Friday, May 10, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनपुस्तके : माणूसपणाची खूण

पुस्तके : माणूसपणाची खूण

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

माणूस अनेक बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा अनेक गोष्टींत वेगळा ठरतो. याविषयीचे कितीतरी मुद्दे समोर ठेवता येतील. त्यातला कुठला मुद्दा महत्त्वाचा?मला नेहमी वाटतं माणसाला भाषेचे वरदान असणे, त्याआधारे त्याने व्यक्त केलेले विचार, त्यांच्या आदान- प्रदानाकरता निर्माण केलेली ‘पुस्तक’ नावाची गोष्ट हा माणसाचा सर्वात महान शोध आहे. हे अधोरेखित करण्याचे निमित्त म्हणजे या महिन्यातील जागतिक पुस्तक दिन! नुकताच २३ एप्रिल हा दिवस पुस्तक दिन म्हणून जगात साजरा झाला.जगात अनेक भाषांमध्ये, विविध साहित्य प्रकारांमध्ये असंख्य पुस्तके लिहिली जातात. आपले कुतूहल शमवणारी, आपली जिज्ञासा जिवंत ठेवणारी, प्रश्नांची उत्तरे देणारी आणि प्रश्न उपस्थित करणारी, आपल्या जगण्याचा अवकाश भारून टाकणारी!

संस्कृतीच्या कितीतरी धाग्यांशी बांधून ठेवणारी, पण वाचनाचा संस्कार आपल्याकडे किती रुजला आहे, असा प्रश्न पडतो. संगणक आल्यानंतर माहितीचा प्रचंड भडीमार आपल्यावर होऊ लागला. या भडीमारात ज्ञानाची लालसा हरवून गेली. कवी गुलजार यांची पुस्तकांविषयीची सुंदर कविता माझ्या वाचनात आली, या कवितेचा आशय काहीसा असा आहे; पुस्तके, जी डोकावतात, बंद कपाटाच्या काचांतून. मोठ्याउत्सुकतेने पाहतात. आता महिनोन् महिने पुस्तकांशी भेट होत नाही.

जी संध्याकाळ त्यांच्यासोबत जायची, ती आता संपते संगणकाच्या पडद्यासोबत… पुस्तके अस्वस्थ झाली आहेत जी नाती दाखवायची, ती नाती विस्कटली आहेत. कितीतरी शब्दांचे अर्थ गळून पडले आहेत. सुकून काष्ठ झालेत शब्द… एकूणच संवेदनाशून्य झालेला भोवताल आज पुस्तकांना निर्जीव करण्याच्या तयारीत आहे. पुस्तके खरंतर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार बनू शकतात. अर्थात त्यांना आपण आपल्या आयुष्यात सामावून घेतले तरच! मला पुस्तकदिनालाच एक संदेश आला, ‘हे शतक कदाचित पुस्तकांशी मैत्री करण्याचे शेवटचे शतक असेल’. वाचून मन अस्वस्थ झाले.

एक मनात कोरला गेलेला क्षण आठवला. एका इमारतीसमोरचा कट्टा नि त्या कट्ट्यावर बसलेली मुले. ही सर्व कुमारवयीन मुले होती. या मुलांपैकी प्रत्येकाच्या हाती मोबाइल होते नि सर्व मुले आपापल्या मोबाइलमध्ये डोके खूपसून बसली होती. माणसांवर पुस्तकांनी गारूड करायचे दिवस संपलेत का?जपानचे एक वैशिष्ट्य मी ऐकले आहे. जपानमध्ये माणसे बस, ट्रेन, शॉपिंग मॉल कुठेही वाट पाहत असली की सहजगत्या आपल्याकडचे पुस्तक काढतात नि वाचण्यात रमून जातात. पुस्तकांचे महत्त्व या लोकांनी किती अचूक जाणले आहे.पुस्तके आपल्या आयुष्यात असणे ही माणूसपणाची खूण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -