Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सएका शापित गंधर्वाचा उत्तरार्ध : नमन नटवरा

एका शापित गंधर्वाचा उत्तरार्ध : नमन नटवरा

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

उत्तरार्धातील विस्कळीत आयुष्यामुळे बालगंधर्वांची शोकांतिका आजवर नाटक या माध्यमातून कधीही रंगभूमीवर आली नव्हती आणि ती येऊ नये अशीही नाट्यरसिकांची इच्छा असावी. एवढ्या मोठ्या गायक, नटाचे स्थान रसिकांच्या हृदयात अत्यंत मोलाचे होते. बालगंधर्वांना अखेरच्या काही वर्षांत सामोरी जाव्या लागलेल्या हाल-अपेष्टांची बाजू अत्यंत विदारक होती. बालगंधर्वांवर लिहिल्या गेलेल्या लेखांमध्ये किंवा पुस्तकात ही बाजू क्वचितच लिहिली गेली असल्यामुळे रसिकांना ती फारशी माहीत नाही. नुकत्याच रंगभूमीवर प्रकाशित झालेल्या ‘नमन नटवरा’ या नाटकाने ती बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.

श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज, बांदिवडे या गोव्यातील मान्यवर संस्थेने मुंबईतील नाट्यप्रेक्षकांस एका सर्वांगसुंदर नाट्यप्रयोगाचे दर्शन घडविले. बालगंधर्वांनी गोहरबाईला स्वीकारल्याने, त्यांच्या आयुष्याची जी धूळधाण झाली, त्याचे नाट्यरूप पाहताना वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. नाटकाची सुरुवातच बोलपटांच्या आगमनामुळे एकंदर नाटक व्यवसायावर झालेल्या परिणामांनी होते. गंधर्व नाटक कंपनीही याला अपवाद नव्हती. गंधर्व नाटक कंपनीने आत्मसात केलेला चंगळवाद हाच कंपनी संपुष्टात येण्याला कारणीभूत ठरल्याने उत्पन्न आणि खर्च यांचे प्रमाण व्यस्त बनले. यावर नियंत्रण राखले जावे, याकरिता गोहरबाईंनी कंपनीची सूत्रे ताब्यात घेतली आणि कंपनी फुटावयास सुरुवात झाली. शेवटी शेवटी तर मॅनेजर म्हणून काम पाहत असलेल्या त्यांच्या भावाने व पत्नी लक्ष्मी यांनी घर आणि शहर सोडले. गोहरबाईंची साथ-सोबत असल्याने आणि बालगंधर्वांच्या आत्ममग्न वृत्तीमुळे आधीच डबघाईला आलेल्या कंपनीच्या नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्यातूनच येत गेलेल्या नैराश्याने बालगंधर्व नावाचा तारा क्षितिजावर मावळला. मनाला चुटपूट लावणारे, क्वचित क्षणी डोळे ओलावणारे हे कथानक कुठल्याही शोकांतिकेपेक्षा दोन औंस सरसच आहे.

मागील वर्षीच्या ६२व्या राज्यनाट्य स्पर्धेत गोवा केंद्रातून हे नाटक ४०/४५ कलावंताच्या संचात दुसरे आले. पुढे चंद्रपुरातील अंतिम फेरी देखील या नाटकाने गाजवली. पहिल्या तीन नाटकांमध्ये या नाटकाचा नंबर असणारच, असे चंद्रपुरातील नाट्यरसिक छातीठोकपणे सांगत होते. परंतु अंतिम फेरीतल्या परीक्षकांनी जो निर्णय दिलाय, त्यावर आजही उघड उघड टीका ऐकायला मिळतेय. थोडक्यात न पटणारा निकाल ‘नमन नटवरा’च्याही वाट्याला आला. परंतु या अपयशाने खचून न जाता, गोव्याच्या या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाचे प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

पहिला प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सादर झाला. रसिक प्रेक्षकांचा या प्रयोगास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि तीच गोष्ट मुंबईतील प्रयोगातही दिसून आली. एकही ओळखीचा कलाकार नसलेले व १०० टक्के हौशी असलेल्या रंगकर्मींनी बालगंधर्वांच्या स्मृतींस दिलेला उजाळा, कुठल्याही व्यावसायिक नाट्यकृतीशी साधर्म्य सांगणारा होता. गोव्यातून केवळ नटसंच घेऊन, मुंबईत उपलब्ध झालेल्या नेपथ्यानुरूप व्यावसायिक नाट्यप्रयोग करणे हे दिव्यच असते. हा सर्व डोलारा संबधित राज्यनाट्य स्पर्धेशी निगडित असलेल्या शासकीय यंत्रणेने निदान बघणे व त्यानुरूप कार्यवाही करणे अतिशय गरजेचे आहे, हे मत प्रत्येक प्रेक्षकाचे होते.

बालगंधर्वांवरील नाट्यप्रयोग म्हटल्यावर, त्यात नाट्यपदे असणारच, हे गृहीत धरले होतेच, परंतु बालगंधर्वांनी साकारलेल्या महत्त्वाच्या स्त्री व्यक्तिरेखांची योजना, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगानुरूप व्यक्त होत जातात. प्रमुख पात्रांमध्ये बालगंधर्वांची पत्नी लक्ष्मी आणि गोहरबाई या तिघांच्या नातेसंघर्षाच्या इर्दगिर्द वावरतात. त्यामुळे नाटकातील नाटक ही परियोजना लेखक दत्ताराम कामत बांबोळकर यांनी अतिशय सफाईने हाताळली आहे. मंचावर वावरणाऱ्या बालगंधर्वांच्या स्त्री वेषातील व्यक्तिरेखा प्रसंगांतील बदलांचे देखील काम करतात, त्यामुळे हा दिग्दर्शकीय पैलू प्रसंग अधोरेखित करण्याचे काम पूर्ण नाटकात करतो. या व्यक्तिरेखा नेपथ्यातील बदल सुद्धा तितक्याच सहजपणे घडवितात. नवनाट्याच्या या खुणा सुशांत नायक या तरुण दिग्दर्शकाने जागोजागी पेरल्या आहेत. साधारण १५/२० वर्षांआधीच्या नाटकांचे नायक हे ४० ते ५० या वयोगटातील असत. मात्र नंतरच्या कालखंडात तरुण नायक ही नाटकांची गरज अथवा ट्रेंड म्हणून सेट झाल्याचे दिसून येईल. आजही मराठी रंगभूमीवरील ९० टक्के नाटके तरुण नायकांची आहेत.

परंतु तरुण कलाकारांनी साकारलेले हे नाटक नक्कीच चाकोरी बाहेरील आहे, कारण नाटकाचा बाज हा प्रायोगिक रंगभूमीचा आहे.

प्रकर्षाने उल्लेख करावा, अशी नाटकातील तीन प्रमुख पात्रे, अमोघ बुडकुले यांनी साकारलेले बालगंधर्व, अनुजा पुरोहित यांनी साकारलेली लक्ष्मी आणि ममता शिरोडकर यांनी वठवलेली गोहरबाई कर्नाटकी नाटकाचा डोलारा तोलून धरतात. लक्ष्मी या व्यक्तिरेखेची बालगंधर्वांमुळे झालेली फरपट सिंपथी मिळवून जाते, हे जरी खरे असले, तरी लयाला जाणाऱ्या गंधर्व नाटक कंपनीला व पर्यायाने बालगंधर्वांची गुजराण सुसह्य व्हावी, या हेतूने गोहरबाईने घेतलेले कठोर निर्णय यांमुळे ते पात्र मात्र खलनायकी ठरते. लक्ष्मीला मिळालेली सिम्पथी गोहरबाईला मिळू न शकल्याने, उत्तरार्धातील बालगंधर्व अधिकच एकाकी आणि असहाय्य वाटतात. विशेषतः शेवटचे नाटक नको, निदान त्यांच्या आवाजात भजन तरी श्रोत्यांना ऐकू द्या, हा नाटक कॉट्रॅक्टर आणि गोहरबाई यांच्यातील प्रसंग परिणामकारक ठरतो. अशा एकाहून एक सरस प्रसंगांमुळे नाटक एका अत्युच्च परिणामबिंदूपर्यंत घेऊन जाते व तिथेच नाटकाची मूळ बालगंधर्वांच्या वेशात नांदी सुरू होते.

या नाटकास बऱ्याच सहकलाकारांची साथ लाभली आहे. पैकी उल्लेख व्हावा असे गौतम दामले, डॉ. श्रावणी नायक, रघुराम शानभाग, कनैया नाईक, साहील बांदोडकर, अभिषेक नाईक, अजित केरकर आणि अन्य मंडळीची नाट्यविषयक कमाल प्रगल्भता यात दिसून येते.

अभ्यासकांच्या मते बालगंधर्वांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच गोहरबाईंनी त्यांच्या स्वभावाचा नको तितका फायदा घेऊन, एका रसिकमान्य कलावंतास देशोधडीला लावले. तसेच बालगंधर्वांच्या मनमानी आचरणामुळे दुखावले गेलेले नाट्यरसिक त्यांच्या प्रेतयात्रेसही फिरकले, अशा एक ना अनेक कथा सांगितल्या जातात. त्या खऱ्या की खोट्या यावर वाद न घालता, आयुष्याच्या उत्तरार्धात बालगंधर्वांच्या जीवनाची हेळसांड झाली हे मात्र खरे..!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -