- समर्थ कृपा : विलास खानोलकर
पुण्याच्या पांडुरंग बापूजी जाधववर ईश्वरी क्षोभ होऊन तीन महिन्यांत त्यांची चार मुले एका पाठोपाठ एक वारली. संतान नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते. त्यांची पत्नी भागूबाई भाविक होती. तिच्या ऐकण्यात श्री स्वामी समर्थांचे चरित्र आले. तिची श्री स्वामीचरणी भक्ती जडली. ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचे ध्यान आणि नामस्मरण करू लागली. तिने श्री स्वामी समर्थांची एक तसबीर मिळवून ती त्यांची नित्य पूजा करू लागली. तिच्या ध्यानधारणेत कोणी व्यत्यय आणला, तर तिला मोठे दुःख होत असे. एके दिवशी श्री स्वामी महाराज तिच्या स्वप्नात आले व तिला विचारले, “मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील?” त्यावर तिने उत्तर दिले, “मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन! दोनशे ब्राह्मण अक्कलकोटात जेवू घालीन!”
या स्वप्नदृष्टांतानंतर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली. पण सातव्या महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली. त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली. तिने श्री स्वामींची कळवळून प्रर्थना केली की, “महाराज मला दगा देऊ नका, मजकडे चांगले लक्ष द्या! माझे गणगोत आई-बाप आपणच आहात!” त्याच रात्री “काही घाबरू नकोस!” असे श्री स्वामींनी तिला दृष्टांतात सांगितले.
यापुढे नऊ महिने झाल्यावर चैत्र शु. १२ शके १७७६ (इ.स. १८९४ ) रोजी ती बाळंत होऊन तिला पुत्र झाला. काही दिवसांनी तिला दृष्टांत झाला की, श्री स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी त्यांची सेवा करीत आहेत. तेव्हा श्री स्वामी महाराज बाईस म्हणाले, “मुलगा झाला, आता आम्हास सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे!” असा दृष्टांत झाला.
सारांश : श्री स्वामी समर्थांनी इ.स. १८७८ साली अक्कलकोट येथे समाधी घेतल्यानंतर ही लीला घडली आहे. सगुण स्वरूपातील श्री स्वामी समर्थ जरी समाधिस्त झालेले असले तरी त्यांची अनन्यभावाने भक्त करणाऱ्यास ते स्वप्नदृष्टांत देऊन सद्यस्थितीतही मार्गदर्शन व साहाय्य करतात. कुणाच्याही माध्यमातून का होईना हस्ते-परहस्ते मदत करतात. संकट, पीडा, दुःखाची तीव्रता कमी करतात. त्यापैकी एक पांडुरंग बापूजी जाधवाचे उदाहरण आहे. अशी शेकडो नव्हे, तर हजारो उदाहरणे आहेत. त्या दोघा पती-पत्नीवर एक-दोन महिन्यांच्या कालावधीत चार मुलांच्या मृत्यूचा आघात झाला; परंतु यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्याची पत्नी भागूबाई भाविक होती. श्री स्वामी समर्थ या अवतारी विभूतीचे महत्त्व, त्यांच्या अनेक लीला तिच्या ऐकण्यात आल्या. तिने त्यावेळी श्री स्वामींची तसबीर खटपट करून मिळविली. ती त्या तसबिरीसमोर बसून स्वामींचे सदैव ध्यान आणि नामस्मरण करू लागली. याचेच फळ म्हणून श्री स्वामींनी तिला स्वप्नदृष्टांत देऊन ‘मुलगा’ देण्याचे अभिवचन दिले. “तू मला काय देशील?” असे श्री स्वामींनी तिला विचारताच त्या साध्या-भोळ्या-भाविक भागूबाईने दिलेले उत्तरही मोठे प्रंजळ आहे. ती म्हणाली, “मुलगा झाल्यावर महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन! दोनशे ब्राह्मण अक्कलकोटात जेवू घालीन! तिच्या या प्रंजळ उत्तरास श्री स्वामींनी ‘तथास्तू’ म्हणून तिच्या भक्तीला एक प्रकारे मान्यता दिली. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सातव्या महिन्यात आलेले संकट पार होऊन ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला.
श्री स्वामींनी त्यांचे काम केले. आता नवस फेडण्याची, ‘मुलगा झाला, आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे!’ असा दृष्टांत झाला. म्हणजे श्री. स्वामींस दिलेल्या वचनाला जागण्याची जबाबदारी त्या दोघा पती-पत्नीची होती. भागूबाईस स्वप्न दृष्टांतातून श्री स्वामींनी निर्देशित केले की, “आम्ही समाधिस्त झालो आहोत, समाधी स्थानी म्हणजे यावे” केळीच्या मखरात सिंहासनावर बसलेले श्री स्वामी समर्थ दोन्ही बाजूस सेवा करीत असलेले दोन सेवेकरी हे स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचाच तो दृश्य प्रसंग होता. पुढे ते दोघेही दिल्या वचनाला जागले. श्री स्वामी समर्थ समाधिस्त झाल्यानंतर त्यांच्या भक्तांचा कसा सांभाळ करतात, योगक्षेम चालवतात, याचा बोध देणारी ही रसाळ लीला आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, “हम गया नही जिंदा हैं!”
स्वामी समर्थ सुखाचे सागर…
स्वामी नाम अति सोपे
नाम घेता संकट झोपे॥ १॥
भक्त सारे स्वामीवर सोपे
स्वामीदृष्टी शतयोजने झेपे॥ २॥
हनुमंत जैसे सूर्यबिंबे झेपे
बालविष्णू पृथ्वी तीन पावलात मापे॥ ३॥
टिटवीस समुद्र गिळंकृत सोपे
ईश्वरकृपा होता आयुष्य सोपे ॥ ४॥
श्रीरामकृपेने खार समुद्र मापे
गरुडविष्णूस आकाश सोपे॥ ५॥
ध्रुवबाळ इंद्रधनुष्यात झोपे
भिल्लाची शंकरे धुतली पापे ॥ ६॥
रामनामे पळती भूत पापे
श्रीकृष्ण नामे कुंभकर्ण झोपे ॥ ७॥
स्वामीसमर्थ संकटासच कापे
भूत प्रेत समंध थरथर कापे ॥ ८॥
पुण्यास शेतकरी जाधव पांडुरंग
पत्नी भागूबाई ईश्वरसेवेत दंग॥ ९॥
साथरोगात चार बाळे यमासंग
पत्नी झाली स्वामीनामात दंग ॥ १०॥
दिनरात फोटोतील स्वामीसंग
सुखदुःखाच्या गोष्टीत
दंग॥ ११॥
स्वामी स्वप्नात पुत्रप्रतीचा दृष्टांत
भागूबाई वदे जेवू घालेन २०० संत ॥ १२॥
वर्षभरात झाली पुत्रप्राप्ती
पुन्हा स्वामी स्वप्नी मज नाही नवस प्राप्ती? ॥ १३॥
भागूबाई अक्कलकोटी पूर्ण करे नवस
जगभर स्वामीकृपे आनंदी दिवस ॥ १४॥
२०० ब्राम्हण तृप्त त्या दिवस
तुम्हीही व्हाल सुखी सर्व दिवस ॥ १५॥
घरातून पळून जाईल अवस
लक्ष्मीचा गणपती भाऊ मावस ॥ १६॥
विष्णू लक्ष्मी येईल प्रत्येक दिवस
स्वामी समर्थ नाम आनंदी दिवस ॥ १७॥
दत्तमूर्ती स्वामी ईश्वरश्रेष्ठ
सारी संकटे निष्प्रभ
कनिष्ट ॥ १८॥
भक्तजनहो व्हा स्वामी हृदयात प्रविष्ट
स्वामीच करतील जे जे सर्वश्रेष्ठ ॥ १९॥
सांगतो तुम्हाला मीच स्पष्ट
स्वामी समर्थ, माणसा माणसांत प्रविष्ट ॥ २०॥
ठेवा सर्वांचा मान तो ईष्ट
संकटे सारी होतील
नष्ट ॥ २१॥
भिऊ नकोस पाठीशी मंत्र स्पष्ट
रामनाम स्वामीनाम दिनरात स्पष्ट ॥ २२॥
नका थांबवू परिश्रम कष्ट
करा गरिबांची वास्तू
पुस्त ॥ २३॥
करा अभ्यास वाढवा ज्ञान
आदर्श ज्ञानेश्वर वयाने सान ॥ २४॥
शिवाजी परी पराक्रम महान
सोबत स्वामीनाम तुम्ही व्हा महान॥ २५॥