Wednesday, June 26, 2024

विविध तारे

आकाश निरभ्र असले व आकाशात स्वच्छ प्रकाश असला, तर रात्री आपण सुमारे सहा हजार तारे बघू शकतो; पण एक हजारच मोजू शकतो; कारण निम्मे तारे हे क्षितिजापलीकडे असतात. त्यामुळे खरे म्हणजे तसे आपण तीन हजार तारेच बघू शकतो.

कथा – प्रा. देवबा पाटील

परीताई यशश्रीला म्हणाली, “आज चहापान नको गं. आज जातांना मी तुझ्याकडून नाश्ताच करून जाईल.”
“हो ताई. नाश्ता तयार आहे. आताच आणू का?” यशश्रीने विचारले. “नाही. आपल्या ज्ञानगोष्टी संपल्या म्हणजे आण.” परी उत्तरली.

“ ताई, अवकाशात हे श्वेतबटू तारे कसे तयार होतात?” यशश्रीने विचारले.
“ता­ऱ्यांचा मुख्य घटक म्हणजे हायड्रोजन. या हायड्रोजनच्या ज्वलनातूनच हेलियम तयार होतो आणि काही काळाने त्यातील हायड्रोजनचा साठा कमी कमी होत जातो. अशा वेळी ता­ऱ्यांच्या केंद्रभागाकडून बाह्य दिशेने कार्य करणारा दाब कमी कमी होत जातो व ता­ऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा दाब वाढत जातो व तो आकुंचित होऊ लागतो. त्या ता­ऱ्याची घनता प्रचंड प्रमाणात वाढते. शेवटी एकदा ही आकुंचनाची प्रक्रिया थांबते व तो तारा स्थिर होतो. म्हणजे ता­ऱ्याच्या केंद्राकडून बाह्य दिशेने कार्य करणारा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या दाबाला संतुलित करतो. ता­ऱ्याच्या या अवस्थेलाच श्वेतबटू तारा असे म्हणतात.” परीने सांगितले.

“खुजे तारे कसे असतात परीताई?” यशश्रीने प्रश्न केला.
परी म्हणाली, “आकाशात गुरू ग्रहापेक्षाही मोठे असे काही खगोल आहेत की, ज्यांना तारा ही संज्ञाही देता येत नाही व जे ग्रह या प्रकारातही येत नाही. त्यांना खुजे तारे म्हणतात.”
“परीताई, मृत तारा कसा असतो?” यशश्रीने प्रश्न उपस्थित केला.

“काही अतिशय जुन्या व खूप थंड झालेल्या ता­ऱ्यामध्ये घनरूप वस्तुमान गच्च ठासून भरलेल्या अवस्थेत असते. हे तारे प्रकाशित नसतात. अशा ता­ऱ्याला मृत किंवा काळा तारा म्हणतात. तुला रुपविकारी ता­ऱ्यांबद्दल काही माहिती आहे का?” परीने सांगता सांगता यशश्रीला प्रश्न विचारला.
“नाही ताई.” यशश्री उत्तरली.

“ज्या ता­ऱ्यांचे तेज मधून मधून बदलते म्हणजे कमी-जास्त होते, त्यांना रुपविकारी तारे म्हणतात.” परीने सांगितले.
“पण काही तारे तेजस्वी, तर काही अंधूक का दिसतात मग?” यशश्रीने प्रश्न उकरला.

“ जे तारे जास्त प्रकाश उत्सर्जित करतात आणि पृथ्वीपासून कमी अंतरावर असतात, ते जास्त तेजस्वी दिसतात, तर जे तारे कमी प्रकाश उत्सर्जित करतात आणि पृथ्वीपासून खूप दूर असतात, ते अंधूक दिसतात.” परीने उत्तर दिले.
“मग दिवसा का दिसत नाहीत, हे सारे तारे?” यशश्रीने शंका उपस्थित केली.

“ सूर्य हा आपल्या आकाशगंगेतील एक खूप तेजस्वी तारा आहे. सूर्यापेक्षाही आकाराने खूप मोठमोठे व अत्यंत तेजस्वी असे अनंत तारे या आकाशगंगेत आहेत. सूर्यासारखेच तेही स्वयंप्रकाशी आहेत; परंतु ते आपणापासून खूप दूरच्या अंतरावर आहेत नि सूर्य हा आपणास सर्वात जवळचा तारा आहे. सूर्याचे आपल्या ग्रहापास्ूनचे अंतर या ता­ऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. आपल्या ग्रहावर दिवस उजाडला म्हणजे सूर्याचा तेजस्वी प्रकाश आपल्या ग्रहावर पडतो. दिवसा सूर्यप्रकाशात पृथ्वीच्या वातावरणातील धुळीचे कण सूर्यकिरणांना खूप विखुरतात. त्यामुळे दिवसा त्याच्या प्रखर तेजस्वी प्रकाशात या अतिशय दूरवरच्या ता­ऱ्यांचा प्रकाश लोप पावतो म्हणून दिवसा ते तारे आपणास दिसत नाहीत.” परी म्हणाली.

“सांग बरे यशश्री दिवसा तू किती तारे पाहू शकते?”
“दिवसा आम्ही फक्त एकच तारा पाहू शकतो. तो म्हणजे आमचा सूर्य.” यशश्रीने उत्तर दिले व लगेच पुढचा प्रश्न विचारला की, “पण परीताई रात्री आपण किती तारे पाहू शकतो?”

“ खरंच तू तल्लख बुद्धीची मुलगी आहेस.” परी म्हणाली, “आकाश निरभ्र असले व आकाशात स्वच्छ प्रकाश असला, तर रात्री आपण सुमारे सहा हजार तारे बघू शकतो; पण एक हजारच मोजू शकतो कारण निम्मे तारे हे क्षितिजापलीकडे असतात. त्यामुळे खरे म्हणजे तसे आपण तीन हजार तारेच बघू शकतो.”

“ ताई आमच्या पृथ्वीवरील सर्व ठिकाणांहून ता­ऱ्यांचे उगवणे व मावळणे दिसते का?” यशश्रीने विचारले.
“ पृथ्वीवरील सर्वच ठिकाणांहून आकाशाचे दृश्य सारखेच दिसत नाही. बघणाराचे क्षितीज पृथ्वीच्या अक्षाबरोबर किती कोन करते, यावरच निरनिराळ्या ठिकाणांवरून आकाशातील ता­ऱ्यांचे उदयास्त कसे दिसतील, हे अवलंबून असते.” परीने सांगितले.

“चल आता आण बरं नाश्ता यशश्री बाळ.” परी म्हणाली.
यशश्रीने दोन स्टीलच्या बशांमध्ये नाश्ता आणला. दोघींनी नाश्ता केला व परीताई निघून गेली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -