Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआईचं पत्र हरवलं...

आईचं पत्र हरवलं…

  • प्रासंगिक : सारिका कंदलगांवकर

“आई, आई” दहा वर्षांची सानिका ओरडतच घरात आली. “ काय गं? काय झाले एवढं ओरडत यायला? “आईने बाहेर येत विचारले.

“मला ना खूप रडायला येतंय.” सानिकाने हुंदके देत रडायला सुरुवात केली. “अगं पण, एवढं झालं तरी काय? कोणाशी भांडण झालं का? कोणी काही बोलले का?” प्रत्येक प्रश्नावर सानिकाचा नन्नाचा पाढा होता. “आता सांगतेस का, धपाटा घालू?” आईने चिडून विचारले.

“ती प्राजक्ता मामाकडे चालली आहे.” सानिकाने डोळे पुसत सांगायला सुरुवात केली. “ती मामाकडे गेली, यात तुला भोकाड पसरण्यासारखे काय आहे?” आईला समजत नव्हते. “ती सतत जाते. आज काय तर भावाचा वाढदिवस, उद्या काय मामीने हिच्या आवडीची खीरच केली. तीच काय, तो पार्थ, राघव, अर्चना सगळेच आपल्या नातेवाइकांकडे जात असतात. आपणच कोणाकडे जात नाही.” आता परत सानिका रडायच्या मूडमध्ये आली होती. “असं काय करतेस? तू नाही का चांगली दोन महिने जातेस गावी. मग काका, मामा, आत्या, मावशी सगळ्यांकडे राहून येतेस,” आई तिला समजावत म्हणाली. “ हो पण ते वर्षातून एकदा. आपण फक्त तेव्हाच भेटतो. मामा, मावशी नेहमी भेटतात. आपणच नसतो तेव्हा.” तिचे बोलणे ऐकून आईला पण वाईट वाटले. कारण खरेच त्यांचे सगळे नातेवाईक गावी जवळजवळ राहायचे. यांचेच कुटुंब फक्त दूर होते. “विचार तुझ्या आजोबांना. माझ्याच आईला एवढे दूर का पाठवले म्हणून?” डोळ्यातले पाणी पुसत आई म्हणाली आणि आत निघून गेली. आईचे शब्द सानिकाच्या मनात घोळत राहिले. तिने बाबांच्या मागे लागून एक पोस्टकार्ड मिळवले, त्यांच्याकडून पत्ता लिहून घेतला. पत्र लिहायला सुरुवात केली.

“प्रिय आजोबा, सानिकाचा गोड गोड पापा. नाही कडू पापा. तुम्ही आईशी का दुष्टपणे वागलात? का आईला एवढ्या दूर पाठवलेत? तुम्ही सगळे तिथे छान मजा करता आणि आम्ही चौघेच इथे एकटेच असतो. माझी सगळी मित्रमैत्रिणी सतत त्यांच्या मामाकडे जातात, आत्याकडे जातात. मी आणि दादा मात्र कुठेच जात नाही. मला तुमचा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप राग आला आहे. मी बोलणारच नाही तुमच्याशी. कट्टी फू… तुमच्यावर रागवलेली, सानिका.

सानिकाने आईला न दाखवताच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकून दिले आणि आपण काय लिहिले आहे ते विसरूनही गेली. आईला वाटले की, सानिकाला पत्र लिहिता आले नसेल. आपण बघू नंतर. आठ दिवसांनंतर सानिका शाळेतून घरी आली. दरवाजापाशी तिला चपला दिसल्या. ती पळतच आत आली. आतमध्ये आजोबा आणि तिची धाकटी मावशी बसले होते. आई हसता हसता रडत होती. ती मावशीला जाऊन चिकटणार होती पण आईचे रडणे बघून थोडी घाबरली होती. आजोबांनी तिला जवळ येण्याची खूण केली. ती गुपचूप गेली. त्यांनी तिला जवळ घेतले.

“ तू चिडली आहेस का आमच्यावर?” त्यांनी हळूच विचारले. बोलताना त्यांच्या मिश्या तिला टोचू लागल्या. ती जोरात हसू लागली. “ नाही. मी का चिडू तुमच्यावर?” तिने निरागसपणे विचारले. “मग ते पत्र कोणी लिहिले?” मावशीने विचारले. “ ते? ते तर आईचं पत्र होतं. मी लिहिलेलं.” सानिका निरागसपणे बोलली. आई, मावशी आणि आजोबा तिघेही डोळे पुसायला लागले.

“मग तू असं का लिहिलंस, सानिका चिडली आहे म्हणून?” मावशीने विचारले.

“मग? मला तुम्हाला सारखं भेटता येत नाही. मग आईच म्हणाली, विचार आजोबांना मला एकटीलाच दूर का पाठवले म्हणून? बरोबर ना आई?”

त्यावर मावशीने फक्त सानिकाला जवळ घेऊन तिचा पापा घेतला आणि तिला आणलेला खाऊ दिला. आपले पत्र वाचल्या वाचल्या आपले आजोबा आणि मावशी लगेच मिळेल त्या गाडीने आपल्याला भेटायला निघून आले आहेत ही समज त्या लहान जीवाला नव्हती. मोठे झाल्यावर त्या पत्राचे महत्त्व मात्र समजून चुकले. अजूनही त्या कुटुंबात सानिकाला त्या पत्रावरून चिडवतात. तिला मात्र ते पत्र आपल्यावर आजोळचे किती प्रेम आहे याचे प्रतीक वाटते.

साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ज्या वेळेस फोन तर होते पण त्यांचे चार्जेस जास्त असायचे. दूर फोन लावायचे असतील, तर साधारण नऊनंतर तेही रविवारी. त्यावेळेस बोलणारे जास्तजण. म्हणून फक्त आवाज ऐकायचा. मनातले काही बोलायचे असेल तर आधार फक्त पत्राचा. एक पत्र पाठवले की मग लागायची हुरहुर. ते पत्र पोहोचले असेल का? त्याचे उत्तर मिळेल का? माणसे शरीराने लांब असायची पण मनाने या अशा पत्राने जवळ असायची. अनेक पत्र जपून ठेवली जायची. कित्येक आठवणी जोडलेल्या असायच्या त्याच्याशी. १ मे, हा तर निकालाचा दिवस. पोस्टाने निकाल येण्याचे ते दिवस. ती पत्रं, तो निकाल एवढेच काय तर दिवाळीला येणारी भेटकार्ड, प्रत्येक गोष्टीचे अप्रूप होते. आता हातातल्या मोबाइलमुळे आपण कधीही कोणाशी बोलू शकत असलो तरीही संवाद मात्र होत नाही. अशावेळेस आठवतात, दुरावलेल्या जवळच्या नातेवाइकांसारखीच दुरावलेली पत्रं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -