Wednesday, June 26, 2024
Homeअध्यात्मअट्टहासाने नामस्मरण करावे

अट्टहासाने नामस्मरण करावे

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नामाइतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो; असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच अहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू, याची नाही काळजी करू.

भगवंताची सत्ता जाणली की, त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की, तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण? याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात, म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण, निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचासुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळीवाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे, यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केले, तर मी भगवंताचा होईन? अशी तळमळ लागावी. ती न लागली, तर आपले चुकले, वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो.

जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की, जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे, आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे, तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच, की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिथे-तेथे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता, आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा.

भगवंताचे नाम घेणे, हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की, आत्मज्ञान आपोआप होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -