आवाजी मतदानानंतर विजयी घोषित
नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केले. ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता लोकसभेच्या सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते मित्र पक्षांमधील सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत त्यामध्ये ओम बिर्ला हे विजयी झाल्याची घोषणा केली. त्यानंतर मतविभाजनाची मागणी करण्यात आली. मात्र ती मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. ओम बिर्ला यांच्या निवडीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री किरेन रिजीजू यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्वक लोकसभा अध्यक्षांच्या स्थानावर विराजमान केले.
ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्याआधी त्यांनी राजस्थान विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
ओम बिर्लांनी विरोधकांना करून दिली आणीबाणीची आठवण
निवडीनंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना खोचक टोलेबाजीही केली होती. मात्र नंतर आभार व्यक्त करत नव्या लोकसभेतील पहिलं भाषण करताना ओम बिर्ला यांनी जो पवित्रा घेतला. त्यामुळे विरोधी पक्ष अवाक् झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सातत्याने संविधानावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांना ओम बिर्ला यांनी १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरून खूप सुनावले. तसेच आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय असल्याची टीका केली. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी केली.