Tuesday, May 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांचा राजीनामा फेटाळला!

शरद पवारांचा राजीनामा फेटाळला!

कमिटीचा निर्णय पवार मान्य करणार का?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली.

आज सकाळी ११ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिटीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर काही नेत्यांची नावे या कमिटीमध्ये होती. या कमिटीच्या बैठकीत एकमताने शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय फेटाळून लावण्यात आला आहे.

आता अजित पवार, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओककडे रवाना झाले आहेत. तेथे पवारांची भेट घेऊन ते राजीनामा नामंजूर केल्याची माहिती त्यांना देणार आहेत.

प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पवारांच्या राजीनाम्याचा ठराव एकमताने नामंजूर करण्यात आला. ठरावात लिहिले आहे की, ‘आदरणीय शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र तो एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे अशी विनंती करण्यात येत आहे’. बैठकीत हा ठराव मंजूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.

छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “शरद पवारांना निर्णय मागे घ्यावाच लागेल, कारण हा जनतेचा आक्रोश आहे. आमचं म्हणणं पवारांना ऐकावंच लागेल’.

सुनिल तटकरे म्हणाले की, “कार्यकर्त्यांचं म्हणणं शरद पवार समजून घेतील आणि निर्णय मागे घेतील”. “आता सस्पेन्स उरला नाही, समितीचा निर्णय पवार मान्य करणार”, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं

दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र माध्यमांशी जाहीरपणे काहीच बोलल्या नाहीत. त्या कार्यकर्त्यांना भेटायला जाते असं सांगून गेल्या पण काहीच मत व्यक्त केलेलं नाही. त्या थेट सिल्व्हर ओकवर पोहचल्या. त्यामुळे या निर्णयाबद्दल सुप्रिया सुळेंचे मत अद्याप कळू शकलेले नाही.

समितीने घेतलेला हा निर्णय शरद पवार मान्य करतील का हा आता मोठा प्रश्न आहे. यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार हे आपला राजीनामा मागे घेणार की दुसऱ्या कुणाची नियुक्ती करणार, हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. आज अधिकृतरित्या शरद पवार याबद्दल आपलं मत मांडण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -