वसंत भोईर
वाडा : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे फराळ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस महागल्याने दिवाळीचा तयार फराळ महागला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅस, डाळ, बेसन, मैदा, तेल, तूप, साखर अशा सामग्रीच्या किमती वाढल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तयार फराळ २०ते २५ टक्क्यांनी महाग झाला आहे. पण दुसरीकडे तयार फराळाच्या मागणीतही वाढ झाली आहे.
मालवाहतूक दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाल्यामुळे फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. विविध डाळींचाही भाव वाढला आहे. त्याचा परिणाम फराळाच्या किमतीवर झालेला आहे. त्यामुळे यावर्षी फराळाच्या किमतीत २०ते २५ टक्क्यांनी वाढ केली. – संपदा पाटील, फराळ व्यावसायिक
गॅस, इंधन, तेल आणि इतर पदार्थांचे दर वाढल्याने यंदा फराळाच्या किमती प्रति किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढविल्या आहेत. मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. पुढील आठवड्यात आणखीन विक्री होण्याची आशा आहे. – दर्शना पाटील, फराळ व्यावसायिक