Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीChaitra Amavasya 2024 : चैत्र अमावस्येला आवर्जून करा 'ही' कामं, मिळेल पुण्यप्राप्ती!

Chaitra Amavasya 2024 : चैत्र अमावस्येला आवर्जून करा ‘ही’ कामं, मिळेल पुण्यप्राप्ती!

जाणून घ्या तिथी, वेळ आणि महत्त्व

मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya) म्हणतात. हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. हा दिवस पितरांच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी स्नान, दान आणि अनेक धार्मिक कार्य केली जातात. तसेच या दिवशी घातलेलं श्राद्ध आणि ब्राम्हण भोजनामुळे पितरांना शांती मिळते व त्यांचा आशीर्वाद लाभतो.

त्याचबरोबर या चैत्र अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात, असं मानलं जातं. या दिवशी जादूटोणा, तंत्र-मंत्र, साधना-सिद्धी प्राप्त करणे यासारखी कामं केली जातात. त्यामुळे अमावस्येला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे. यंदा ही चैत्र अमावस्या बुधवारी, ८ मे रोजी आहे. जाणून घ्या यंदाची चैत्र अमावास्येची अचूक तिथी, वेळ, महत्त्व आणि यादिवशी कोणती योग्य कामं केली पाहिजे व कोणती नाही.

चैत्र अमावस्या तिथी –

अमावस्या प्रारंभ : ७ मे रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटे
अमावस्या समाप्ती : ८ मे रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटे

चैत्र अमावस्या तिथी ७ मे रोजी सुरु होत असली तरी ती ८ मे रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात उदयतिथीला महत्त्व आहे आणि त्यामुळेच उदयतिथीनुसार, यंदा चैत्र अमावस्या बुधवारी ८ मे रोजी साजरी केली जाईल.

चैत्र अमावस्या महत्त्व –

राहू-केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा मोक्ष तर होतोच, पण पितृदोषही दूर होतो. या दिवशी केलेले काही उपाय कालसर्प दोषापासूनही मुक्ती देतात.

चैत्र अमावस्येला करा ‘ही’ शुभ कामं-

  • चैत्र अमावस्येला उपवास करावा. यामुळे अध्यात्मिक शिस्त लागते. आत्म-नियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.
  • चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता. या शुभ दिवशी उदारता आणि निःस्वार्थता दाखवणं शुभ मानलं जातं. पितृदोष निवारणासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावं.
  • या दिवशी तुमचं मन शांत ठेवा. तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या. वाईट विचारांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा. दिवाबत्ती, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा.
  • चैत्र अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ टाकून अंघोळ केल्याने शनिदोष दूर होतात. या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रह दोष दूर होतात.
  • अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करावं, यामुळे पितरांना मुक्ती मिळते. तसेच चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात.
  • मंत्रजप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. यामुळे पितरांना मुक्ती मिळते.

चैत्र अमावस्येच्या दिवशी चुकूनही ‘ही’ कामं करु नका

  • अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे अशुभ ठरतं, त्यामुळे मांसाहार टाळा. त्याऐवजी, सात्विक (शुद्ध) शाकाहारी जेवण जेवा.
  • अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घराच क्लेश करू नका, वाद घालू नका. नकारात्मक विचार करू नका. दारू किंवा तंबाखूचं सेवन करू नका.
  • चैत्र अमावस्येला केस किंवा नखे ​​कापू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते आणि शुभकार्यात व्यत्यय येण्यास सुरुवात होते.
  • अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं.
  • नवीन गोष्टींच्या खरेदीसाठी अमावास्येचा दिवस चांगला मानला जात नाही. या दिवशी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन वाहन आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं टाळावं.
  • अमावस्येच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं. गृहप्रवेश, मुंडन, साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणं या दिवशी टाळावं.

(या गोष्टी केवळ ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. ‘प्रहार’ या गोष्टींची पुष्टी करत नाही. )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -