Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभांडवल उभारणीसाठी क्राऊडफंडिंगचा पर्याय

भांडवल उभारणीसाठी क्राऊडफंडिंगचा पर्याय

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी.

हे बोल आहेत गदिमांनी प्रपंच या चित्रपटासाठी लिहिलेल्या लोकप्रिय गीताचे. तुमची इच्छा आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर व्यवसाय सुरू करण्याच्या सुरुवातीच्या कालखंडात भांडवल उभारणीस पर्याय म्हणून ‘क्राऊडफंडिंग’ (वित्त पुरवठा निधी) या अभिनव मार्गाचाही निश्चित विचार करता येईल. आपण उद्योगाच्या दृष्टीने याचा विचार करू या.

या माध्यमातून निधी जमा करून देणारे समर्पित असे विविध मंच सन २००० पासून कार्यरत आहेत जे उद्योगांना/ संस्थांना निधी उभारून देण्यात मदत करतात. निधी उभारणीचे उद्दिष्ट निश्चित असल्यास ते पूर्ण करण्यासाठी सुयोग्य मंचाची मदत घेता येऊ शकेल. निधी उभारणीच्या कारणांची स्पष्टता आणि त्यासाठी अपेक्षित रक्कम निश्चित झाल्यावर त्याचा पद्धतशीरपणे प्रचार आणि प्रसार केला जातो. मदत करू शकणाऱ्या संभाव्य लोकांना तुमच्याकडे आकर्षित करून घेतले जाते. अपेक्षित निधी गोळा झाल्यावर मंचाची फी वजा करून उरलेली रक्कम संबंधित संस्थेच्या/ उद्योगाच्या खात्यात जमा केली जाते.

भारतातील सुप्रसिद्ध क्राऊडफंडिंग मंच-स्थापना वर्ष-मंच फी

  •  गिव्ह इंडिया (सन २०००) ९.१%
  •  मिलाप (सन २०१०) विनामूल्य
  • केट्टो (सन २०१२) सन २०२० पासून विनामूल्य
  •  डोनेटकार्ट (सन २०१८) विनामूल्य
  •  इम्पॅक्टगुरू (सन २०१४) ८ %

क्राऊडफंडिंगचे प्रकार –

  • कर्ज आधारित निधी (पी२पी) : यामध्ये गरजू व्यक्ती, संस्था, अनेक व्यक्ती अथवा संस्थांकडून ऑनलाइन कर्ज घेतात. यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप अशा व्यवसाय कर्ज आधारित क्राऊडफंडिंग पद्धतीने निधी जमा करतात.
  • पुरस्कार आधारित निधी : यामध्ये गरजू व्यक्ती / संस्था दुसऱ्या अनेक व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून देणगी स्वरूपात कर्ज घेतो. त्याची परतफेड न करता मूर्त अमूर्त स्वरूपात बक्षीस देऊन त्याची परतफेड केली जाते.
  • मागणी पूर्व निधी : उद्योगासाठी उपयुक्त अशी ही निधी रचना असून व्यावसायिक गुंतवणूकदारास त्याने दिलेल्या निधीच्या ऐवजी उत्पादनाची पहिली तुकडी बाजारात येण्यापूर्वी उत्पादित माल पूर्वनिर्धारीत किमतीस देण्याचे
    वचन देतो.
  •  समभाग आधारित निधी : यातील गुंतवणूक ही थेट समभागात केलेली असते. समभाग निगडित जोखीम
    त्यात असते. यातील एकाहून अधिक प्रकार एकत्रित करून त्याद्वारेही निधी उभारणी करता येते.

विविध स्टार्टअप आणि उद्योजकांना निधी उभारणीमुळे होणारे फायदे –

  • यातील अनेक निधी उभारणी मंच विनामूल्य काम करतात. तथापि उत्पादनाच्या विक्रीसाठी साहाय्य करणारे काही मंच देणगी स्वरूपात काही रक्कम घेतात.
  • निधीसाठी योग्य वापरकर्त्याच्या शोधात अनेकजण आहेत अशा व्यक्ती या मूळ कल्पनेच्या भविष्याचा वेध घेणारे असतात. त्यामुळे तारणविरहित भांडवल सहज उपलब्ध होते.
  •  याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादने / सेवा बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी घेण्याची परवानगी प्रचारकांना असते. ते गुंतवणूकदारांना/ देणगीदारांना आपली उत्पादने/ सेवा पाठवू शकतात. त्यांचा अभिप्राय समजून घेऊन योग्य ते बदल करू शकतात. विपणन साधन म्हणूनही याचा वापर करता येतो.
  • निधी संकलनाच्या मोहिमेतून होणाऱ्या देवाण-घेवाणीतून महिमेस महत्त्व देऊ शकणारा नवा दृष्टिकोन उद्योजकास मिळू शकतो.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवणे ही मोठी गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ घेणारी प्रक्रिया असून निधी गोळा करून लक्ष्य साध्य झाल्यास पारंपरिक पद्धतीने कर्ज मिळवणे / भांडवल बाजारात प्रवेश करणे सुलभ होते.
    नव्या विस्तार योजनेस निष्ठावान ग्राहक, समर्थक यांची फळी निर्माण होते.
    संस्थेच्या उद्योगाच्या दृष्टीने निधी उभारणीचा हा किफायतशीर पर्याय असला तरी गुंतवणूकदार म्हणून अशी गुंतवणूक निश्चित जोखमीची ठरू शकते. त्यामुळे अशी गुंतवणूक करण्यापूर्वी –
  •  देणगीदार/ गुंतवणूकदारांनी संशोधन करावे. कारण पुरेशी काळजी घेऊनही यात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • समभाग आधारित म्हणून पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणून गुंतवणूक करताना यात अन्य गुंतवणुकीच्या तुलनेने मोठी रक्कम गुंतवावी लागते. अशी गुंतवणूक केवळ उच्च उत्पन्न असलेले गुंतवणूकदार (HNI) किंवा देवदूत (Angel) गुंतवणूकदारच करू शकतात. सेबी मान्यताप्राप्त क्राऊडफंडिंग गुंतवणूकदार म्हणून मान्यता मिळवण्यासाठी नोंदणीकृत कंपनीची मालमत्ता २० कोटी रुपयांची, तर उच्च मालमत्ता गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान २ कोटी असावी लागते, तर सर्वसामान्य गुंतवणूकदाराची किमान गुंतवणूक क्षमता सेबीच्या नियमानुसार विविध प्रकारात रुपये २५ लाख ते १ कोटी एवढी असावी लागते.

यशस्वी क्राऊडफंडिंग कसे करता येईल –

  • आपल्या उपक्रमाच्या अनुसार निधी उभारणीची योजना ठरवणे आणि त्यासाठी निधी जमा करू शकणाऱ्या अनुरूप मंचाची निवड करणे.
  • वास्तववादी ध्येय निश्चित करणे, त्याची निश्चित रूपरेषा मांडणे जेणेकरून संभाव्य गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतील.
  • गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे माध्यम पर्याय वापरणे. यात लिंकडीनसारखे मंच, ईमेल मार्केटिंग, मेसेजिंग ॲप याचा वापर करता येईल, थेट जाहिरात करता येत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींची यासाठी मदत होऊ शकते.
  • गुंतवणूकदारांना विश्वासात घ्यावे. वेळोवेळी मोहिमेतील प्रगतीची माहिती द्यावी.
  •  होता होई तो दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
  •  क्राऊडफंडिंग मंच म्हणून आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी –
  •  सेबीकडे निधी गोळा करणारा मंच म्हणून नोंदणी आवश्यक.
  • मोहिमेबद्धल सर्व माहिती उघड केली पाहिजे.
  •  मोहिमेच्या निर्मात्यांनी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे मंचाकडून अपेक्षित आहे.
  •  मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याचे पालन केले पाहिजे.
  •  पेमेंट सिस्टीम गेटवे आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे.

कोणताही उपक्रम पुरेसा पैसा नसेल, तर प्रत्यक्षात येणे कठीण आहे. कोणी कुणाला असेच पैसे का म्हणून द्यावेत? पैसे देण्यामागे एक तर मदत योग्य त्या गरजू व्यक्तीकडे पोहोचवल्याचे मानसिक समाधान असू शकते किंवा भविष्यात मिळू शकणारे फायदे असे सुप्त हेतू असू शकतात. उद्योगांशिवाय या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना निधी संकलनाचे पाठबळ सध्या क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून होत आहे.
mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -