हिंदू सण समारंभांमध्ये (Hindu Festivals) बुद्धीची देवता गणपतीला (Ganpati) विशेष महत्व आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीला वंदन केले जाते. महाराष्ट्रात गणपतीची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा दीर्घ असा इतिहासही आहे. त्यात प्रत्येक गणेशभक्ताने एकदा तरी करावी ती म्हणजे अष्टविनायक यात्रा (Ashtavinayaka Darshan). अष्टविनायक या शब्दाचा अर्थच आठ गणपती असा होतो. अशी ही स्वयंभू गणपतीची आठ देवळे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. या आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ट असून ती मनाला सुखावह वाटतात. या आठ मंदिरांपैकी पाच मंदिरे पुणे जिल्ह्यात, दोन रायगड जिल्ह्यात तर एक मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
महाराष्ट्रातच सर्व मंदिरे स्थित असल्याने अष्टविनायक यात्रेसाठी जास्तीत जास्त तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पाच दिवसांच्या दिवाळीनंतर उर्वरित सुट्टीत आपण अष्टविनायकांचे दर्शन नक्कीच घेऊ शकतो. आपल्या रूढी परंपरेनुसार असे म्हटले जाते की, अष्टविनायक यात्रा ही योग्य क्रमाने व शास्त्रोक्त पद्धतीने केली तर ती लाभदायक आणि सफल होते. या लेखात आम्ही तुम्हाला ही यात्रा कशी करावी, अष्टविनायकांची नावे काय आहेत या सगळ्याबद्दल माहिती देणार आहोत.
१. मोरगांवचा मोरेश्वर गणपती (Moreshwar)
महाराष्ट्रातील आठ अष्टविनायकांपैकी पहिल्या क्रमांकाचा गणपती आहे मोरेश्वर. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरेश्वराच्या दर्शनाने केला जातो. मोरेश्वर गणपतीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव या गावात आहे. हे पुण्याच्या आग्नेय दिशेला स्थित आहे. हे मंदिर बारामतीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे.
२. थेऊरचा चिंतामणी गणपती (Chintamani)
महाराष्ट्रातील आठ अष्टविनायकांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गणपती आहे चिंतामणी. चिंतामणी गणपतीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर याठिकाणी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर स्थित आहे.
४. सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak)
अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा गणपती आहे सिद्धिविनायक. सिद्धिविनायक गणपती मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी आहे. हे मंदिर भिमानादीकाठी वसले आहे.
४. रांजणगावचा महागणपती (Mahaganpati)
अष्टविनायकांपैकी चौथ्या क्रमांकाचा गणपती आहे महागणपती. महागणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही रांजणगाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी स्थित गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे.
५. ओझरचा विघ्नेश्वर गणपती (Vighneshwar)
पाचव्या क्रमांकाचा गणपती आहे विघ्नेश्वर. विघ्नेश्वर गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी आहे. हे गणपती मंदिर पुण्यापासून सुमारे ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहे.
६. लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती (Girijatmaja)
सहाव्या क्रमांकाचा गणपती आहे गिरिजात्मज. गिरिजात्मज गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या ठिकाणी आहे. लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. हे गणपती मंदिर पुण्यापासून सुमारे ९८ किलोमीटर अंतरावर आहे.
७. महडचा वरदविनायक गणपती (Varadvinayak)
सातव्या क्रमांकाचा गणपती आहे वरदविनायक. वरदविनायक गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड या ठिकाणी आहे. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
८. पालीचा बल्लाळेश्वर गणपती (Ballaleshwar)
आठव्या क्रमांकाचा गणपती आहे बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणी आहे. हे मंदिर पुण्यापासून १११ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. तर रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे.