मुंबई, कोकणात संततधार; राज्यात शुक्रवारपर्यंत पाऊस!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. मुंबई शहराबरोबरच उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमधील काही ठिकाणी सौम्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे.

‘ओमायक्रॉन’चा ‘राणीबाग’ला फटका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिकेने पुन्हा निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार राणीबागेत पर्यटकांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कोरोनानंतर १ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली. दिवसाला दहा हजार पर्यटक येत असून सुट्टीच्या दिवशी १५ ते १६ हजारांवर जात आहेत. यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सतर्क होत दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू झाल्यानंतर सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी असणारी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १६ हजारांवर गेल्याने धोका असल्यामुळे पालिकेने आता गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करत गर्दी वाढल्यास दुपारी २ वाजता गेट बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.

एलपीजी गॅस सिलिंडर १०० रुपयांनी का महागले?

मुंबई : डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी १०० रुपयांनी एलपीजी गॅस सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यामुळेच एलपीजी गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महागले आहेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर १०३.५० रुपयांनी वाढ केली आहे.

दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत १०० रुपयांनी वाढून २१००.५० रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅसचा दर २,०५१ रुपयांवर गेला आहे. यापूर्वी याची किंमत १,९५० रुपये होती. येथे १०१ रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या वापरासाठी १४.२ किलो विनाअनुदानित (विना सबसिडी) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.

पालघर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप

पालघर (प्रतिनिधी) : बुधवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला. दिवसभर लोकांना सूर्याचे दर्शन होऊ शकले नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. या पावसाने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे आजारपण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पाऊस दोन दिवस राहील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून वातावरणसुद्धा ढगाळ राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या आठ महिन्यांत अधूनमधून पावसाचे आगमन सुरूच आहे. दिवाळीच्या दरम्यानही पावसाने हजेरी लावली होती. तथापि, तोपर्यंत शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही; परंतु त्यापूर्वी झालेली अतिवृष्टी व दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची उर्वरित कामे जलदगतीने पार पाडली.

वाड्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

वाडा तालुक्यात बुधवार (दि. १ डिसेंबर) सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताच्या भाऱ्यांत पाणी गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. शिवाय, गुरांसाठी असणारा पेंढा पाण्यात भिजल्याने तोही खाण्यालायक राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी पूर्वजांपासून सांभाळून ठेवलेले भातशेतीचे क्षेत्र कमी केलेले नाही. खते, बियाणे, मजुरी, अवजारे या खर्चात प्रचंड दरवाढ झालेली असतानाही येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भातशेती आजवर त्याच जोमाने केली आहे. खरीप हंगामात भात हे एकमेव पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भातपिकाला गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, या पावसामुळे रब्बी पिकेही कुजून जाणार आहेत. येथील शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाशी सामना करत असताना तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड देत असताना पीक विमा कंपन्यांकडून येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देता तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

विमा कंपन्यांची नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ

खरीप हंगामात भातशेती करण्यासाठी दर वर्षी येथील अनेक शेतकरी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून पीककर्ज घेत असतो. हे पीककर्ज देताना सहकारी संस्था या शेतकऱ्यांकडून भातपिकांचा विमा काढतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीत या विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत असतात, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

वसई-विरारमध्ये पावसाच्या सरी

हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टप्रमाणे वसईत बुधवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना हैराण केले आहे.

भारतीय हवामान पालघरला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पालघर, बोईसर, डहाणू, वसई भागात पावसाची संततधार सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत १ डिसेंबरला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वसई-विरारमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वसई-विरारच्या काही भागांत हलका पाऊस पडला. नालासोपारा पूर्व, विरार पूर्व याठिकाणी असलेल्या सकल भागात पाणी साचले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरीपण मंगळवारी पावसाचा अंदाज असूनही पाऊस न पडल्याने दिसल्याने नागरिकांनी कोणतीही तयारी न ठेवल्याने बुधवारी अचानक सकाळी पाऊस सुरू झाला आणि रोजच्या कामात नागरिकांना त्रास झाला. याचबरोबर या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाही याचा मोठा त्रास झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

डहाणूत अवकाळी पावसामुळे शेतकरी-मच्छीमारांचे नुकसान

डहाणू तालुक्यात बुधवार सकाळपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेले दोन-तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मुंबई हवामान विभागाने पाऊस कोसळण्याची व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरवत बुधवार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे भातझोडणी, पावळी, गवत भिजून गेले आहे. तसेच, बागायतदारांनी लागवड केलेला भाजीपाला, ऐन फुलावर आलेली मिरची, ढोबळी मिरचीची फुले गळून गेल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. या पावसामुळे बागायतदारांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

याशिवाय, या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान मच्छीमारांचे झाले आहे. सध्या बोंबील मासेमारीचा हंगाम सुरू असून धाकटी डहाणू येथे उन्हात सुकत टाकलेले बोंबील, करंदी, मांदेली, सुकट असे मासे पाऊस पडल्यामुळे जमिनीत पुरून टाकण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. शिवाय, हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह वादळीवाऱ्याबरोबरच पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना पुन्हा माघारी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मासेमारी पूर्णपणे बंद राहिली असल्याने त्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

रायगडावर पर्यटकांना सात डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी

अलिबाग : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

दिनांक तीन डिसेंबर २०२१ ते सात डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असे संभाजीराजे ट्विटरवरुन म्हणाले होते.

यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. मोदींच्या सुरक्षेचे कारण पुढे करत ४ जानेवारीपासूनच रायगडाचे दरवाजे सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांमधे नाराजीचा सूर दिसून आला होता.

दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने पेट्रोलचे दर ८ रुपयांनी कमी केले आहेत. तसेच व्हॅटमध्येही मोठी कपात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्रीपासूनच हे नवे दर लागू होणार आहेत.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठाकरे सरकार देखील असा निर्णय घेणार का? असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने पाच रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते.

देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

भाजपच्या पराभवासाठी आम्हाला लढावे लागेल- ममता

मुंबई : भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला लढावे लागेल. सर्व प्रादेशिक पक्ष एकजूट झाले तर भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला.

ममता गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. राहुल गांधींचे नाव न घेता ममतांनी त्यांच्यावर टीका केली. एखाद्याने काहीच करायचे नाही आणि फक्त विदेशात राहायचे. अशाने काम कसं चालेल? तुम्ही फिल्डवर राहणार नाही, तर भाजप तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्ड रहाल तर भाजपचा पराभव होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

काँग्रेस आणि डावे आपल्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो.

शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांना मोबदला नाही- केंद्र सरकार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला दिला जावा अशी मागणी होत आहे. परंतु, सरकार या मृतक आंदोलकांच्या कुटुंबियांना मोबदला देणार नसल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज, बुधवारी संसदेत दिली.

याबाबत लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तोमर म्हणाले की, तब्बल वर्षभर चाललेल्या या आंदोलना दरम्यान, किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतर प्रश्नांसह, खासदारांना आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांवर किती गुन्हे दाखल झाले आहेत, हे जाणून घ्यायचे होते. यासोबतच, राष्ट्रीय राजधानीत आणि इतर ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? याचीही माहिती मागवण्यात आली होती. यावेळी मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट उत्तर देण्यात आले होते की, या प्रकरणी आपल्याकडे कोणतीही नोंद नाही, त्यामुळे आर्थिक मदत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

या प्रश्नाच्या पहिल्या भागांत उत्तर देताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं शेतकरी नेत्यांशी चर्चेच्या ११ फे-या कशा केल्या, हे सविस्तरपणे सांगण्यात आलं. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आंदोलनादरम्यान, मृत शेतकऱ्यांना शहीद शेतकरी म्हटलं. शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी जीव गमावल्याचा दावा केला आहे.

‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटवर ‘कोविशिल्ड’ किती प्रभावी, दोन-तीन आठवड्यांत समजणार

पुणे : करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटवर ‘कोविशिल्ड’ किती प्रभावी आहे, हे येत्या दोन-तीन आठवड्यांत समजणार आहे, अशी माहिती ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले. ‘ओमायक्रॉन’ किती घातक आहे, याविषयी आताच सांगता येणार नाही, असेही पूनावाला यावेळी म्हणाले.

‘सध्या ‘ओमायक्रॉन’ने जगातच भीतीचे वातावरण आहे, तर सध्याच्या करोना प्रतिबंधक लस या संसर्गावर प्रभावी आहे का, याविषयी जगभरात आणि विशेषतः भारतात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे याविषयी ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. ते या विषयातील निष्कर्षापर्यंत पोहोचले तर पुढील लसनिर्मिती करणे सोपे जाईल,’ असे पूनावाला म्हणाले.

बूस्टर डोसवरही भाष्य

सध्या बूस्टर डोसची चर्चा जगभरात होत आहे. त्याविषयी पूनावाला म्हणाले ‘बूस्टर डोस आपल्यापुढे पर्याय आहे. परंतु सध्या करोनावरील दोन डोस देण्यावर आणि देशातील लसीकरण पूर्ण करण्यावर सरकारचे लक्ष्य आहे. देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ‘सीरम’ने २५ कोटी डोस राखीव ठेवले आहेत.

बूस्टर डोस देण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला, तर आम्ही लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा डोस घेता येऊ शकतो. तसेच त्याची किंमत ६०० रुपये असेल.’

कोवोवॅक्स’ लसीचा मुबलक साठा आमच्याकडे आहे. करोनावरील ही स्वदेशी लस आहे. पुढील काही आठवड्यांत या लसीच्या वापराला परवानगी मिळणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होईल.

डोंबिवलीतील ८० टक्के पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार!

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १ डिसेंबरपासून १ पहिलीपासून शाळा सुरु करण्याचे ठरविले होते. मात्र ओमायक्रॉन विषाणूने पुन्हा एकदा सर्वाना चिंतेत पाडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेऊन मुलांच्या आरोग्याशी खेळू नये असे पालकवर्गांचे म्हणणे आहे. शिक्षण स्वाभिमानी संघटनेने सरकारच्या या निर्णयाला ठाम विरोध केला आहे. या निर्णयाबाबत सरकारने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने द्यावी अशी मागणी पालकांनी पत्रकारांशी बोलताना केली. याबाबत संघटनेने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना लेखी पत्र दिले आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील आधार इंडिया कार्यालयात शिक्षण स्वाभिमानी संघटनेने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, सल्लागार डॉ.अमित दुखंडे यांसह अनेक पालक उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गायकवाड यांनी पालकांची बाजू मांडताना राज्य सरकारने विद्यार्थ्यांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. तर डॉ. दुखंडे म्हणाले, यांनी लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याशिवाय शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये.

तर यावेळी पद्मजा तेजव म्हणाल्या, गेली दीड वर्ष ऑनलाईन पद्धतीने शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यत राज्य सरकारने ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याबाबतचा निर्णय घेऊ नये अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष गायकवाड हे पुढे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात अनेक पालक संघटना आहेत. या सर्व पालक संघटनेशी आमची चर्चा सुरु आहे. डोंबिवलीतील जवळपास ८० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांना विचारात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.