Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

राजापूर : बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रानतळे येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

उद्धव ठाकरे ६ मे ला बारसूचा दौरा करणार आहेत. यावेळी ते आंदोलकांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. उद्धव ठाकरे उद्या शनिवारी आंदोलकांची भेट घेणार आहे. रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संमती पत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी राजापुरमधील विविध ५१ संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशीच भाजप-शिवसेना शिंदे गटातर्फे बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे समजते.

दरम्यान यासंदर्भात बुधवारी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी बारसूबाबत भूमिका स्पष्ट केली. प्रकल्प चांगला असेल तर स्थानिकांसमोर प्रकल्पाचे प्रेझेंटेशन द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. आता सभेची परवानगी नाकारल्यामुळे आता ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -