Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSaint Dnyaneshwar : ज्ञानियांचा राजा गुरू महाराव

Saint Dnyaneshwar : ज्ञानियांचा राजा गुरू महाराव

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरीतील प्रत्येक प्रसंग समजावून सांगताना ‘ज्ञान’देव अत्यंत साध्या, सोप्या आणि परिणामकारक दाखल्यांनी श्रोत्यांना ‘ज्ञान’ देतात. म्हणूनच संत तुकारामांनी ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव’ असा ज्ञानदेवांचा केलेला गौरव सार्थ ठरतो.

एक शोभादर्शक (कॅलिडोस्कोप) असतो, त्यातून रंग आकारांचे किती पैलू सापडतात! ज्ञानदेव आपल्यापुढे जणू असा शोभादर्शक धरतात आणि त्यातून तत्त्वविचारांची सुंदर चित्रमालिका साकारतात! म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ वाचणं हा एक अपूर्व आनंददायी अनुभव! त्यात अठराव्या अध्यायात तर त्यांच्या वाणीला अधिकच रसवंती लाभते. ‘स्वतःचा धर्म पाळावा, इतरांचा धर्म कितीही चांगला वाटला तरी त्याकडे जाऊ नये’, ही त्यातील शिकवण! ती देताना त्यांनी सांगितलेला माय-मुलाचा एक दाखला आपण मागच्या लेखात पाहिला. पण ज्ञानदेव केवळ तिथे थांबत नाहीत, ते एकापेक्षा एक सरस दाखल्यांची जणू चित्रमालिका आपल्यापुढे उभी करतात! त्यात किती अर्थपूर्णता आहे! त्याने आपण अवाक होतो.

‘अरे इतर स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी बालकाला त्या काय करायच्या आहेत?’
येरी जिया पराविया।
रंभेहुनि बरविया।
तिया काय कराविया। बाळकें तेणें। ओवी क्र. ९२८

हा एक बोलका दृष्टान्त! सौंदर्याचं आकर्षण कोणाला नसतं? रंभा ही ‘अप्सरा’. साहजिक रंभेसारख्या स्त्रीकडे मन ओढलं जाणार, हा मानवी स्वभाव ओळखून ज्ञानदेव श्रोत्यांना जागं करतात, सावध करतात. बाबांनो, रंभेकडे (परधर्माकडे) धावू नका; आपल्या आईकडे (स्वधर्माकडे) पाहा. हा उपदेश ज्ञानदेवांच्या या दाखल्यामुळे स्पष्ट, ठसठशीत होतो.

पुढे ज्ञानदेव मानवी सृष्टीकडून जलचर सृष्टीकडे वळतात. ‘अरे, पाण्याहून तूप गुणांत खरोखर श्रेष्ठ आहे; परंतु माशाला त्याचा काय उपयोग?’
‘अगा पाणियाहूनि बहुवें।
तुपीं गुण कीर आहे।
परी मीना काय होये। असणें तेथ॥ ओवी क्र. ९२९

स्वतःचा धर्म हा पाण्यासारखा. मासा म्हणजे संसारी जन! किती सार्थ उपमा आहे! मासा पोहत असतो. त्याप्रमाणे सामान्यजन संसारसागरात पोहत असतात. या माशाला तुपाचा (म्हणजे इतरांच्या धर्माचा) काही उपयोग नाही, म्हणून माणसाने पाण्याप्रमाणे स्वाभाविक असा स्वतःचा धर्म आचरावा.
आता माणसांच्या मनात शंका असते की, हा स्वधर्म पाळताना कष्ट होतात. त्यावर ज्ञानदेवांचं उत्तर असं – ‘कुठलेही कर्म करताना कष्ट होतातच, मग स्व-धर्म का करू नये?’ माणसाच्या मनातील शंकेला ज्ञानदेव अर्जुनाच्या निमित्ताने पुन्हा एक दिशा देतात. तो दाखला असा –

‘धनंजया हे बघ – वाटेने जाताना पदरात शिळा बांधली किंवा शिदोरी बांधली तरी जसे ओझे सारखेच होते; परंतु ज्याने विसाव्याचे ठिकाणी सुखद होईल तेच घ्यावे.’
पैं शिळा कां सिदोरिया।
दाटणें एक धनंजया।
परी जें वाहतां विसांवया। मिळिजे तें घेपे॥ ओवी क्र. ९३८

सिदोरिया म्हणजे शिदोरी (फराळाचे), शिळा म्हणजे मोठा दगड तर विसांवयाचा अर्थ विसाव्याचे ठिकाणी… इथे वाट म्हणजे माणसाचा जीवनप्रवास/ आध्यात्मिक प्रवास होय. शिळा म्हणजे दुसऱ्याचा धर्म (कर्तव्य); तर शिदोरी म्हणजे स्वत:चे कर्तव्य होय. शिदोरी ही माणसाचं पोषण करते, तर शिळा ही माणसाला भारभूत होते. अशा साध्या, सोप्या आणि अत्यंत परिणामकारक दाखल्यांनी ‘ज्ञान’देव श्रोत्यांना ‘ज्ञान’ देतात.
‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें।
असे म्हणून संत तुकारामांनी केलेला त्यांचा गौरव म्हणूनच सार्थ वाटतो.

(manisharaorane196@ gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -