Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखएकटेपणाशी करा मैत्री!

एकटेपणाशी करा मैत्री!

मेधा इनामदार

आजकाल आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं दिसतात, जी अगदी एकटी आहेत. कालमान आणि परिस्थितीमुळे काही जणांनी स्वतः हा एकटेपणा स्वीकारला आहे, तर काही जणांच्या नशिबी तो दुर्दैवाने आला आहे आणि वयोमानाप्रमाणे एक वेळ अशी येते की जोडीदार पुढे निघून जातो आणि दुसरा एकटेपण जगत राहतो. कारणं काहीही असली तरी अखेर परिणाम एकच… कंटाळवाणा एकटेपणा. या समस्येवर मात करायची तर?

अरुंधती वय वर्षं ५५, सॉफ्टवेअर इंजिनीअर. अपेक्षेप्रमाणे मुलगा मिळाला नाही, म्हणून थांबली. मग लग्न ठरलंच नाही. आई-वडील गेले. भाऊ नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहतो. आता चार रूमच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहाते. अजित वय ६८ वर्षं. दोन्ही मुलं परदेशात. मागच्या वर्षी बायको गेली. आता एकटाच आहे. नातेवाईक किती पुरे पडणार? नयना वयाच्या साठीनंतर नवऱ्यापासून वेगळी झाली. नवऱ्याचा हट्टी स्वभाव ४० वर्षं सहन केला. मुलांची लग्नं झाली. सासू-सासऱ्यांची जबाबदारी संपली. आता कटकटी नको वाटतात म्हणून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. जगन्नाथचा प्रश्न वेगळाच आहे. लग्न झालं आणि सहा महिन्यांत बायको माहेरी गेली, ती परत आलीच नाही. घटस्फोट झाला. त्याचा लग्न या विषयातला रसच संपला. आता एकटाच असतो.

अपर्णाला लग्न करायचंच नव्हतं. तिला स्वातंत्र्य प्रिय होतं. नोकरी, करिअर आणि मित्रमंडळी हेच खरं आयुष्य आहे, असं तिला वाटत होतं. आता आयुष्याची संध्याकाळ जवळ येतेय तशी त्याच स्वातंत्र्याबरोबर स्वेच्छेने स्वीकारलेल्या एकटेपणाची तिला भीती वाटू लागलीय. आजकाल आपल्या आजूबाजूला अशी किती तरी माणसं दिसतात जी अगदी एकटी आहेत. कालमान आणि परिस्थितीमुळे त्यांना हा एकटेपणा आला आहे. काहीजणांनी तो स्वतः स्वीकारला आहे, तर कधी तो दुर्दैवाने त्यांच्या नशिबी आला आहे आणि वयोमानाप्रमाणे एक वेळ अशी येतेच की जोडीदार पुढे जातो आणि दुसरा एकटेपण बरोबर घेऊन जगत राहतो. कारणं काहीही असली तरी अखेर परिणाम एकच. कंटाळवाणा एकटेपणा…

खरं तर, आपण आयुष्यात अनेक गोष्टींचं नियोजन करतो. शिक्षण, करिअर, पहिला पगार, लग्न, मुलांचा निर्णय, निवृत्ती असं बरंच काही. अर्थात यामागे अनेकदा आर्थिक नियोजनाला प्राधान्य असतं. मात्र, निवृत्तीनंतर आर्थिक नियोजनासोबतच या कालावधीत मिळालेल्या अमाप मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, मुलं सोबत राहणार नसतील तर आपली ‘सपोर्ट सिस्टीम’ कशी निर्माण करायची, रिकामा वेळ कसा व्यतीत करायचा, आजारपण असेल, तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं नियोजन करायला हवं. पण प्रत्यक्षात त्यावेळी आपण त्याचा विचारही करत नाही.

नोकरी-व्यवसायात मन रमलेलं असतं, वेळ जाण्याची असंख्य साधनं आसपास असतात, प्रकृती साथ देत असते, तोवर फारसे प्रश्न येत नाहीत किंवा ते मनातही येत नाहीत. जणू हे सारं असंच कायमस्वरूपी चालत राहणार, असं आपण गृहीत धरतो. असं म्हणतात की, प्रौढावस्थेच्या तीन अवस्था असतात. ‘गो गो’, ‘स्लो गो’ आणि ‘नो गो’. यातली प्रत्येक अवस्था कुणी सोबत नसेल तर अधिकाधिक अवघड होत जाते आणि त्यातूनच अनेक मानसिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि होत राहतात. खरं तर हा फार मोठा जागतिक प्रश्न आहे. पण एकत्र कुटुंबव्यवस्थेचं गुणगान गाणाऱ्या भारतीय संस्कृतीतही अलीकडे हे प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. विभक्त कुटुंबव्यवस्था, परदेशी जाऊन सेटल होणारी मुले, घटस्फोटाचे वाढते प्रमाण या सर्वांमुळे या प्रश्नांची तीव्रता अधिक वाढताना दिसत आहे.

तसं पाहिलं तर कोणत्याही वयात एकटेपणा नकोसाचं असतो. उतारवयात तर या एकटेपणामुळे अनेक भावनिक-मानसिक समस्या निर्माण होतात. जबरदस्त नैराश्य येणं किंवा कधी कधी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणं अशा घटनाही घडतात. त्यामुळे एकटेपणाचा बाऊ करून नको ते प्रश्न निर्माण करण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून उपाय शोधणं आवश्यक आहे. या काळात सकारात्मक राहणं गरजेचं आहे. शिवाय आयुष्यातील सगळ्या बऱ्या-वाईट गोष्टींचा स्वीकार करायला शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माझी मुलं परदेशात गेली तर, मुलं वेगळी राहिली तर, मुलांनी जवळ राहून माझ्याशी संवाद ठेवला नाही तर, संपूर्ण दिवस कसा व्यतीत करायचा, भिशी-हास्य क्लब-भटकंती याबरोबरच इतर उपाय काय असतील, या सर्वांचा विचार करून आपण पुढील आयुष्याचं नियोजन केलं पाहिजे.

एकटेपणाची भावना दूर करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवण्यासारखा दुसरा उत्तम उपाय नाही. घरातून बाहेर पडावं. उद्यान, सामाजिक कार्यक्रम यांसारख्या ठिकाणी वेळ घालवावा. जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही बाहेर वेळ घालवता तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष जातं आणि मनातील एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत होते. तुम्ही जिममध्ये किंवा लायब्ररीमध्ये जाऊ शकता. एके काळी पुरे करायचे राहिलेले छंद सुद्धा जोपासू शकता. गाणं शिकणं, वाद्य वाजवणं, वाचन करणं यामुळे मन रमतं. ऑनलाईन जग हा आजच्या काळात इतरांशी कनेक्ट होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा योग्य वापर केल्यास तुम्ही एकटेपणातून बाहेर येऊ शकता. मात्र, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर केल्यास तुमची एकटेपणाची भावना आणखी वाढू शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. विचार बदलले तर जग बदलतं. त्यामुळे एकटेपणा दूर करण्यासाठी विचार बदलणं गरजेचं आहे.

मुलं स्वतंत्र झाली तशी सुरेशराव आणि प्रभाताईंनी शहरातील सर्व सोयींनी युक्त अशा वृद्धाश्रमात आपलं नाव नोंदवलं आणि चार समवयस्क लोकांसह जगण्याची सवय करून घेतली. व्यायाम, गप्पा, वाचन, सिनेमा-नाटकाला जाणं असा भरगच्च दिनक्रम या दोघांनी स्वीकारला. उद्या काही घडलं आणि दोघांपैकी एकजण मागे राहिलं तर एकटं वाटायला नको, असा साधा सरळ विचार त्यांनी केला तर गौरीताईंनी उतारवयातले संभाव्य धोके पाहिले आणि त्या मुलाकडे परदेशात राहायला गेल्या. उद्या आजारी पडलं, अंथरुणावर पडून राहिलं तर आपलं कोण करणार? मुलांसह राहिलं तर निदान माझं सगळं ते करू शकतील आणि त्यांनाही त्याचं समाधान मिळेल, असा विचार त्यांनी केला. गौरीताईंनी मुलांच्या निर्णयाचा स्वीकार केला आणि गावातील सर्व मालमत्ता विकून त्या मुलाकडे स्थायिक झाल्या. मला तिकडे करमणार नाही, माझं सगळं काही इथेच आहे. ते सोडून मी बाहेर कशी जाऊ, अशा प्रश्नांना त्यांनी चटकन उत्तरं शोधली आणि निर्णय घेतला.

एकटेपणावर मात करण्यासाठी आयुष्यात पुन्हा एकदा जोडीदार निवडण्यालाही आता समाजमान्यता मिळू लागली आहे. आज अनेक ज्येष्ठ नागरिक आयुष्याच्या ‘सेकंड इनग’मध्ये सोबतीची गरज म्हणून लग्न अथवा ‘लिव्ह इन’मध्ये राहतात. उतारवयातील एकटेपणावर मात करत अधिक चांगल्या पद्धतीने जगतात. बदलत्या काळाप्रमाणे प्रश्नही बदलतात आणि त्याबद्दल त्या प्रश्नांना उत्तरही मिळत जातात. ‘अथश्री’सारखे वृद्धाश्रम (संपूर्णपणे वृद्धांचे असलेले पुण्यातील सर्व सोयींनी सुसज्ज असे वृद्धाश्रम) हे समवयस्क लोकांच्या मैत्रीसाठी मिळालेले आणखी एक उत्तर आहे असे म्हणता येईल. विविध प्रकारचे ‘मैत्री ग्रुप’देखील आहेत. जे एकमेकांना ज्येष्ठ नागरिकांना सोबत करणं, गरजेप्रमाणे दुखण्यात किंवा हॉस्पिटलमध्ये मदत करणं यासारखे उपक्रम राबवतात. यात प्रौढांपासून विविध वयोगटातील तरुणही आहेत, हे विशेष. इतकंच नव्हे तर, अंथरुणाला खिळून असलेल्या अतिवृद्ध रुग्णांसाठी विविध प्रकारची ‘डे केअर सेंटर्स’ आणि ‘असिस्टेड हेल्प सेंटर्स’ही आहेत. एकटेपणा संपत नसतो. पण हे नक्की, की तो आयुष्यातला एक अटळ टप्पा असतो. अशा वेळेस प्रत्येक माणसाकडे दोन पर्याय असतात. एक तर प्रवासाचा मार्ग बदलायचा किंवा जिथे पोहोचायचे ती जागा बदलायची.

जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असेल, तर तुमच्या बहुतेक गरजा पूर्ण होऊ शकतात आणि त्याहीपेक्षा दुसरा सुंदर मार्ग म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका, जे तुम्हाला इतरांकडून हवं आहे. तुम्ही स्वतःची सगळी काळजी घ्यायला शिका, जी तुम्हाला दुसऱ्यांकडून घेतली जाणं अपेक्षित आहे. आजूबाजूला नीट पाहिलं की लक्षात येणारी एक महत्त्वाची बाब अशी की, मी जे अनुभवतोय ती खूप सामान्य गोष्ट आहे, मी एकटाच नाही. माझ्यासारखे अनेकजण आहेत. ही भावना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी मनापासून जोडून ठेवते. फक्त रक्ताच्या आणि जवळच्या आपल्या लोकांशी नाही तर सर्वांशीच. एकटेपणा अनुभवताना शिक्षा म्हणून पाहू नका, तर त्याच्याशी मैत्री करा आणि जगणं सोपं करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -