शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतून जे कोणी नेते व प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, त्यांचे काही चांगले झाले की, उबाठा सेनेला पोटदुखी सुरू होते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे किंवा नारायण राणे यांच्याविषयी उबाठा सेनेच्या नेतृत्वाला नेहमीच आकस वाटतो. त्यांचे काही भले झाले की, उबाठा सेनेला उलट्या सुरू होतात. माजी केंद्रीयमंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय प्रवासात जे काही मानसन्मान मिळाले तसेच सत्तेतील जी काही त्यांना मोठी पदे मिळाली, ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाने. पण उबाठा सेनेला राणेंना काही मिळाले की, लगेच पोटात दुखू लागते व सेना नेतृत्व ओकाऱ्या काढू लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांत नारायण राणे हे ५० हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. या निकालाने कोकणातच नव्हे, तर सर्व महाराष्ट्रात आनंद व्यक्त झाला, कोकणवासीयांनी तर जल्लोष केला. पण राणे लोकसभा निवडणूक जिंकल्यापासून उबाठा सेनेची तब्येतच बिघडली. सेनेच्या नेतृत्वाला अनेक आजारांनी पछाडले आहे. त्यातून राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना शिवसेना संपली, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणणार, असा निर्धार व्यक्त केल्याने उबाठा सेनेच्या नेत्यांना संताप येणे स्वाभाविक आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांत पूर्वीच्या शिवसेनेचा व नंतरच्या उबाठा सेनेचा खासदार होता. हा खासदार निष्क्रिय होता, बिनकामाचा होता, विकासाची दृष्टी नसणारा होता तसेच आलेल्या विकास प्रकल्पांना नेहमीच विरोध करणारा होता, अशी त्याची प्रतिमा होती. तेथील मतदारांना परिवर्तन पाहिजे होते. म्हणूनच तेथील मतदारांनी नारायण राणे यांना या निवडणुकीत पन्नास हजार मतांनी निवडून दिले.
निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पक्षाने खरे तर आत्मचिंतन करायला हवे होते. आपला का पराभव झाला, आपण कुठे कमी पडलो, हे शोधायला पाहिजे होते. पण नारायण राणे हे उबाठा सेना संपवायला निघाले म्हणून पक्षाच्या नेतृत्वाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असावी. ज्या क्षणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांसाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव जाहीर केले, त्याच क्षणाला उबाठा सेनेचा पराभव होणार हे निश्चित झाले होते. एकेकाळी कोकण हा शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा भक्कम गड होता. कोकणी माणूस हा हाडाने शिवसैनिक होता. पण कोकणात शिवसेना घराघरांत पोहोचवली ती नारायण राणे यांनीच. त्याचीच पावती म्हणूनच शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसवले होते, याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडलेला दिसतोय.
नारायण राणे यांची उपयुक्तता काय आहे आणि शिवसेनेच्या विस्तारात त्यांचे किती योगदान आहे, याची जाणीव शिवसेनाप्रमुखांना होती. आपल्या राजकीय वाटचालीत नारायण राणे हे अडथळा ठरतील म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात दूर ठेवायला सुरुवात केली होती, हे सर्वांना चांगले ठाऊक आहे. उद्धव यांना पक्षात कोणीही दुसरा लोकप्रिय नेता जवळपास नको होता, पक्षात दुसरा कोणी स्पर्धक असता कामा नये, याची त्यांनी नेहमीच दक्षता घेतली. त्यामुळेच नारायण राणे, एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे हे नेते जवळपास राहू नयेत अशी परिस्थितीच त्यांनी निर्माण केली होती. राणे हे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले व नंतर भाजपात आले, दोन्ही पक्षांत त्यांना मानसन्मान मिळाले. पण त्या पक्षात काय झाले म्हणून उबाठा सेना आज टाहो फोडत आहे. ‘आपले ठेवायचे झाकून व दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ त्यातला हा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये ज्या पक्षाचे १८ खासदार निवडून आले होते, त्या पक्षाला २०२४ मध्ये ९ खासदार निवडून आणताना कसा घाम फुटला, हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. ज्यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही, ज्यांना आपले आमदार- खासदार राखता येत नाहीत, ज्यांना आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह व नाव कायम ठेवता येत नाही, त्यांनी राणे, शिंदे किंवा राज ठाकरे यांना पाण्यात बघू नये.
नारायण राणे यांना भाजपाने पक्षात सन्मानाने घेऊन राज्यसभेची खासदारकी दिली, हे सुद्धा उबाठा सेनेच्या नेतृत्वाला आवडले नव्हते. मोदी-शहांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून केंद्रात मंत्री केले, ते सुद्धा उबाठा सेनेच्या नेतृत्वाला आवडले नव्हते. राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर, आम्ही त्याचीच वाट पाहत होतो, आम्ही त्यांचा पराभव करून दाखवणार, अशी दर्पोक्ती उबाठा सेनेच्या नेतृत्वाने केली होती. प्रत्यक्षात मतदारांनी उबाठा सेनेलाच कोकणातून तडीपार केले. रत्नागिरी-सिंदुधुर्ग, रायगड, कल्याण-डोंबिवली, ठाणे अशा पट्ट्यांत पूर्वी शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. ते या निवडणुकीत संपुष्टात आले. म्हणूनच शिवसेना संपली, शिवसेना संपवणार असे जे नारायण राणे यांनी भाष्य केले, ते वस्तुस्थितीला धरून आहे. त्यात चुकीचे काय आहे?
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांना सूडबुद्धीने पोलीस-प्रशासनाचा गैरवापर करून कसा त्रास दिला हे कोकणातील जनतेने पाहिले आहे, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्या फौजा कशा उतरवल्या होत्या, त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी पोलिसांना कसे फोनवरून आदेश दिले, हे टीव्हीच्या पडद्यावरून जनतेने पाहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नितेश राणे यांना कसा त्रास दिला, हे सर्वश्रूत आहे. कोकणातील जनतेला उद्धव ठाकरे यांचे अहंकारी वागणे आवडले नाही, त्यांनी केलेला सत्तेचा दुरुपयोग पसंत पडला नाही, त्याचा संताप यावेळी मतपेटीतून प्रकट झाला व कोकणातून उबाठा सेना संपुष्टात आली.