दुबई (वृत्तसंस्था): कुठल्याही खेळात गत कामगिरीच्या आधारे निकाल ठरवता येत नाही. त्या-त्या दिवशी सरस कामगिरी करणारा संघ जिंकतो. यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप क्रिकेटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी भारताच्या चाहत्यांना तसा अनुभव आला. माजी विजेता भारताचा संघ वर्ल्डकपमध्ये प्रथमच पाकिस्तानविरुद्ध हरला, तोही दहा विकेटनी. लाजिरवाण्या पराभवापेक्षा विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी अपेक्षाभंग केल्याचे दु:ख अधिक आहे.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताने यापूर्वी पाच वेळा बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानने जिगरबाज खेळ करून पराभवांची मालिका खंडित केली. १५२ धावांचे आव्हान फार मोठे नसले तरी प्रतिस्पर्ध्यांनी दहा विकेट राखून मिळवलेला विजय जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे. भारताच्या नावाजलेल्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहणे जड झाले. त्याच खेळपट्टीवर मोहम्मद रिझवान (५५ चेंडूंत नाबाद ७८ धावा) आणि कर्णधार बाबर आझमने (५२ चेंडूंत नाबाद ६८ धावा) केलेली फटकेबाजी म्हणजे भारताच्या अनुभवी गोलंदाजांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे बॅटरप्रमाणे बॉलरही पराभवासाठी तितकेच जबाबदार आहेत. स्विंग टाकण्यात तरबेज असलेल्या मध्यमगती भुवनेश्वरने तीन षटकांत २५ धावा दिल्या. अनुभवी मोहम्मद शमी (४२-०)आणि जसप्रीत बुमरानेही (२२-०) स्वैर गोलंदाजी केली. त्याचा फायदा पाकिस्तानच्या ओपनर्सनी उठवला. नवोदित वरुण चक्रवर्ती (३३-०) आणि रवींद्र जडेजाने (२८-०) निराशा केली.
त्यापूर्वी, भारताला स्टार फलंदाज रोहित शर्मासह लोकेश राहुलकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, दोघांनीही निराशा केली. उपकर्णधार खातेही उघडू शकला नाही. राहुल केवळ तीन धावा करू शकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम स्पेल टाकताना पाकिस्तानला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
ओपनिंग जोडी लवकर बाद झाल्याने मधल्या फळीवर दडपण आले. कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धाडस दाखवले तरी रिषभ पंत वगळता अन्य फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाही. सूर्यकुमार यादवसह अष्टपैलू जोडी हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाला दडपण हाताळण्यात अपयश आले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याच्या गोलंदाजांचा वापर योग्य प्रकारे केला. डावखुऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने विश्वास सार्थ ठरवल्यानंतर त्याने इमाद वासिमला थांबवताना दुसरा मध्यमगती गोलंदाज हसन अलीला गोलंदाजीला आणले. त्यानेही विकेट घेतली. शेवटच्या षटकांमध्ये अली थोडा महागडा ठरला तरी शादाब खान आणि हॅरिस रौफने त्यांचा कोटा पूर्ण करतानाच एकेक विकेटही घेतली.