Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुंबईतील अग्नितांडव रोखणार कसे?

मुंबईतील अग्नितांडव रोखणार कसे?

सीमा दाते

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारतींचे जाळे पसरले आहेच, पण त्यासोबतच झोपडपट्टी परिसरही आहेच. मात्र या दोन्ही ठिकाणी आग लागण्याची घटना घडतेच, गेल्या दहा वर्षांत पाहिले तर ४८ हजारांहून अधिक आगी लागल्याच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. कधी झोपडीत, कधी इमारतीत तर कधी व्यावसायिक इमारतीत. या आगीमुळे वित्तीय आणि जीवितहानी होते. म्हणूनच आगीच्या घटनांचं प्रमाण कमी झालेच पाहिजे.

महापालिकेसह अग्निशमन दलाच्याही काही त्रुटी असतात. शिवाय, ज्या इमारतीत आग लागते, या इमारतीच्या उभारणीतील काही त्रुटी देखील निदर्शनास येतात. झोपडपट्टीतही आगीच्या घटना घडण्याचं प्रमाण काही कमी नाही. झोपडपट्टीत आग लागण्याच्या घटना थांबवणार कशा? त्यांचं प्रमाण कमी करणार कसं? यावर महापालिकेने नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. झोपडपट्टीत असलेल्या अरुंद जागा, निमुळती गल्ली, एकमेकांना लागून असलेली घरं या सगळ्यांचाच परिणाम अग्निशमन दल ज्यावेळी आग विझविण्यासाठी जात असतं, त्यावेळी होत असतो. अरुंद, निमुळत्या गल्ल्यांमुळे त्यांना प्रवेश करता येत नाही. अशावेळी अग्निशमन दलातील जवान आग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतातच, पण तरीही आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागतो. दाटीवाटीने घरं उभी असल्यामुळे आग लवकर वाढत जाते. मुळात झोपडपट्टी परिसरात आग लागू नये अथवा ती विझविता यावी, यासाठी उपाययोजना करणे कठीणच. फायर सिस्टीम लावणे, अग्निसुरक्षेचे नियम पाळणे हे अशक्यच होते. मग येथे आगीच्या घटना रोखण्यासाठी काय करता येईल, हे महापालिकेने पाहणं गरजेचं आहे.

आग लागू नये अथवा आग विझवता यावी, यासाठी इमारतींची स्वतःची यंत्रणा कार्यान्वित असणं गरजेचं आहे. अग्निसुरक्षेचे नियम पाळणं गरजेचं आहे. इमारतीत हे सहजपणे पाळता येऊ शकते; मात्र काही इमारतींकडे या यंत्रणाच नसतात किंवा असल्या तरी त्या कार्यान्वित नसतात, इमारतींचे फायर ऑडिट झालेले नसते, अशा अनेक बाबी असतात. म्हणूनच आगीच्या घटना रोखण्यात नेहमीच अपयश येतं.

मुंबईत गेल्या दहा वर्षांत ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्या आहेत. या २००८ ते २०१८ या दरम्यानच्या आहेत, तर मागच्या वर्षी म्हणजे २०२०मध्ये ३ हजार ८४१ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात झोपडपट्टी परिसरात तसेच निवासी इमारतींना आग लागल्याच्या घटना जास्त आहेत, तर गगनचुंबी म्हणजे उंच उंच इमारतींना आग लागल्याची घटना या तुलनेत कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे, निवासी इमारतींना आगी लागल्याच्या घटना ८ हजार ७३७ इतक्या आहेत, तर झोपडपटीमध्ये लागलेल्या आगीच्या घटना ३ हजार १५१ आहेत. तसेच गगनचुंबी इमारतीत आग लागल्याच्या घटना १ हजार ५६८ आहेत. जुन्या इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा नसतात, असल्या तरी त्या कार्यान्वित नसतात. जुन्या इमारतींमध्ये लाकडाचा वापर जास्त असतो. अशावेळी आग उग्र रूप धारण करते. एकूण पालिकेबरोबरच रहिवाशांनी देखील तितकेच जबाबदारीने राहणं गरजेच आहे.

गगनचुंबी इमारतींचा विचार केला असता अशा इमारतींमध्ये सगळ्यात आधी अग्निसुरक्षा यंत्रणा, फायर मशीन, स्मोक मशीन कार्यान्वित असणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात काचेच्या आणि उंच इमारती या नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहेत. मात्र या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का याची महापालिका आणि अग्निशमन दलाने खात्री करणं गरजेचं आहे. अनेकदा अशा इमारतींमध्ये आग रोखण्यात अपयश येत. एक तर इमारत पूर्ण काचेची असल्यामुळे धूर बाहेर जात नाही, तर उंच असल्यामुळे अग्निशमक दलाल तिथंपर्यंत लागलीच पोहोचणं शक्य होत नाही. काही वर्षांपूर्वी अंधेरी येथे लोटस या इमारतीला आग लागली होती. यावेळी काचेची इमारत आणि त्यातही उंच यामुळे अग्निशमक दलाल आग विझविणे अडचणीचे झाले होते. असाच प्रकार अंधेरी एमआयडीसी येथील कामगार रुग्णालयाच्या बाबतीत घडला होता. त्यानंतर मात्र महापालिकेने अग्निशमन विभाग आधुनिक केला. सध्या अग्निशमन विभागात ९० मीटर उंचीची शिडी आहे त्यामुळे २० ते २२ मजल्यापर्यंत आग विझविता येऊ शकते, मात्र त्यापेक्षाही उंच इमारत असेल, तर मात्र काय करावे? कशी आग विझवावी? याची उपाययोजना अग्निशमन दलाकडे आहे का?

सर्वाधिक आगीच्या घटना शॉकसर्किटमुळे घडल्या आहेत. साधारण ३२ हजार ५१६ घटना आहेत. त्यामुळे इमारतीमध्ये सुरक्षाउपकरण असणं आणि अग्निशमन दलाने याबाबत जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. कारण आगीच्या घटना रोखणं हे एक आव्हान आहे, असेच
म्हणावे लागेल.

seemadatte12@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -