Thursday, June 27, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMNS : मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे रस्त्यावर! खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर, राज...

MNS : मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे रस्त्यावर! खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

Raj Thackeray : खोके खोके ओरडणाऱ्यांनी कोविड पण सोडला नाही, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका!

पनवेल : “सगळ्या लोकांना माहित आहे, आम्ही कसेही वागलो, खराब रस्ते दिले तरी वेगळा मुद्दा काढून मत घेणार. हा धंदा झाला आहे. पुढील २५ वर्ष नीट रस्ता झाला तर पैसे खायचे कसे, म्हणून खराब रस्ते बनतात. टेंडर, टक्केवारी सुरु आहे. खोक्याच्या नावाने ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत. यांनी कोविड पण सोडला नाही,” अशी सडकून टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी मनसे आक्रमक झाली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. “असे आंदोलन करा की, यापुढे रस्ते करताना सरकारला अशाप्रकारे आंदोलन झाले होते अशी भीती असावी, दहशत असावी,” असे म्हणत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला हिरवा कंदिल दाखवला.

“प्रत्येक वेळी येऊन बाळासाहेबांचे नाव पुढे करतात आणि आम्ही लगेच भावनिक होतो. २०२४ पर्यंत रस्ता पूर्ण होईल सांगितले असले तरी पुढे काय, याचा विचार केला आहे का,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

“चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र सोडलं असतं तर खर्चही वाचला असता,” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्ग, तसेच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन लगावला. पनवेल इथल्या कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गटावर जोरदार शरसंधान साधले. आमच्या कार्यकत्यांनी टोल नाका फोडला तर रस्ते बांधायला पण शिका, अशी टिका केली होती. त्यावर उत्तर देताना, भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.

मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, “शिवसेना भाजपा नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आली, आता तर सगळेच आले. कळत नाही कोण आले. पण या लोकांना तुम्ही कसे काय मतदान करता? आम्ही खड्ड्यातून गेलो काय किंवा खड्ड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का, यांना एकदा धडा शिकवायला हवा, नुसती आश्वासनं देतात.”

‘मुंबई-गोवा हायवेवर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च’

मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाला आहे. रस्ता नाही झाला पण बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. गडकरी यांच्याशी बोललो.. तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण तर नाही ना.. कुणाचं काम तर नाही ना… कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय… आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात.

भाजप, अजित पवारांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “अमित ठाकरे गेल्यानंतर टोल फुटला. त्यावर भाजपने लगेच टीकाटिप्पणी केली. तुम्ही रस्ते बांधायला आणि टोल उभे करायला शिका. मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या. मग त्यांना आतमध्ये आणायचं. मग ते लोक गाडीमध्ये झोपून जाणार. निर्लज्जपणाचा कळस महाराष्ट्रात सुरु आहे. भ्रष्टाचार काढल्यानंतर टुनकन आले असणार. भुजबळांनी सांगितलं असेल आत काय होतं, त्यामुळे तिथे जाण्यापेक्षा इथे जाऊया.” अशी खिल्ली राज यांनी उडवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -