फिरता फिरता – मेघना साने
बाहेर धो धो पाऊस पडत असेल, तर नाटक सुरू होण्यापूर्वी नाटकाचा निर्माता मेकअप रूम ते बुकिंग विंडो अशा फेऱ्या घालत असतो. कलाकार मेकअप करून तयार असले, तरी त्यांना पटवून काही ना काही कारण सांगून प्रयोग थोडा उशिरा सुरू करायचे ठरवतो. अर्ध्याहून अधिक खुर्च्यांचे बुकिंग झाल्याशिवाय निर्मात्याला प्रयोग कसा परवडेल? त्यात पावसामुळे काही प्रेक्षक उशिरा येण्याची शक्यता असते. एकदा अपेक्षित बुकिंग लाईन क्रॉस झाली की, मग तिसरी घंटा दिली जाते.
ऑस्ट्रेलयातील ‘मासि’च्या नाट्य उत्सवात असे काहीच झाले नाही. दर वर्षीप्रमाणे MASI म्हणजे ‘मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड’ या सिडनीत मराठी जनांना एकत्र आणण्यासाठी निर्माण केलेल्या संस्थेतील कोणत्याही कार्यक्रमात मराठी रसिकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. १ जून २०२४ रोजी ‘त्रिवेणी’ एकांकिका विशेष कार्यक्रमासाठी मासिने चेरिब्रुक कम्युनिटी हॉल बुक केला होता. तिथे तीन मराठी एकांकिका होणार असे जाहीर केले होते. धो धो पाऊस पडत असतानाही रसिकांनी या नाटकांसाठी तो हाऊसफूल्ल केला होता. कारण जगाच्या पाठीवर कोठेही मराठी माणसाला नाटकाचे वेड हे असतेच आणि या एकांकिकांमध्ये तर सारी स्थानिक मंडळी विविध भूमिका करणार होती. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच तर मासिची ही योजना असते आणि प्रेक्षक ही संकल्पना पुरेपूर उचलून धरतात.
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये अनेक मराठी मंडळी कलाकार आहेत, दिगदर्शकही आहेत. त्यांनी तेथे काही नाट्यसंस्था निर्माण केल्या आहेत. या त्रिवेणी एकांकिका विशेष कार्यक्रमात ‘रंगसाधना परफॉर्मिंग आर्ट्स, सिडनी’तर्फे लेखक दिलीप प्रभावळकर यांची ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही एकांकिका सादर झाली. आशीर्वाद आठवले यांनी ती दिग्दर्शित केली होती. ‘सिडनी नाटक मंडळी’ यांनी लेखक शं. ना. नवरे यांची ‘काला पहाड’ ही एकांकिका सादर केली. सचिन भावे आणि योगेश पोफळे यांनी या एकांकिकेचे दिग्दर्शन केले होते, तर ‘कलासक्त’ संस्थेने सिडनीस्थित अतुल साठे लिखित, आदित्य पाटणकर दिग्दर्शित ‘आपला तो बाब्या’ ही एकांकिका सादर केली. रसिकांना वेगवेगळ्या रसांची मेजवानीच मिळाली.
परदेशातील रंगभूमीवर मराठी एकांकिका सादर करायच्या म्हणजे सोपे काम नसते. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या एकांकिकेतील एक कलाकार नीलिमा बेर्डे म्हणाल्या, “रंगभूषा, कपडेपट, संगीत, ध्वनी प्रकाशयोजना एवढेच काय तर नाटकाचा सेटसुद्धा तेथील संस्थेतील जाणकार मंडळीच तयार करतात. रंगभूमीवर आणि बॅकस्टेजला काम करण्यासाठीसुद्धा सभासदांची टीम उभी असते.” तीन एकांकिका पाठोपाठ असल्यामुळे, तीन वेगवेगळे सेट्स कमीत कमी वेळात मांडावे व काढावे लागले. हे आव्हानसुद्धा या नाट्यसंस्थांनी घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणे अशा कामांसाठी कुशल व पगारी माणसे मिळत नाहीत. मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करणारी ही मंडळी पडेल ते काम करून, रंगदेवतेचरणी आपली सेवा देत असतात.
हॉलसुद्धा भाड्याने घेतलेला असतो. त्यात सामान लावणे आणि नंतर तो हॉल पूर्ववत स्वच्छ करून मालकांच्या ताब्यात देणे हेही संस्थेच्या सभासदांनाच करावे लागते. पण हे सर्व आनंदाने करतात. कशासाठी? मराठीसाठी!
सिडनीमधील स्थानिक कलाकार सादर करणार असलेले संगीत ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची तालीम जोरात सुरू आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १० ऑगस्टला होणार आहे.
‘महाराष्ट्र मंडळ सिंगापूर’तर्फे मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. ‘शब्दगंध’ हा स्वरचित काव्याचा बहारदार कार्यक्रम गेली १७-१८ वर्षे सुरू आहे. या कार्यक्रमासाठी मंडळाचा एखादा रसिक सभासद आपल्या घरी ३०-३५ मराठी कवींना आमंत्रण देतो. मग एक बहारदार कविसंमेलन तेथे सादर होते. कधी कधी यात गाणीही सादर केली जातात. उत्तम निवेदकांना संधी दिली जाते. तास-दोन तास कार्यक्रम रंगल्यानंतर यजमानाच्या घरी सर्व जण घरगुती जेवणाचा एकत्र आनंद घेतात. कवितांबरोबरच आज काय मेनू असेल, याचीही सर्वांना उत्सुकता असते.
अशा कार्यक्रमांमुळे मराठी जनांचे आपल्या भाषेतील आदानप्रदान तर वाढतेच, शिवाय एकोप्याची भावना वाढीस लागते.
आणखी एक सुंदर उपक्रम म्हणजे ‘ऋतुगंध.’ सिंगापूर महाराष्ट्र मंडळाने लेखकांना एक व्यासपीठ मिळावे आणि साहित्याची निर्मिती व्हावी म्हणून निर्माण केलेले हे ई-मासिक आहे. ‘ऋतुगंध’ त्रैमासिकाच्या सध्याच्या संपादिका मोहना कारखानीस सांगत होत्या, “दर तीन महिन्यांनी निघणाऱ्या या मासिकासाठी एक विषय ठरवला जातो. एखाद्या विषयावर लिहिताना अनेक लेखकांची प्रतिभा किती विविध प्रकारे चालते, हे पाहणे आनंददायी असते.” ‘ऋतुगंध’ हा ई-अंक असला, तरी याचे प्रकाशन मात्र महाराष्ट्र मंडळातर्फे हॉल घेऊन केले जाते. स्क्रीनवर प्रकाशन केल्यानंतर त्याच मासिकातील काही लेखकांना आपले साहित्य सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळते. ‘ऋतुगंध’ हा लेखक आणि वाचक यांच्यामधील दुवा आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र मंडळ, सिंगापूरचे अध्यक्ष सचिन गांजापूरकरही उपस्थित असतात. भाषा ही कानावर पडली पाहिजे, वाचली गेली पाहिजे, तिच्यात नवीन नवीन प्रयोग झाले पाहिजेत, तरच तिचे परदेशात जतन आणि संवर्धन होईल यावर त्यांचा विश्वास आहे. लेखक आणि संपादक मंडळींनी अतिशय परिश्रम घेऊन, हा उपक्रम गेली १८-१९ वर्षे सुरू ठेवला आहे. कशासाठी? मराठीसाठी!
(क्रमश:) [email protected]