Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभगवंत प्रेम... न करायला सबबी पुष्कळ!

भगवंत प्रेम… न करायला सबबी पुष्कळ!

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले, असे नाही म्हणता येणार. संताचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी, हे म्हणणे चुकीचे नाही का? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता, दुखणे बरे व्हावे म्हणून जरी ‘राम राम’ म्हटले, तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील, तर रोगाचे निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढले. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे! हवे-नको पण जिथे आहे, तिथे समाधान नाही हे खास, आपल्या भजन – पूजनाचा हेतू कोणता असेल? तो समजून भजन – पूजन करा म्हणजे झाले!

आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा, त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही; तळमळीची मर्यादा आहे.

खरोखर, परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसते बोलतो, कृती काहीच करीत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले. अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे, भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली, तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीस जायचे, तर योग येत नाही असे म्हणतो! आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की, तुझ्याजवळचे सर्व काही देऊन टाक, तर तो कदाचित देईलही; पण ‘मी दिले’ ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो, हे तो विसरतो.

व्यापाऱ्याला स्वप्न व्यापाराचेच पडते, त्याप्रमाणे, आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते. भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. सहवासाने, निश्चयाने किंवा आपलेपणा विसरल्याने, परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत? मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते, याचे कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली, तरी सवयीने त्याचे प्रेम येऊ शकते. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झाले, तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते; म्हणजेच, प्रेम निश्चयाने येऊ शकते. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवू या. ‘रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे’ असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे. सबबी न सांगता आपले प्रेम प्रपंची लावले आहे, ते रामनामी लावायला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -