Friday, May 10, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMHADA : म्हाडाचे घर घेण्यासाठी गिरणी कामगारांना तासन्तास रांगेत उभे रहाण्याची आवश्यकता...

MHADA : म्हाडाचे घर घेण्यासाठी गिरणी कामगारांना तासन्तास रांगेत उभे रहाण्याची आवश्यकता नाही!

गिरणी कामगार कोठ्यातून म्हाडा घर लाभार्थ्यांसाठी आता ॲपद्वारे करता येणार पात्रता निश्चिती

मुंबई : गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना सोडतीतून घरे देण्यासाठी म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाकडून पात्रता निश्चिती केली जात आहे. त्यासाठी टप्पा ठरविण्यात आला असून, या आधीच्या सोडतींमध्ये यशस्वी न झालेल्या जवळपास १ लाख ५० हजार ८४८ गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना घरांचे सोडतीद्वारे वाटप होणार आहे. त्यासाठी म्हाडाने पात्रतानिश्चिती केली आहे. त्या लाभार्थ्यांना पात्रता निश्चितीसाठी म्हाडा कार्यालयात भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. त्यात अनेक अडचणींना सामनाही करावा लागत होता. त्यामुळे ही होणारी गैरसोय दूर करण्यासाठी म्हाडाने आता ॲप लाँच केले आहे. त्यामुळे गिरणी कामगार कोठ्यातून म्हाडा घर लाभार्थ्यांसाठी आता ॲपद्वारे पात्रता निश्चितीसाठी अर्ज करता येणार आहे.

म्हाडाच्या (MHADA) घरांसाठी गिरणी कामगार, अथवा त्यांच्या वारसांना पात्रतानिश्चीतबाबद जाणून घेणे आणि अर्ज दाखल करणे यासाठी एक मोबाईल ॲपही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मोहीम विनामूल्य असणार आहे.

गिरणी कामगार, वारस अर्जदार म्हाडा द्वारे (MHADA) पुरविण्यात आलेल्या अॅपद्वारे केव्हाही, कधीही आणि कोठेही आपला अर्ज अपलोड करु शकतात. अॅपचे हे व्हर्जन अँड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये तो उपलब्ध आहे.

दरम्यान, म्हाडाद्वारे १४ सप्टेंबर पासून पात्रता निश्चिती मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. जी वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट मैदानासमोरील समाजमंदिर सभागृहात ४ ऑक्टोबर पासून राबवली जात आहे. आतापर्यंत १६ हजार ९८० गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांकडून कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी ११ हजार ११५ जणांनी प्रक्रियेत ऑनलाईन सहभाग नोंदवला.

म्हाडाद्वारे घर मिळविण्यासाठी राज्य आणि देशभरातून पात्र गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस म्हाडा कार्यालयात येतात. या सर्वांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे पूर्ण करण्याची सुविधा आहे. अलिकडील काही काळात ऑफलाईन अर्ज दाखल करणा-यांची संख्या कमी होऊन ऑनलाईन अर्ज दाखल करणा-या मंडळींची संख्या वाढली आहे. अनेक कामगार सध्या वृद्धापकाळात आहेत. तर काही कामगारांचे वारस हे विविध नोकरी, व्यवसायानिमित्त देशभर विखूरले आहेत. अशा वेळी त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आणि जवळची वाटते. दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडूनही प्रवासाची दगदग आणि कार्यालयात पाहावी लागणारी वाट, यातून दिलासा मिळावा यासाठी ऑनलाईन पर्यायांचा वापर करण्याबाबत आवाहन केले जाते.

म्हाडा समाजातील प्रत्येक उत्पन्न गटासाठी ठराविक संख्येने गृहनिर्माण युनिट्सचे दरवर्षी वाटप करते. ही संख्या प्रत्येक वर्षी बदलते आणि मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट विभागांच्या तुलनेत आर्थिक दुर्बल गट आणि कमी उत्पन्न गट विभागांमध्ये जास्त वाटा असतो. म्हाडाने प्रत्येक उत्पन्न गटासाठी निवासी युनिट्सची किंमत श्रेणी देखील पूर्व-निर्धारित केली आहे. सर्व आर्थिक दुर्बल गट गृहनिर्माण युनिट्सची किंमत रु. २० लाख; सर्व कमी उत्पन्न गट फ्लॅट्स रु.च्या दरम्यान आहेत. २०-३० लाख, सर्व मध्यम उत्पन्न गट घरांची किंमत रु. ३५-६० लाख, तर सर्व उच्च उत्पन्न गट फ्लॅट्सची किंमत रु. ६० लाख ते रु. ५.८ कोटी, अशा स्वरुपात या किमती असतात. ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवर आधारीत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -