Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमाझे किती क्षण राहिले...

माझे किती क्षण राहिले…

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

कलेच्या जगातले नियम व्यावहारिक जगापेक्षा अगदी वेगळे असतात. कलानिर्मितीत संख्या आणि दर्जा यांचे प्रमाण सहसा व्यस्त असते. म्हणजे जिथे संख्या जास्त तिथे दर्जा कमी आणि जिथे दर्जा उत्तम तिथे संख्या कमी असेच अनेकदा दिसते. मात्र त्याला काही अगदी लखलखते अपवादही असतात. मला माहीत असलेले दोन अपवाद म्हणजे लता मंगेशकर आणि सुरेश भट!

लतादीदींनी गाण्याच्या संख्येबाबत तर विश्वविक्रम केला आणि त्याची नोंदही कित्येक वर्षांपूर्वीच जगाने घेतली आणि दर्जा? त्याबाबत कोण आणि काय बोलू शकणार! त्यांचे गायन हीच तर सिनेसृष्टीत उच्च दर्जाच्या पार्श्वगायनाची व्याख्या बनून राहिली आहे. सुरेश भटांचेही तसेच. त्यांनी अगणित कविता, सिनेगीते लिहिली. मराठी गझलेच्या प्रांतात तर मानदंड म्हणूनच आपण त्यांच्याकडे पाहतो. भावगीतांना सिनेगीतांच्या इतकी लोकप्रियता त्यांच्याच गीतांना मिळाली. सिनेगीतांचे आयुष्य दशकानुदशके टिकू शकते, हेही सुरेशजींच्या गाण्यांनी सिद्ध केले.

‘रंग माझा वेगळा’, ‘रसवंतीचा मुजरा’, ‘रूपगंधा’, ‘एल्गार’, ‘काफिला’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’, ‘हिंडणारा सूर्य’, ‘सुरेश भट-निवडक कविता’ असे त्यांचे किमान ९ काव्यसंग्रह सर्वपरिचित आहेत. याशिवाय त्यांच्या कवितेवर दोन अभ्यासकांनी पुस्तके लिहिली आहेत. एक म्हणजे डॉ. राम पंडित यांचे ‘अन उदेला एक तारा वेगळा’ आणि स्वत: गझलकार असलेल्या प्रदीप निफाडकर यांचे ‘गझलसम्राट सुरेश भट’ ही ती दोन पुस्तके!

सुरेशजी प्रसिद्ध आहेत ते एक बंडखोर कवी म्हणून! तरीही त्यांनी अनेक टोकाच्या तरल, रोमँटिक कविताही लिहिल्या आहेत. या कवीच्या अनेक कवितात उदासीनतेची एक अदृश्य सावली सतत वावरताना दिसत असली तरी दुसरीकडे मात्र टोकाची आशावादी कविता हेही त्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागते. ‘सिंहासन’मधील ‘अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ हे एक गाणेही याची साक्ष म्हणून पुरेसे ठरू शकते.

या मनस्वी कवीने वैचारिक भूमिकेतून हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा अंगीकार केला होता. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा गौरव करणारी जी गीते लिहिली त्यांना तोड नाही. अजून १४ दिवसांनी ती उभ्या महाराष्ट्रात अनेकदा वाजतील. कारण या महामानवावर लिहिलेली अनेकांची कर्णमधुर गाणी भक्तिरसाकडे झुकतात. सुरेश भटांचे वेगळेपण हे की त्यांच्या गाण्यात जशी बाबासाहेबांबद्दलची भक्ती आहे तसेच त्यांच्या वैचारिक क्रांतीचे काव्यमय वर्णनही दिसते. बाबासाहेबांचा गौरव करून हा कवी थांबत नाही, तो त्यांचा विचार आपल्याला समजावून सांगतो.

त्यांची प्रत्येक गझल एक मूड निर्माण करते. दोन ओळी जरी ऐकल्या तरी आपण त्या मूडमध्ये रममाण होऊन जातो. त्यातून बाहेर पडायचे ठरवले तरी त्याच भावावस्थेत अडकत जातो! सुरेशजींच्या गीतांची जादूच काही और आहे.
अशीच त्यांची एक गझल आहे आयुष्याच्या शेवटच्या दिवसांबद्दल! आयुष्य संपत आलेले आहे. जगण्यातला सगळा उत्साह मावळला आहे, भावभावनांची उत्कटता आटली आहे, येणाऱ्या अंताची चाहूल सगळ्या भावविश्वावर एक मळभ पसरवते आहे, अशी अतिशय उदास मन:स्थिती! आणि सुरेशजींच्या लेखणीतून शब्द उतरतात –
आता जगायचे असे माझे किती
क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती
कण राहिले?

तारुण्याचा बहर ओसरला आहे. भावना आता पूर्वीइतक्या कोवळ्या, टवटवीत, तरल राहिल्या नाहीत. आता दिवसा काय, रात्रीही स्वप्ने पडत नाहीत! जीवनाच्या उजाड, भक्क पांढऱ्या आकाशात कधीच चांदण्या दिसत नाहीत. आता मनाला एकच दिलासा आहे. कवीच्या प्रियेचे त्याच्यावरचे प्रेम मात्र पूर्वीसारखेच शिल्लक आहे. त्यावरच उर्वरित प्रवास असह्य होणार आहे.

हृदयात विझला चंद्रमा
नयनी न उरल्या तारका,
नाही म्हणायाला
तुझे हे आपुलेपण राहिले…

गझल या काव्यप्रकारात एक स्वातंत्र्य असते. पहिल्या दोन ओळीचा काहीही संबंध दुसऱ्या दोन ओळींशी नसला तरी चालतो. म्हणून मग हा कलंदर प्रेमी सांगतो, ‘मी अनेक अनुभव बेधुंदपणे घेऊन चुकलो आहे. अनेकदा प्रतारणा अनुभवली. प्रेमाची बाजी अनेकदा हरलो. मात्र आता कसलीच इच्छा राहिली नाही. शेवटी तो स्वत:लाच विचारतो, ‘मग कोणती आशा माझी जीवनासक्ती टिकवून ठेवते आहे?’ आयुष्य तर अशाश्वच. ते हातातून निसटून जाणारच!

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले?
आयुष्याची गाडी उताराला लागली आहे. अनेक सवंगडी कधीच खेळ अर्धवट टाकून निघून गेलेत. आता आपल्याबरोबर कोण शिल्लक राहिले तेच महत्त्वाचे. ते उरले-सुरले आधार शोधून, सांभाळून ठेवणे गरजेचे!
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे…
मी मात्र थांबून पाहतो मागे
कितीजण राहिले?
एकंदरच जीवनाचा तटस्थ आढावा घेताना कवी म्हणतो, मी दु:खाचा परिपूर्ण अनुभव घेतला! दाही दिशांच्या वेदना अनुभवल्या. आता मी तटस्थ बनलो आहे. माझी जीवनाबद्दल काही तक्रारच राहिली नाही.
कवटाळुनी बसले मज दाही
दिशांचे हुंदके,
माझे आता दु:खासवे काही न
भांडण राहिले!

जाता जाता तो प्रियेला आठवण देऊ इच्छितो ती त्यांच्या प्रेमाच्या चिरंतनगेची. ‘मी तुला जे वचन दिले त्यासाठी मी सारे आयुष्य पणाला लावले होते’ हे तिला सांगताना त्याला एक समाधान मात्र आहे.
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला,
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

जीवनाच्या नाट्याचा अंत जवळ आलाय. तिसरी घंटा कधीही वाजेल आणि पडदा पडेल असे हे शेवटचे काही क्षण. पण कवीचे वेदनेचे भोग काही संपत नाहीत. तो म्हणतो, ‘परिस्थितीचे कितीतरी चटके मी सोसले, आयुष्यभर प्रतिकूलतेच्या झळा सहन केल्या. अजूनही हे प्राक्तन संपू नये ना?’ मग त्याला नियतीलाच विचारावेसे वाटते, ‘तू माझा विनाश करण्याचे अजून किती पण केले आहेस? त्यातले अजून किती शिल्लक आहेत, ते तरी सांग.’
अवघ्या विजा मी झेलल्या,
सगळी उन्हे मी सोसली…
रे बोल आकाशा,
तुझे आता किती पण राहिले?
कवीचे सखेसोबती काळाच्या पुढे निघून गेले आहेत. आयुष्यात लौकिकाशी न जमल्याने त्याच्याकडे स्वत:चे वैभव दाखवणारे काहीही नाही, फक्त आश्रय देणारा निवारा आहे आणि त्या घराच्या अगदी दारातच बांधलेले तोरणही कसले? तर तो म्हणतो, ‘आसवांचे!’
लगेच आपल्या डोळ्यांसमोर लहानपणीचे एक चित्र तरळते. पूर्वी पावसाळ्यात घरासमोरील विजेच्या तारांवरून ओघळणारे पावसाचे थेंब मोठे सुंदर दिसत. जणू सूर्यप्रकाशात चमचमते मणीच!
ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे,
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले!

सुरेश भट हा कवी एक वल्ली होता. “तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही, तिथेच जाऊन वेच तारे अजून काही” अशा नितांत आशादायी ओळी लिहिणारा हा कवी कधी किती तटस्थ, उदास होऊ शकतो ते पाहणेही मोठे मनोवेधक ठरते. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -