Friday, October 4, 2024
Homeअध्यात्मMargashirsha Vrat : मार्गशीर्ष व्रत करायचंय? महिनाभर मटण मच्छी खायची की नाही?

Margashirsha Vrat : मार्गशीर्ष व्रत करायचंय? महिनाभर मटण मच्छी खायची की नाही?

जाणून घ्या यंदाचा पहिला गुरुवार, मार्गशीर्ष व्रताची पूजा आणि पद्धतीबद्दल…

हिंदू धर्मात (Hindu religion) प्रत्येक महिन्याला एक विशेष महत्त्व आहे. आपल्यासोबत चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येणारा श्रावण (Shrawan) महिना हा भगवान शंकराला समर्पित केला जातो. तर अश्विन महिना श्रीविष्णूला समर्पित केला जातो. त्याचप्रमाणे काही दिवसांत सुरु होणारा मार्गशीर्ष महिना कृष्णाला समर्पित आहे. या महिन्यात अनेक सुवासिनी दर गुरुवारी मार्गशीर्ष व्रत करतात. त्यासोबत अविवाहित कन्या आणि पुरुषही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख-समृद्धी येते. पण काहीजणांना व्रत करण्याची इच्छा असूनही व्रताची नेमकी पद्धत माहित नसते. या लेखात आम्ही तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील यंदाचा पहिला गुरुवार, मार्गशीर्ष व्रताची पूजा आणि पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत.

कधी सुरु होणार यंदाचा मार्गशीर्ष महिना?

पंचांगानुसार बुधवारी १३ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. तर ११ जानेवारीला मार्गशीर्ष मास समाप्त होणार आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार १४ डिसेंबरला असणार आहे. खालीलप्रमाणे प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत (Mahalaxmi Vrat) केले जाईल :-
१४ डिसेंबर- महालक्ष्मी व्रतासाठी पहिला गुरुवार

२१ डिसेंबर- महालक्ष्मी व्रतासाठी दुसरा गुरुवार

२८ डिसेंबर- महालक्ष्मी व्रतासाठी तिसरा गुरुवार

४ जानेवारी- महालक्ष्मी व्रतासाठी चौथा गुरुवार

कशी करावी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत?

सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. श्रीगणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि व्रत-उपासनेचा संकल्प करा. चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाका. आता कलशावर पाच विड्याची, आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा आणि त्यावर कलश स्थापित करा.

आता हळद-कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा. त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सजवा. फुले, हार, अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा. देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळे अर्पण करा. व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका. देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.

या दिवशी महिला दिवसभर उपवास ठेवतात आणि रात्री सोडतात. सकाळी आणि सायंकाळी घटाची पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रमाचे आयोजन करतात. सुवासिनी महिलांना हळदी कुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. असे केल्याने सौभाग्य लाभतं अशी मान्यता आहे.

मार्गशीर्ष महिन्यात व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा. त्यामुळे व्रतधारी महिला संपूर्ण महिनाभर सात्विक आहारच पसंत करतात. या महिन्यात मटण मच्छी शक्यतो टाळली जाते. परंतु हल्ली कामाच्या गडबडीत शरीराला प्रथिनांची गरज जास्त असते, तसेच जीभेवर ताबा मिळवणे कठीण होते. त्यामुळे काहीजण गुरुवार वगळता अन्य दिवशी सर्रास मांसाहार करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -