Tuesday, May 7, 2024

Nature : खगध्वनी

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

अरे काय कलकलाट चाललाय, काय चिवचिवाट चाललाय? असं आजी नेहमीच म्हणायची. आम्हाला पण आणि पक्ष्यांना पण. खरंच पूर्वी एवढ्या चिमण्या चिवचिवाट करायच्या की, आम्ही जाऊन बघायचो काय झालं? भांडतात की काय त्या सगळ्या एकत्र येऊन असं वाटायचं. समजायचं काहीच नाही पण काहीतरी चाललंय जोरदार. गंमत वाटायची, पाहत राहायचो. आता आठवलं तरी मन भरून येतं कारण तो चिवचिवाट कानी पडतच नाहीये. सकाळी सकाळी साखर झोपेतच पक्ष्यांचे सुंदर आवाज कानी पडायचे, जणू काही संगीत मैफल चालू झाली आहे. आमच्या लहानपणी तर कावळे, चिमण्या, कबुतर यांचा तर जणू काही सुळसुळाटच होता. पण आता?

मानव आणि सजीव सृष्टीतला प्रत्येक घटक यांना सुद्धा आपल्यासारख्याच भावना आहेत. सुखदुःख, वेदना, दया, प्रेम, राग, द्वेष सर्व प्रकारच्या भावना त्यांच्या त्यांच्या परीने व्यक्त होत असतात. म्हटलं तर प्रत्येक वनस्पती, फुलं सर्व बोलत असतात. फक्त आपल्या या कानापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही, किंबहुना हृदयापर्यंत. प्रत्येकजण आपली भावना व्यक्त करीत असतात. त्यातल्या त्यात पक्षी हा मानवाच्या अतिशय जवळ असल्यामुळे आणि अनुकरणप्रिय असल्यामुळे तो विविध प्रकारचे आवाज काढू शकतो. त्याच्या भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपणा आपल्याला दिसतो.

पक्षी निसर्ग नियमानुसार पहाटेच उठतात आणि एकमेकांना साद घालतात. पक्ष्यांच्या एकमेकांच्या साद घालण्याला “कॉल” असे म्हणतात. हे कॉलिंग त्या पक्ष्यांना बरोबर कळत असते ते एकमेकांशी खूप लांबून सुद्धा संवाद साधतात. सकाळी उठून आधी ते मधुर गायन करतात. जणू काही ते सगळ्यांना शुभ प्रभात म्हणत शुभेच्छा गीत गात आहेत की काय असेच वाटते.

जंगलातील पक्षी खूप विविध प्रकारचे आवाज काढतात. इतर पक्ष्यांच्या आवाजाचे अनुकरण करतात. रडतात, गातात, आनंदाने ओरडतात. गाणे, हुंकार, चित्कार, कर्कश्य, शिट्या वाजणे, ढोल वाजवणे, कलकलाट, किलबिलाट, गुरगुरणे, अनुकरण करणे अशी वैविध्य पूर्णतः त्यांच्या ध्वनीत असते. काही पक्षी लहान मुलांसारखे रडतात. खरं तर ते अनुकरण असतं. जंगलात तो हसण्याचा, रडण्याचा आवाज भीतिदायक वाटतो. पक्ष्यांचे आवाज प्राण्यांना सुद्धा कळतात. ते जंगलातील प्राण्यांना सुद्धा सावध करीत असतात.

तुम्हाला गंमत सांगते, ऑस्ट्रेलियन पक्षी कुकाबुरा पक्ष्याचा आवाज हसण्यासारखा येतो. न्यूझीलँडमध्ये हसणारे घुबड सुद्धा होते पण आता ते नामशेष झाले आहेत. बऱ्याचदा पक्षी सुद्धा डोळ्यांतून अश्रू काढून रडतात आणि त्यांचा सूर सुद्धा रडण्याचा येतो. ऑस्ट्रेलियाच्या लायर बर्डचा आवाज रडण्याचा असतो. कावळ्यांच्या पिल्लांचा रडतानाचा आवाज ऐकलाय का? जेव्हा त्यांची आई बाहेर जाते तेव्हा ही पिल्लं बऱ्याचदा रडताना ऐकायला येतात. रडणारे पक्षी माहिती आहेत का? आपल्या भारतामध्ये नायटिंगेल, नाईट जार, नाईट हेरोन, कॉर्न क्रॅक, व्हीप पुअर व्हिल्स, फ्रॉग माउथ तर आफ्रिकी ट्रंपेटर हॉर्नबिल हे पक्षी रात्रीचेच रडतात. पण खरंच का रडतात की गातात, की एकमेकांना साद घालतात, की सावध करतात हे खरंतर गुढच आहे. पण त्यांचा आवाज रडण्यासारखाच येतो एवढं मात्र खरं. जेव्हा पक्षी आजारी पडतात तेव्हा ते सुद्धा आपल्यासारखेच वेदनेने कण्हतात. लहानपणी आमच्याकडे आम्ही क्रॉफर्ड मार्केट इथून पक्षी आणायचो आणि मग त्यांना आकाशात उडवून द्यायचो. जे आजारी असतील त्यांना सांभाळायचो. मी अनेक पक्ष्यांना बारीक आवाजात वेदनेने विव्हळताना पाहिले आहे. त्यांना सुद्धा आपल्यासारखे सर्दी, ताप, जुलाब, हृदयाचे विकार, कमकुवतपणा होतच असतो. आता बरीच औषधं यांची सुद्धा निघाली आहेत. पण या निसर्गात राहणाऱ्या पक्ष्यांना आपल्या औषधांची गरज आहे का? ते खरं तर आपल्याकडेच आजारी पडतात. जेव्हा स्वच्छंदी आकाशात पक्षी उडत असतात तेव्हा ते आजारी पडतच नाहीत. कारण त्यांना शुद्ध हवा, जंगलातील शुद्ध सकस अन्न आणि निवारा मिळत असतो. म्हणून ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात.

तरुण आणि वयस्कर पक्ष्यांच्या आवाजात थोडा बदल असतो. माझ्या अध्ययनानुसार लहान लहान पक्ष्यांचे आवाज साधारण सारखेच असतात. या पक्ष्यांचे डोळे, शरीराच्या हालचाली, पाय उचलणे, पंखांचा फडफडाट करणे, त्यांच्या माना फिरवणे, चोचीतून निघालेला विशिष्ट ध्वनी यातून पूर्ण अंदाज येतो की नक्की काय चाललंय? जेव्हा पक्षी शांतपणे आपल्याकडे पाहत डोळ्यांची उघडझाप करतात, हलकेपणाने मान हलवतात तेव्हा ते आपल्यावरील विश्वास दर्शवतात. आपणही त्यांना त्याच नजरेने जर प्रतिसाद दिला तर त्यांचाही आपल्यावर विश्वास बसतो आणि ते आपले चांगले मित्र बनतात. जर तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली, तर तुम्ही सांगाल तसे ते वागतील, तुमची प्रत्येक आज्ञा शीरसावंद्य असेल. पक्षी सुद्धा विचार करताना त्यांची मान अशी हळुवारपणे वर आकाशाकडे घेऊन बसतात. आपल्याला डोळे मिटून शांत बसलेले पक्षी असे सहज दिसत नाहीत. जेव्हा त्यांना विश्वास असतो की कोणीही शत्रू हल्ला करणार नाही, जेव्हा त्यांना सुरक्षित वाटत असते तेव्हाच ते डोळे मिटून शांत बसलेले असतात. जणू काही ध्यान करत आहेत; परंतु ते खूप सावध असतात. जराही काही वेगळा आवाज आल्यास लगेच डोळे उघडून भुरकन उडून जातात. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतत माना उंचावून इकडे तिकडे पाहणे, उत्सुकतेपोटी माना वर खाली करणे अशी कृती सतत त्यांच्याकडून होत असते. जेव्हा ते प्रेमालाप करतात तेव्हा ते एकमेकांच्या डोक्यावरील पिसांमध्ये चोच घालीत असतात आणि हळुवारपणे एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यांच्या हावभावावरून, रोज निरीक्षण केल्यावर आणि त्यांच्या सहवासात राहिल्यावरच आपण त्यांची भाषा समजू व शिकू शकतो शकतो.

पूर्व यूएसमधील जंगलामध्ये वुड थ्रश हा पक्षी बासरी वाजवलेल्या सुरात गात असतो. रफ्ड ग्राउस हा पक्षी अशाप्रकारे पंख फडफडवतो आणि आवाज करतो की त्याचा आवाज ढोल वाजल्यासारखा येतो. मैगपाईज- बडबड केल्यासारखा, रॉबिन्स हसल्यासारखा, घुबड कर्कश्य, चिमण्या चिवचिवाट, क्रेन हॉर्न वाजवल्यासारखा, गिधाड ओरडल्यासारखा. बदक क्वैक क्वैक, कोकिळा कुहू कुहू, कोंबडा कुकुडूकु, मोर मियावो मियावो, ब्ल्यू जयचा आवाज हा क्विडल असा असतो. खरंतर पक्ष्यांच्या ध्वनीचे उच्चार असे आहेत की जे आपण उच्चारात सुद्धा प्रगट करू शकत नाही.

हेरॉन जेव्हा चालतो तेव्हा तो त्याची मान उंचावून दोन्ही बाजूने बघत बघत शांतपणे चालत असतो. त्यात त्याची सुरक्षितता परिसराचा आनंद घेत आरामात चालणे सुद्धा असते. तर किंगफिशर तोंड मिटूनच आतल्या आत चोच न उघडता बारीक आवाज काढत झाडावर बसून आराम करत असतो. बऱ्याचदा पक्षी जेव्हा अन्नधान्य खाताना त्यांच्या भाषेमध्ये बोलत असतात तेव्हा ते नक्की काय बरं बोलत असतील, काय विषय असू शकतो? एका पक्ष्याला खाद्य मिळाल्यास तो अनेक पक्ष्यांना जेव्हा बोलावतो तेव्हा सर्व पक्षी एकत्र येऊन खाताना बराच कलकलाट करत असतात. त्यात ते त्यांचा आनंद व्यक्त करीत असतात.

पक्षी अतिशय संगीतमय गातात पण त्यांचा मूळ आवाज हा वेगळाच असतो. जसं आपल्यामध्ये सुद्धा असतं. गाणे वेगळे आणि साद घालणे वेगळे असते. प्रातःकाळचे गीत वेगळे आणि प्रजनन काळातील गीत वेगळे. जेव्हा हे पक्षी झुंडीत राहतात तेव्हा त्यांच्या साद घालण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात. एकमेकांसाठी केलेले कॉलिंग हे उडण्यासाठी, सावध करण्यासाठी ज्याला अलार्म कॉल सुद्धा म्हणतात. जेव्हा आई-वडिलांना भूक लागते तेव्हा ते आपल्या मुलांना बोलावतात. त्यासाठी सुद्धा त्यांची विशिष्ट साद असते. आपले शब्द बदलतात त्यांचा सूर बदलतो. कोकिळेचे मधुर संगीत हे लोकप्रिय आहे. पण तेही काही काळापुरतेच मर्यादित असते. म्हणजेच प्रत्येक पक्ष्यांचा ध्वनी हा ऋतुमानाप्रमाणे सुद्धा असतो. निसर्गात होणाऱ्या घडामोडी या पक्ष्यांना बरोबर समजतात कारण त्यांचे निसर्गाशी असलेले दृढ नाते.

जर आपल्याला पक्ष्यांची भाषा शिकायची असेल तर आपल्याला त्यांच्या फक्त ध्वनीचाच नाही तर शरीरशास्त्राचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. त्यांचा मधुर संगीतमय गाण्याचा आवाज हा त्या भागात सकारात्मकतेची उधळण करतो. वातावरणात चैतन्य, उत्साह आणतो. दिवसभर होणारा त्यांचा किलबिलाट, कलकलाट, गुंजन, सर्वच उत्साहवर्धक आणि ऊर्जात्मक असते. मग अशा या पक्ष्यांची सुमधुर गीते कायमच आपल्याला ऐकावयाची असतील तर यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे की नाही? हे पक्षी सुद्धा आपल्यासाठी मानसिक शांती देणारे परमेश्वराने या पृथ्वीवर पाठवलेले देवदूत आहेत. किमान आपल्या मानसिक शांतीसाठी तरी यांची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल.

dr.mahalaxmiwankhedkar @ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -