आलेल्या सरकारला शिव्या देतो.

सरकार निवडण्याची संधी मिळूनही निष्क्रीयपणे घरी बसणाऱ्या या अशा माणसासाठी एकच शब्द आहे… ‘करंटा…!’
करंटेपणाचे हे विविध प्रकार आपल्याला पहायला मिळतात. जे आपल्याला निसर्गाकडून मिळालंय, जे आई-वडिलांकडून वारसाहक्काने मिळालंय त्यात भर घालायची सोडून ते नाहीसं करण्याचा उद्योग म्हणजे करंटेपणा. स्वतःच्या क्षणीक सुखासाठी दीर्घकालीन संधी जो लाथाडतो तो करंटा. अशा करंटय़ांना डोळे असूनही दिसत नाही. कान असूनही ऐकू येत नाही. शक्ती असूनही ती वापरता येत नाही. बुद्धी असूनही तिचा उपयोग करता येत नाही आणि माणूस म्हणून जन्माला येऊन ही माणसासारखं जगता येत नाही.

काही जण अशांना ‘दुर्दैवी’ म्हणतात. पण या माणसांसाठी दुर्दैवी हा शब्द मला चुकीचा वाटतो. या दुःखी लोकांची दुःखं त्यांनी स्वतःच निर्माण केलेली असतात. थोडासा प्रयत्न, थोडीशी मेहनत आणि योग्य दिशेनं वाटचाल केली, तर ही माणसं त्यांचे आयुष्य घडवू शकली असती. गोष्टीतल्या त्या भिकाऱ्यासमोर मोहरांची थैली असूनही त्याला ती दिसली नाही. भगवान शिवशंकर पार्वतीला म्हणाले होते, ‘त्याची परिस्थिती सुधारणं माझ्याच्याने शक्य नाही.’ आणि खरंच देवदेखील कुणाची परिस्थिती सुधारू शकत नाही. परिस्थिती सुधारणं हे केवळ त्या त्या व्यक्तच्या स्वतःच्याच हातात असतं.

एक संस्कृत वचन आहे,
‘सुखस्य दुःखस्य न कोपि दाता।’

सुख आणि दुःख इतर कुणीही आपल्याला देऊ शकत नाही. आपलं आपणच ते निर्माण करायचं असतं. किंबहुना सुख हे निसर्गाने प्रत्येकालाच दिलेलं असतं. आपणच त्या सुखात दुर्गुणांची माती कालवून त्याचं रुपांतर दुःखात करतो.
नीट विचार केलात, तर आपल्या लक्षात येईल की आपण जन्माला आलो त्यावेळी त्या जगंनियंत्या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घालतांनाच आपल्यासमोर मोत्याच्या पायघडय़ा अंथरून ठेवलेल्या असतात. हे मोती म्हणजे माणसाला मिळालेल्या आयुष्यातले क्षण; परंतु आपल्यापैकी बहुसंख्य माणसं हे मोती निव्वळ पायदळी तुडवतात. हे मोती वेचले तर आयुष्य कितीतरी सुंदर होऊ शकतं याची कल्पना नसते म्हणा किंवा हे मोती काहीही सायास न करता फुकट मिळाले म्हणून म्हणा. पण या मोत्यांची किंमत आपल्याला कळतच नाही. अज्ञानामुळे असो किंवा मस्तीमुळे असो हे मोती पायदळी तुडवणं हा त्या परमेश्वाचा अपमान असतो.

जो माणूस हे क्षणांचे मोती न वेचता पायदळी तुडवतो त्याच्यासाठी एकच शब्द आहे,
‘करंटा!!!’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -