Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

विवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती :शिबानी जोशी

सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या भागात जाणून घेतली. या भागात त्यांच्या अन्य काही कामांची माहिती घेणार आहोत. वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन करायचं ठरवल्यावर, वैद्यकीय सेवा देता देताच, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानला समाजातल्या सर्व वर्गातले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नही दिसू लागले. त्यातूनच इतर उपक्रम सुरू करण्याचं निश्चित झालं. यात लहानपणापासून वार्धक्यापर्यंत सामोरं जाव्या लागणाऱ्या समस्यांवर उपाययोजना हाती घेण्यात येऊ लागल्या. म्हणजे  महिलांना आत्मनिर्भर बनवणे, आजारी माणसांची सुश्रुषा, वृद्धांसाठी वेगळं संगोपन, आरोग्य शिबीर, नर्सिंग कॉलेज अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

‘संजीवन लिंक वर्कर’ ही योजना संस्थान महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईसह सुरू केली आहे. ही स्कीम एप्रिल २०१७ पासून सांगली जिल्ह्यातील १०० गावांत सुरू असून, प्रकल्पात २४ कर्मचारी काम करीत आहेत. या प्रकल्पांतर्गत एच. आय. व्ही.बाबत जनजागृती केली जाते. त्यासाठी आधी गावातील तरुण मंडळी, महिला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही व एड्सविषयी प्रबोधन व प्रशिक्षण दिले जाते. विद्यालय व महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना एच. आय. व्ही एड्सविषयी प्रबोधन केले जाते. गावात आरोग्य शिबिरे घेऊन ट्रक ड्रायव्हर्स, सेक्स वर्कर्स, विस्थापित कामगार वर्ग तसेच तृतीयपंथी यांची एच. आय. व्ही.ची तपासणी करणे, मोफत निरोध वितरण (कंडोम) केंद्र स्थापन करणे, टोल फ्री नंबर १०९७ चा प्रचार करून  एच. आय. व्ही.विषयी माहिती घेण्यास प्रवृत्त केले जाते. तसेब एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीला एआरटी औषधोपचारासाठी सातत्याने मदत केली जाते. एड्सबाबतचे खूप मोठे काम जिल्ह्यात सातत्याने सुरू आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

सर्व गावांत ‘संजीवन लिंक वर्कर’ स्थानिक समितीची स्थापना केली आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २५ लाख लोकांपर्यंत संपर्क केला आहे. आजपर्यंत ७५ हजार जणांची मोफत रक्त तपासणी केली आहे. त्यामधून २२८ नवीन एच. आय. व्ही. बाधित रुग्णांची नोंद झाली होती. कोविडनंतर विशेष करून, आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता सर्वत्र जाणवू लागली आहे. संस्थानलाही ती जाणवू लागली आणि त्यातूनच लक्ष्मी प्रभा नर्सिंग इन्स्टिट्यूट  सुरू करण्याचे ठरले. प्रशिक्षित  स्टाफची वाढती गरज लक्षात घेऊन, संस्थेने २०११ साली लक्ष्मीप्रभा नर्सिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. त्याशिवाय स्थानिक विद्यार्थिनींना रोजगारही उपलब्ध होईल, हादेखील एक हेतू होता. यामध्ये शासनमान्य ए. एन. एम. हा नर्सिंग कोर्स सुरू केला आहे.

इन्स्टिट्यूटचे बामणोली येथे विद्यार्थीनींसाठी वसतिगृह व मेस आहे. आजपर्यंत आठ ते नऊ जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनींनी हा कोर्स  पूर्ण केला आहे. या विद्यार्थिनींना  विवेकानंद हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाते. नर्सेस देशभरात विविध शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कुशाल काम करत आहेत व त्यातून पूर्णपणे आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. भविष्यामध्ये जी. एन. एम. व बी. एस्सी. (नर्सिंग) हे कोर्सेस सुरू करण्याचे प्रयोजन आहे. शिवाय विवेकानंद कौशल्य प्रशिक्षण संस्थेमार्फत  शासन मान्यता प्राप्त ३ कोर्सेस चालवले जातात. त्यामध्ये ओ. टी. टेक्निशियन, आय. सी. यू. टेक्निशियन व सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केअर हे कोर्सेस चालवले जातात. आजपर्यंत १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. रुग्णालयात प्रत्यक्ष कामाच्या अनुभवामुळे या विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होते व त्यांना तत्काळ नोकरी मिळते.

‘विद्यार्थी पालकत्व योजना’ ही एक वेगळ्या प्रकारची योजना राबवली जात असून, ज्या मुला-मुलींना वडील किंवा आई-वडील दोन्ही नाहीत, अशा मुलांचे पालकत्व संस्थेमार्फत स्वीकारले जाते. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, स्टेशनरी, युनिफॉर्म तसेच इतर लागणारा खर्च संस्थेमार्फत केला जातो.  करीअर मार्गदर्शन, सहल, दिवाळीनिमित्त ड्रेस व खाऊ वाटप केले जाते. अनेक चांगल्या आस्थापनांमध्ये या योजनेतील लाभार्थी  आता नोकरीत असून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत. आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त अनाथ विद्यार्थी या योजनेच्या लाभातून लाभान्वित झाले आहेत.

३१ जानेवारी २०१२ रोजी  ‘फिरता दवाखाना’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे वृद्ध, अपंग, गरोदर स्त्रिया तसेच अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांना आरोग्यसेवा पुरवल्या जातात. महिन्यातून एकदा प्रत्येक गावी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. शिबिरांमध्ये लोकांच्या विविध रक्त तपासण्या, डोळे, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार इत्यादींचे निदान व उपचार केले जाते. वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी, आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. गावातील  समाजसेवक, सरपंच, उपसरपंच या उपक्रमात आपला हातभार लावत असतात. सध्याच्या फिरत्या दवाखान्याद्वारे दहा वर्षांमध्ये २५० पेक्षा जास्त आरोग्य शिबिरांचे आयोजन झाले आहे. फिरता दवाखाना प्रकल्पामुळे ३,००,००० पेक्षा जास्त रुग्णांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. ३० गावे आणि वस्त्यांमध्ये विवेकानंद प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना जातो. रुग्णांची तपासणी व औषधोपचार निशुल्क केले जाते.

अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. तसेच सतपात्री दान व्हावे, या हेतूने  अन्नपूर्णा  योजनेअंतर्गत विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मोफत भोजन दिले जाते. रोज सरासरी ७० ते १०० रुग्णांना व नातेवाइकांना याचा लाभ मिळत आहे. विवेकानंद पुस्तक प्रदर्शनी हा आगळा उपक्रम आहे. रुग्णांसाठी ही पुस्तक प्रदर्शनी वेटिंग हॉलमध्ये करण्यात आली आहे. या पुस्तक प्रदर्शनीतील पुस्तकांची निवड ही विवक्षित पद्धतीने केली आहे. राष्ट्रीय विचारांचा प्रसार होईल, अशी पुस्तके वाचायला ठेवली आहेत. ही पुस्तके कोणाला हवी असेल, तर त्याची प्रतिष्ठानमार्फत विक्रीही केली जाते. मिरज तालुक्यातील कवलापूर जवळ असणारे किसानपूर गावाचे सर्वेक्षण संस्थेने केले होते. त्यावेळी  लक्षात आले की, आरोग्याबाबत गाव दुर्लक्षित होते आणि म्हणून संस्थेने ग्रामस्थांशी चर्चा करून किसानपूर हे गाव स्वस्थ ग्राम या आरोग्य भारतीच्या योजनेअंतर्गत दत्तक घेतले. गावात आरोग्याबरोबर शिक्षण, पर्यावरण इत्यादी विषयांवरही काम सुरू आहे. विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व हिरवळ ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्षारोपण केले. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन केले जाते.

वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन  घडवणाऱ्या या संस्थेला त्यांचे विविध क्षेत्रांतील काम पाहून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००७ ला युनिसेफ पुरस्कार, २००७-०८ आदर्श संस्था पुरस्कार, २००९-१० बेस्ट वॉलेंटरी ऑर्गनायझेशन पुरस्कार, २०१०-११ साली मानव संसाधन व विकास मंत्रालय नवी दिल्लीतर्फे पुरस्कार, २०११-१२ ला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुरस्कार, २०१२-१३ ला लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून पुरस्कार, २०१६ ला समर्पण पुरस्कार बँक ऑफ बडोदा, डी. ए. पी. सी. यू. (एम्सॅक्स) पुरस्कार, २०२१ साली राज्य सरकारचा कोविड काळात बेस्ट सेवा पुरस्कार फॉर कोविड, २०२१ साली बाबूराव मोरे पुरस्कार, साप्ताहिक विजयांततर्फे इदं व सम पुरस्कार, वासुदेव बळवंत फडके पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी संस्थेच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय अजूनही काही वैशिष्ट्यपूर्ण योजना संस्थेतर्फे राबवल्या जातात आणि भविष्यातही अजून या योजनांचा विस्तार आणि नवीन योजना सुरू करण्याचा विचार आहे, तो जाणून घेऊया पुढच्या भागात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -