‘महावितरण, बीईईच्या गो इलेक्ट्रिक रोड शोला मोठा प्रतिसाद’

मुंबई (प्रतिनिधी) :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. पारंपरिक इंधनासह देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे आवाहन महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी केले. यावेळी महावितरण, बीईईच्या ‘गो इलेक्ट्रिक’ रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला.

महावितरण व ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) तर्फे आयोजित ‘गो इलेक्ट्रिक’ या इलेक्ट्रिक व्हेहीकल रोड शोचे उद्घाटन करताना खंडाईत बोलत होते. या प्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं) भारत जाडकर व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुभेच्छा संदेश पाठविल्यात.

कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, पर्यावरण संरक्षण करण्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग फार मोलाचा आहे. इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांना राज्य शासन व केंद्र शासनाने दिलेल्या अनेक सवलती दिलेल्या आहेत. राज्य शासनाचे ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१’ मध्ये चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढविण्यात येणार असून या धोरणाद्वारे राज्य सरकारने महावितरण कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन पुरविण्यासाठी नोडल एजेन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

या कार्यक्रमात पथनाट्यद्वारे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण व त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग याबद्दल एक सुंदर पथनाट्य सादर केले. त्यानंतर, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी रोड शोला हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला.

कॅट आणि विकी मुंबईत दाखल

मुंबई  कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नवं दांपत्य आज मुंबईत दाखल झाले राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग केल्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबईत आले. हे न्यूली मॅरीड कपल मुंबईत येणार हे फोटोग्राफर्सला आधीच कळालं होतं त्यामुळे सगळ्या मीडियाने तिथे आधीच गर्दी केली होती.

हे दोघे विमानतळावर येताच कॅमेराचा लखलखाट झाला. कतरिनानेदेखील हात उंच करत फोटोग्राफरर्सना छान पोझ दिली. यावेळी कतरिनाने पीच कलरचा सुंदर सलवार सूट घातला होता. हातात लाल चुडा, भांगेत कुंकू अशा नव्या नवराईच्या थाटात दिसली तर विकी क्रीम कलरच्या शर्ट पॅन्टमध्ये होता…दोघेही हातात हात घालून विमानतळावर उतरली ,,,

9 डिसेंबरला राजस्थानमध्ये अत्यंत राजेशाही थाटात या दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले….

मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव

दीपक मोहिते

पालघर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तलासरी, विक्रमगड व मोखाडा या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकांसाठी प्रचाराची धामधूम मंगळवारपासून सुरू झाली असून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ ५ दिवस मिळाले आहेत.

मोखाडा येथे सध्या शिवसेनेची सत्ता असून ती हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी (बविआ) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे तिघे एकत्र आले आहेत. राज्यस्तरावर सेनेसह हे तीन पक्ष महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असूनही या निवडणुकीत सेनेला पराभूत करण्यासाठी एकवटले आहेत. दुसरीकडे, भाजप व जिजाऊ संघटनेनेही सेनेसमोर आव्हान उभे केले आहे. येथील राजकीय वातावरण लक्षात घेता सेना व भाजप / जिजाऊ या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांत नगरपंचायत क्षेत्रात विकासकामांना गती मिळू शकली नाही. त्याचा फटका सत्ताधारी सेनेला बसू शकतो. एकूण ६५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात विरोधीपक्षाचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या अपयशावर भर देत आहेत. आजही हा परिसर विकासाच्या बाबतीत मागसलेलाच आहे. आरोग्य, स्वच्छता व नागरी सोयी-सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये या निवडणुकीसंदर्भात फारसा उत्साह दिसून येत नाही. मतदानाची टक्केवारी घसरल्यास त्याचा फायदा सेनेला होऊ शकतो.

तलासरी येथे ७२ उमेदवार रिंगणात आहेत सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी इतर पक्ष प्रयत्नशील असले तरी खरी लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजपमध्ये होईल. आजवर झालेल्या अनेक लढतींमध्ये हे दोन्ही पक्ष कायम एकमेकांसमोर उभे ठाकले. पण प्रत्येक वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाजी मारली आहे. या भागात काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे भाजप-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होईल.

गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून भरीव विकासकामे झाली नाहीत. वाढते नागरीकरण, नागरी सुविधांचा अभाव व लोकप्रतिनिधींची उदासीनता अशा कारणांमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य, साफसफाई, रोडलाईट्स व डंपिंग ग्राऊंड असे ज्वलंत प्रश्न आजही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.

विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत लोकसंख्येच्या वाढीला प्रचंड वेग आला आहे. पूर्वी ग्रामपंचायत काळात निधी अभावी अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत. पण पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पुरेसा आर्थिक निधी मिळूनही विकासकामे करण्यात आली नाहीत. रस्त्याची दुरवस्था, वाहतूककोंडी, रस्त्यालगत दोन्ही बाजूंना भरणारा बाजार, रस्तेसफाई अशा समस्या विक्रमगडवासीयांच्या पाचवीला पूजल्या आहेत. त्यामुळे पूर्वी होती ती ग्रामपंचायत बरी होती, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एकूण ७८ उमेदवार आजमावत आहेत नशीब

या निवडणुकीत एकूण ७८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. काही प्रभागांतील उमेदवार तांत्रिक कारणावरून अपिलात गेले आहेत. येथे जिजाऊ संघटना सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. वरवर युती झाली असली तरी स्थानिक नेत्यांची मने मात्र जुळलेली नाहीत.

महानगरपालिका नाही ही तर बजबजपुरी!

पालघर (प्रतिनिधी) :वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील चार शहरांच्या लोकसंख्येच्या वाढीला सध्या प्रचंड वेग आला आहे. पाणी, रस्ते, गटारे, आरोग्य, शहर स्वच्छता अशा नागरी सुविधांचा पार बोजवारा उडाला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एकदिवस आड पाणी मिळणे हे करदात्यांच्या पाचवीला पुजले आहे. शहर स्वच्छता, रस्तेसफाई व कचरा उचलणे अशा आरोग्य विषयक सेवांवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये ठेकेदारांच्या घशात टाकण्यात येतात, पण ही चारही शहरे विशेषकरून, पूर्व परिसर बकाल परिसर म्हणून ओळखला जातो.

अनेक भागांत चार-चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे करदात्यांना टँकरच्या घाणेरड्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्याऐवजी मनपाचे अधिकारी खतपाणी घालत असतात. त्यामुळे हद्दीत आजच्या घडीला सुमारे २५ ते ३० हजार अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या सर्व अनधिकृत इमारतींना वीज, पाणी अशा सुविधा ताबडतोब दिल्या जातात. या अशा गोरखधंद्यात खोऱ्याने पैसा मिळत असल्यामुळे मनपा अधिकारी अशा बांधकामांवर कारवाई करत नाहीत. त्यामुळे उपप्रदेशात ‘करदाते उपाशी, तर चाळमाफिया तुपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशा अनधिकृत बांधकामातील खोल्या स्वस्त दरात मिळत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस त्या खरेदी करतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला असून मनपा क्षेत्राची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात पोहोचली आहे. सन २०२५ पर्यंत ती २० लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चार महानगरांच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवणे अशक्य कोटीतील गोष्ट असून महानगरपालिका प्रशासनाने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना हाती घेण्याची गरज आहे.

सध्या या उपप्रदेशाला दररोज २४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे संबधित विभागाचा दावा आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत असेल तर अनेक भागाला चार-चार दिवस पाणी का मिळत नाही, उपप्रदेशात टँकरचा सुळसुळाट का सुरू आहे, असा सवाल करदाते करत आहेत. करदात्यांकडून पाण्याची भरमसाठ बिले वसूल केली जातात मग हे पाणी नक्की जाते कुठे? भटकी कुत्र्यांचा मुक्तवावर, डासांचा प्रादुर्भाव, महिनोमहिने औषध फवारणी न होताही यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोणाच्या घशात जातो, असा सवाल करदाते करत आहेत.

सध्या या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. ही राजवट अधिकाऱ्यांसाठी निव्वळ दुभती गाय ठरली आहे. सध्या मनपा प्रशासन असून नसल्यासारखे आहे. ‘लुटो और भागो’ अशी मानसिकता असणाऱ्या अधिकाऱ्यांचा भरणा झाला असून त्यांना मंत्रालयातील उच्चपदस्थांचा आशीर्वाद आहे. तुम्ही खा, आम्हाला पण खाऊ घाला, असा अलिखित करार अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये झाला आहे, असाही आरोप स्थानिक करत आहेत.

परिसराचा बट्ट्याबोळ-अनंत रायबोले, विरार

मनपा प्रशासन कसे नसावे हे दाखवायचे झाल्यास वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवता येईल. गैरप्रकार, भ्रष्टाचार व मनमानी कारभार म्हणजे ही महानगरपालिका. कोणतेही काम कधीही वेळेवर न करणारे, सहसा लोकांना न भेटणारे असे अधिकारी या महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे परिसराचा बट्ट्याबोळ झाला आहे. – अनंत रायबोले, विरार

प्रशासन असून नसल्यासारखे आहे. – संगीता जाधव, नालासोपारा

घरपट्टी व पाण्याची बिले भरूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात नाही. निवडणुका आल्या की भरमसाठ आश्वासने मिळतात, पण पाणी मिळत नाही. सध्याची प्रशासकीय राजवट ही जुलमी राजवट असून सर्वसामान्य लोकांचे म्हणणेही ऐकले जात नाही. त्यामुळे प्रशासन असून नसल्यासारखे आहे. – संगीता जाधव, नालासोपारा

वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली – सागर जोशी, वसई रोड

चालायला धड रस्ते नाहीत, वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली, फेरीवाल्यांचा प्रचंड सुळसुळाट, लाखो रुपये खर्च करून कार्यान्वित केलेल्या सिग्नल यंत्रणेची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, विस्कळीत वैद्यकीय यंत्रणा व शहर स्वच्छतेचा उडालेला बोजवारा अशा स्थितीत आम्ही तिसऱ्या मुंबईची स्वप्ने रंगवत असतो. कदाचित हे सारे गेल्या जन्मात आम्ही करदात्यांनी केलेली पापे असावीत, त्यामुळे या जन्मी आम्ही वसईकर भोगत आहोत. – सागर जोशी, वसई रोड

आता केवळ काँक्रिटचे जंगलच आमच्या नशिबी आहे. – अनिता लेले, वसई गाव

आम्ही ऐतिहासिक नरवीर चिमाजी अप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसई नगरीचे नागरिक आहोत. पण वीज, पाणी, आरोग्य, वैद्यकीय सेवा या चार मूलभूत गरजांपासून आम्ही गेली अनेक वर्षे वंचित आहोत. मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले व आम्हा स्थानिक भूमीपुत्रांची हालअपेष्टांमध्ये भर पडली. दाटीवाटीने उभ्या राहिलेली बांधकामे, गटारव्यवस्था नाही, चालायला पदपथ नाहीत, वाहतूककोंडी व फेरीवाल्यांची दादागिरी यामध्ये आमची वसई पार हरवली आहे. आता केवळ काँक्रिटचे जंगलच आमच्या नशिबी आहे. – अनिता लेले, वसई गाव

राज्य सरकारने उचललं एसटी कर्मचा-यांच्या बडतर्फीचं पाऊल

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून आजपासून  बडतर्फीची कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे. गेले अनेक दिवस कामावर हजर न राहिल्यानं  महामंडळाने हे पाऊल उचललं आहे. 

आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.  सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता.  त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने आता कारवाईला सुरुवात केली आहे. 

राज्य सरकाच्या  विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा  नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो .त्यानंतर तीन सुनावणी होतात. त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते.  या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो.  आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.

जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. झटपट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी तो या निर्णयाप्रत आल्याचे समजते. न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजा खेळला. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास जडेजाला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी जयंत यादवला जागा मिळाली आहे. जडेजाची दुखापत गंभीर असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२मध्ये जडेजा पूर्ण क्षमतेसह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. पुढील मोसमासाठी चेन्नईने त्याला कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त पसंती दिली आहे. तो धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून तो प्रबळ दावेदार आहे.

अफगाणिस्तान संघ मार्चमध्ये भारत दौऱ्यावर

काबुल (वृत्तसंस्था): अफगाणिस्तान क्रिकेट संघ मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यात उभय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील. अफगाणिस्तान बोर्डाच्या २०२२-२३ कालावधीसाठीच्या फ्यूचर टूर प्रोग्राममध्ये (एफटीपी) एकूण ११ वनडे, ४ टी-ट्वेन्टी आणि २ कसोटी मालिकांचा समावेश आहे. या सर्व मालिका पुढील दोन वर्षांत खेळवल्या जाणार आहेत.

भारताशिवाय अफगाणिस्तानचा संघ नेदरलँड, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या संघाविरुद्ध देखील खेळणार आहे. १८ लढती मायदेशात तर ३४ लढती परदेशात खेळतील. याशिवाय अफगाणिस्तानच्या वेळापत्रकात आशिया कप २०२२, टी-ट्वेन्टी वर्ल्डकप २०२२, आशिया कप २०२३ आणि वर्ल्डकप २०२३ वर्ल्डकपचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेत बीसीसीआय अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. अशाच प्रकारचा दौरा भारताने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या आधी श्रीलंकेविरुद्ध केला होता.

याला सगळेच जबाबदार – राज ठाकरे

औरंगाबाद : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पत्रकार परिषदेत बोलताना देशासह राज्यातील विविध मुद्य्यांवर परखड मत व्यक्त केले. तसेच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना त्यांनी राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असा प्रश्न विचारत राज्यात आणि देशात निर्माण झालेल्या अनिश्चिततेला प्रसारमाध्यमांसह सगळेच जबाबदार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील आणि देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहेत, असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानींच्या घराखाली आढळलेली बाँब ठेवलेल्या गाडीबद्दलही त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

“भाजपा नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, असे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आताचे एकूण हे तिघांचे सरकार पाहता, काही आता सरकार पडेल असे मला वाटत नाही. तसेच, मला वैयक्तिक कुठले कोणाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. घोटाळ्यांपेक्षा कोणाच्या घरात मला डोकवायचं नाही. या सगळ्यामध्ये एकटे किरीट सोमय्या… ते पूर्वीपासून हेच करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची देखील उत्तरं सापडत नाहीत.

महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते, त्यासाठी म्हणून आपण शॅडो मंत्रिमंडळ निर्माण केले. मात्र त्याचवेळी नेमका लॉकडाउन लागला. या कोरोनाच्या काळात आमच्या अनेक लोकांनी प्रचंड काम केले. परंतु ते प्रचंड का हे सोशल मीडियावरतीच राहीले. ज्यांच्यापर्यंत आमचे लोक पोहचले त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. रोजच्या रोज आपण प्रत्येक गोष्टीला शिव्या घालायच्या, या औरंगाबाद महापालिकेत एवढे प्रश्न आहेत, पाणी, रस्त्यांसह अनेक प्रश्न असतील, पण निवडणुकीच्या वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विसर पडत असेल, तर मला असे वाटते की मग तुम्ही हेच भोगा, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

व्यावसायिक देश सोडून गेले त्याबद्दल बोलताना म्हणाले, “मी कालच म्हणालो, यामध्ये नोटाबंदीपासून ते या सगळ्या लॉकडाउनपर्यंत सर्वच गोष्टी आल्या आहेत,” असेही यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखवले.

विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांच्या कार्यशैलीवर देखील बोट ठेवले. मुळ विषय बाजूला ठेवून, इतर विषय दाखवले जातात. यात राजकारण्यांकडून प्रसार माध्यमांचाही वापर केला जातो. त्यातून आर्यन खान प्रकरण, वाझे सारखे प्रकरण दाखवले जातात. मात्र, पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडल्याचा कोणीही शोध घेत नाहीत. त्यामुळे किती रोजगारांवर परिणाम होतो हे कुणी बघत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोहलीची वनडे मालिकेतून माघार

नवी दिल्ली/मुंबई (वृत्तसंस्था): माजी कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. उभय संघांमधील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतही तो खेळण्याबाबत साशंकता आहे. मुलगी झीवा हिच्या पहिल्या वाढदिवसासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘ब्रेक’ मिळावा, असे त्याने बीसीसीसीआयला कळवले आहे.

भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका १९ ते २३ जानेवारी २०२१ या कालावधीत खेळली जाणार आहे. विराटची मुलगी झीवा हिचा वाढदिवस ११ जानेवारीला आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत आणि पहिल्या कसोटीसाठी विराटने विश्रांती घेतली होती. भारताच्या आफ्रिकन दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सेंच्युरियन कसोटी मालिकेने होणार आहे. उर्वरित दोन कसोटी सामने ३ ते ७ आणि ११ ते १५ या कालावधीत पार्ल येथे होतील.

दोन्ही कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी

आगामी द. आफ्रिका दौऱ्यात विराट कोहली तसेच रोहित शर्मा हे अनुक्रमे कसोटी तसेच झटपट प्रकारांतील कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे. वनडे आणि टी-ट्वेन्टी कर्णधार रोहित हा स्नायू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून ‘आउट’ झाला आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे. गंभीर दुखापत पाहता वनडे मालिकेसाठी तो उपलब्ध असण्याबाबत साशंकता आहे.

तिसऱ्या कसोटीत विराट न खेळल्यास नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे. उपकर्णधार रोहित या मालिकेत खेळणार नाही. रोहितच्या जागी नव्या व्हाइस कॅप्टनची निवड झालेली नाही. कसोटी उपकर्णधारपदासाठी माजी उपकर्णधार आणि अनुभवी अजिंक्य रहाणेचे नाव आघाडीवर आहे. काहीच दिवसांपूर्वी विराटकडून वनडे प्रकाराचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि रोहितकडे ही जबाबदारी सोपण्यास आली होती. त्यापूर्वी, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर रोहितला या प्रकाराचा पूर्णवेळ कर्णधार नेमण्यात आले.

बिग बॉसमध्ये जय आणि विकासची डील…

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांवर पडला नॉमिनेशनचा बॉम्ब. या टास्कमध्ये कोणता सदस्य कोणत्या सदस्याला नॉमिनेट करणार हा प्रश्न फक्त प्रेक्षकांनाच पडला नसून घरातील सदस्यांना देखील पडला आहे. आणि याचसंदर्भात विशाल आणि मीनल तर दुसरीकडे विकास आणि जय चर्चा करताना दिसणार आहेत.

विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटतं की, मी हे deserve करतो. आपण असा निर्णय घेतला टास्कमध्ये की कोणाचे पैसे कमी व्हायला नको जो finalist आहे. जो कोणी होईल finalist त्याला मॅक्सिमम अमाऊंट मिळेल. कारण मी जर नॉमिनेट झालो तर अर्धे पैसे कमी होत आहेत आणि हे नको व्हायला. दुसरीकडे जय आणि विकासमध्ये डील झाली. मीनल विशालला विचारणार आहे तुला काय वाटतं तुझं नावं कोण घेईल ? त्यावर विशाल म्हणाला, कोणी येडा असेल तोच देईल. द्यायलाच नाही पाहिजे. मीनलचे म्हणणे आहे, त्यांना एवढी अक्कल पाहिजे…आता आजच्या भागात आणखी काय घडतं त्याचेदेऱखिल अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.

_