Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमMumbai Local crime : मोबाईल चोरट्याच्या पराक्रमाने निष्पाप तरुणाला गमवावे लागले पाय!

Mumbai Local crime : मोबाईल चोरट्याच्या पराक्रमाने निष्पाप तरुणाला गमवावे लागले पाय!

मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार

मुंबई : राज्यभरात गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस हादरवणार्‍या घटना समोर येत आहेत. मुंबईच्या लोकलमधून (Mumbai Local) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून यात एका मोबाईल चोरट्याने (Mobile thief) केलेल्या कारनाम्यामुळे निष्पाप तरुणाला आपले पाय गमवावे लागले आहेत. जगन लक्ष्मण जंगले असं या तरुणाचं नाव आहे. काल रात्री नऊच्या सुमारास ठाणे स्थानकाजवळ (Thane Station) हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

जगन लक्ष्मण जंगले हे दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी काम करतात. नेहमीप्रमाणे जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाण्यासाठी रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून लोकल पकडली होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर जगन दरवाजात उभे होते. तेव्हा त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याच्या हेतूने एका गर्दुल्याने त्यांच्यावर हल्ला केला. जगनच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला.

त्यामुळे तोल जावून जगन फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाइल देखील गहाळ झाला. या घटनेत जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचं चाक (Local Train Accident In Thane) गेलं. त्यामुळे जगन या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने उचललं.

दोन्ही पाय गमावले

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जगन यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसंच त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यामुळे त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले.

महिन्याभरापूर्वीच झालं लग्न

जगन हे घरातील एकमेव आर्थिक आधार आहेत. त्यांच्या घरातील परिस्थिती बिकट असून नुकतंच एका महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु या घटनेत त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, परंतु पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. सध्या जगन यांच्यावर ठाण्यात खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -