अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्याच्या आदल्या दिवशीच रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. आता रुपाली पाटील शिवबंधनात अडकणार की मनगटावर घड्याळ बांधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरीही, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नाव ह्रदयात दैवत म्हणून कोरलेले कायम राहील, असे त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याची वेळ साधून पक्षाचा राजीनामा रुपाली पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. सह्याद्री अथितीगृहावर झालेल्या भेटीचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली. तर त्याआधी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीत जाणार असेही म्हटले जात आहे. राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. अद्याप तरी त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रुपाली पाटील या पेशाने वकील आहेत. मनसेच्या स्थापनेपासून गेली १४ वर्षे त्या राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही त्या राजकारणात सक्रीय असून विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या रुपाली पाटील यांच्या मनात तिकिट कापल्याची भावना होतीच. अनेकदा मुलाखतींमधून त्यांनी पक्षातील अंतर्गत वादावर अप्रत्यक्ष वक्तव्यं केलं होतं.

मनसेला जय महाराष्ट्र करण्याच्या चर्चा जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा रुपाली पाटील या आपण मनसेतच असल्याचे सांगत होत्या. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मनसेत फेरबदल!

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत. दिलीप बनकर, सुमीत खांबेकर आणि वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती केली आहे. या फेरबदलाने मनसेतील धुसफुस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सप्तपदी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पक्षसंघटन मजबूत करा, असा संदेश बैठकीत देण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते अभिजीत पानसे आणि दिलीप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी सतनामसिंग गुलाटी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येकी तीन मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.

औरंगाबाद पूर्व-पश्चिम-मध्य मतदारसंघासाठी सुमीत खांबेकर, गंगापूर-वैजापूर-पैठण मतदारसंघासाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री-सिल्लोड-कन्नड मतदारसंघासाठी वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व शहराध्यक्षपदी आशिष सुरडकर आणि पश्चिम शहराध्यक्षपदी गजन गौडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ‘मध्य’चे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. पक्षाचा आढावा घेऊन कार्यकारिणीत फेरपालट केले आहेत. आणखी काही निर्णय घेतले जातील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरुन तडकाफडकी हटविण्यात आले. पदभार घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत वर्णी लागली नाही. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या बदलावर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरेकर, तुम्ही मजूर आहात का?

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी मुंबई बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस (Notice) बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.

यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. दरम्यान आताही त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पण याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सहकारी बँकांमधील (Co-operative bank) कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेककडून प्रयत्न केले जातात. मात्र, राजकारण्यांकडून या नियमांना सोईस्कररित्या बगल दिली जाते. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचे तंतोतंत प्रत्यंतर येताना दिसत आहे.

जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांनी हा अर्ज मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केला आहे. त्यामुळे कोट्यवधींची संपत्ती असलेले प्रवीण दरेकर ‘मजूर’ कसे ठरु शकतात, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत आहे.

शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक डेव्हलप केली, वाजपेयी, अडवाणी व नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला : चंद्रकांत पाटील

पुणे : शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरे दर्शन

ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

 

श्रीकृष्ण परमात्म्यांनासुद्धा देह ठेवावा लागलाच ना? निराकार असले, तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की! रूप आले, गुण आले, सर्व काही आले आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले. तसेच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता, ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणे-जाणे नाहीच; ते कायमच आहेत. साकाराचे रूप पाहावेसे वाटते, पण तेच सर्व काही नव्हे, हे समजून चालले पाहिजे. भगवंताला पाहायचे असेल, तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असे श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले आणि त्याला ज्ञानाने समजावले. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर, त्यांनी त्याला “आता जाऊन गोपींचे समाधान कर” असे सांगितले. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की, तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले, हे योग्य झाले नाही, तुमची चूक झाली.अशा रीतीने, देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्यावर गोपींनी त्याला म्हटले की, “तू आपला वेदांत जिथे कुणी नाही तिथे जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळाले ते आमचे आम्हालाच ठाऊक. ते तुला मिळणे शक्य नाही.गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केले ते देहाला विसरून केले, त्याच्यापुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानले आणि त्यामुळेच श्रीकृष्णालाही गोपींवर तसेच प्रेम करणे भाग पडले. गोपी त्याला अनन्यशरण होऊन राहिल्या. तसे प्रेम करावे.

जो नाम घेतो, तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी, नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी ‘नामावतार’ आहे आणि तोच खरा तारक आहे. नामाकरिता नाम घ्या की, त्यात राम आहे, हे कळेल.

विश्वनाथाय नमो नम:, काशी विकासाचे मॉडेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जीर्णोद्धार केलेल्या श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण केले आणि देशभरात हिंदुत्वाचे एक वादळ उभे राहिले. देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असा विश्वनाथ धाम भव्यदिव्य प्रकल्प उभा राहिला आहे. काशी विश्वनाथ धाम ही वास्तू धार्मिक, ऐतिहासिक आणि महान परंपरा असलेली आहेच, पण त्याचे नूतनीकरण करून या वास्तूने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेकडो पुरातन व ऐतिहासिक मंदिरे आहेत.

स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या सरकारने आणि काँग्रेसने देशाला दिलेल्या पंतप्रधानांनी या ऐतिहासिक ठेव्यांकडे दुर्लक्ष केले. केवळ निवडणुकीतील मतांसाठी आणि व्होट बँक जपण्यासाठी काँग्रेसने मुस्लिमांचा अनुनय सतत चालू ठेवला. हा विशाल देश हिंदूंचा आहे, या वास्तवतेकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. देशातील कोटी कोटी हिंदूंच्या मनातील वेदना नरेंद्र मोदींनी आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने ओळखली आणि श्री काशी विश्वनाथ धामाचे भव्य लोकार्पण करून या जनतेला सुखद धक्का दिला.

काशीमध्ये जे काही घडते आहे, ते केवळ महादेवाच्या कृपेने. इथे फक्त डमरूवाल्यांचे सरकार आहे, असे सांगण्याची हिम्मत केवळ मोदीच दाखवू शकतात. काशी विश्वनाथ धामाचे नूतनीकरण हा मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेवती नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर त्यांनी त्याचे लोकार्पण केले. बाबा विश्वनाथांना वंदन करून भाषणाला सुरुवात केली. भाषणाची सुरुवात भोजपुरीत करून जनतेला आश्चर्याचा धक्का दिला. अगोदर कालभैरवाचे दर्शन घेतले आणि माता अन्नपूर्णाच्या चरणांना वारंवार वंदन केले. ही सर्व या देशातील जनतेची श्रद्धास्थाने आहेत. या पूर्वी कोणत्याही पंतप्रधानांना आणि उत्तर प्रदेशच्या बिगरभाजपच्या मुख्यमंत्र्याला जनतेच्या श्रद्धास्थानांसमोर नतमस्तक व्हावे, असे कधी वाटले नव्हते. त्यांचे धर्मनिरपेक्षतेचे पितळ मोदींनी उघडे पाडले. धर्मनिरपेक्षतेची भाषा करणारे कसे ढोंगी आहेत, हेच मोदींनी देशाला दाखवून दिले.

काशी विश्वनाथ धामचा विकास आणि विस्तार दोन्ही साध्य झाले आहे. काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधानांनी महापूजा केली. काशीची माती इतरांपेक्षा वेगळी आहे, हे आवर्जून सांगितले. पंतप्रधान स्वत: खिडकीया घाटापर्यंत पायी गेले. नंतर बोटीत बसून ललिता घाटावर पोहोचले. ललिता घाटावरून गंगाजल घेऊन काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. गंगाजलाने बाबांवर अभिषेक केला. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांचे गृहराज्यावर म्हणजेच गुजरातवर जेवढे प्रेम आहे, तेवढेच वाराणसीवर आहे. आपला मतदारसंघ स्वच्छ, सुंदर देखणा असावा. धार्मिक व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे. जनतेला सर्व सेवा-सुविधा उपलब्ध असाव्यात, विविध विकास प्रकल्प वेगाने राबवले जावेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. विश्वनाथ धामाच्या जीर्णोद्धारावर आठशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. पाच लाख सत्तवीस हजार चौरस फूट क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. मंदिराचा परिसर आता एवढा विस्तीर्ण झाला आहे की, एकाच वेळी पन्नास ते सत्तर हजार भाविक तेथे दर्शन घेऊ शकतील. या सर्व संकुलातील चाळीसपेक्षा जास्त पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गंगा व्ह्यू गॅलरी, मणिकर्णिका, जलासेन, ललिता घाट यांची प्रवेशद्वारे व रस्ते मोठे आणि भव्य करण्यात आले आहेत.

काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंमकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, बैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, कृष्णेश्वर ही कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. त्यांचा काळानुसार विकास झाला पाहिजे. काशी विश्वनाथ धामाच्या जीर्णोद्धारानंतर अन्य धार्मिक स्थळांच्या विकासाला वेग यावा, हीच अपेक्षा आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा इसवी सनपूर्व ११व्या शतकात राजा हरिश्चंद्रने जीर्णोद्धार केला होता. नंतर सम्राट विक्रमादित्यानेही केला. मोहम्मद घोरीने ११९४ मध्ये या मंदिराची लूट केली. मंदिराची तोडफोड केली. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पंडित नारायण भट्ट यांनी मंदिर पुन्हा उभारले. १६३२मध्ये शहाजहाँने मंदिर तोडायला सैन्य पाठवले होते. आजूबाजूची त्यांनी ६३ मंदिरे तोडली. पण हिंदूंच्या प्रचंड विरोधामुळे सैन्याला मंदिरापर्यंत पोहोचता आले नव्हते. १७७७-१७८०च्या काळात महाराणी अहिल्याबाईंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ग्वाल्हेरच्या बैजाबाई व नेपाळचे महाराजा यांनीही मंदिराच्या विकासात योगदान दिले होते.

८ मार्च २०१९ रोजी काशी विश्वनाथ धामाच्या कॅरिडॉरचे पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केले होते. दोन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण झाला. गंगा नदीच्या पवित्र काठावर भारतीय संस्कृती वसली आहे, याचा उल्लेख मोदींनी भाषणातून केला. रोज दोन हजारांपेक्षा जास्त मजूर व कामगार या प्रकल्पासाठी अहोरात्र झटले, त्याची जाणीव ठेऊन मोदींनी त्यांच्या अंगावर फुले उधळली. मोदी आपले संसदेतील लोकप्रतिनिधी आहेत, ते निश्चितच चांगले काम करतील, असा विश्वास वाराणसीतील मतदारांनी त्यांच्यावर ठेवला होता. तो मोदींनी सार्थ करून दाखवला. दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांगांना आणि वयस्कर भाविकांना आता बोटीतून जेटीपर्यंत येता येईल, जेटीतून घाटावर येण्यासाठी एस्केलेटरची सुविधा आहे. तिथून त्यांना थेट मंदिरात जाता येईल. या सोहळ्याला भाजपशासित बारा राज्यांचे बारा मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. न भूतो न भविष्यती असा हा लोकार्पण सोहळा झाला. विश्वनाथाय नमो नम:

‘ड्रॅगन’ला आव्हान देणारा जनरल

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

भारतीय संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणून ज्यांना सन्मान मिळाला त्या जनरल बिपीन रावत यांनी दिलेला शब्द जीवनाच्या अखेरपर्यंत कधी मोडला नाही आणि जोडलेले नाते कधी तोडले नाही. मग ते देशाशी असो, की सैन्य दलाशी किंवा त्यांच्या पत्नीशी…
दि. १४ एप्रिल १९८६, सोमवार. अशोका रोड, नवी दिल्ली. कॅप्टन बिपीन रावत हे बारातींसह मधुलिका यांच्या अशोका रोडवरील घरी पोहोचले. बँड वादन आणि मित्रमंडळींनी चालवलेल्या जल्लोशात बिपीन यांनी घरात प्रवेश केला. बरोबर रात्री बारा वाजता पंडितजींनी म्हटले, ‘अब वधू-वर की गाँठ बांध दिजिए…’ वधूच्या बहिणींनी बिपीन यांच्या अंगावरील शालीची मधुलिका यांच्या साडीच्या पदराशी गाठ बांधली. अग्नीच्या साक्षीने सात फेरे झाले. पंडितजी म्हणाले, ‘अब दोनों सात जन्मों के साथी हो गए है…’

दि. १० डिसेंबर २०२१, शुक्रवार. दिल्ली आर्मी कँटोन्मेंट. छत्तीस वर्षांनी पुन्हा दिल्लीत. यावेळी मिलिटरी बँड होता. शोक धून वाजवली जात होती. बिपीन व मधुलिका यांच्या मोटारी फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. लष्कराच्या वतीने त्यांना सतरा तोफांची सलामी देण्यात आली. पुन्हा मंडप होताच आणि साक्षीला अग्नीही. पण यावेळी पंडितजींनी म्हटले, तारिणी व कृतिका दोघींनी आपल्या मातापित्याला मुखाग्नी देण्यासाठी यावे…

लग्नाच्या दिवशी दोघांनी शपथ घेतली सात जन्म एकत्र राहण्याची. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते दोघे एकत्र राहिले. अन्त्यसंस्कारासाठी दोघांसाठी दोन वेगळ्या चिता सजवलेल्या नव्हत्या. एकाच चितेवर दोघांचे अन्त्यसंस्कार झाले. संरक्षण दलाच्या सेवेत असतानाच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि पती-पत्नी दोघेही बरोबर असतानाच एकाच वेळी जग सोडून गेले.

जनरल रावत हे यापूर्वी मृत्यूच्या दारातून दोन वेळा परत आलेत. अठ्ठावीस वर्षांपूर्वी त्यांना पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात गोळी लागली होती आणि सहा वर्षांपूर्वी ते एका हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले होते. १९९३ मध्ये बिपीन रावत हे ५-११ गोरखा रायफल्समध्ये मेजर पदावर काम करीत होते. १७ मेची घटना आहे. काश्मीरमधील उरी परिसरात ते अन्य जवानांसमवेत गस्त घालत होते. नेमके त्याच वेळी पाकिस्तानी सैन्याकडून त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. गोळीबाराच्या रेंजमध्ये रावत नेमके सापडले. एक गोळी नेमकी गुडघ्यावर लागली आणि ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना श्रीनगर इस्पितळात नेण्यात आले. पण या गोळीबारात जखमी झालेल्या रावत यांना आपले पुढे काय होईल, या विचाराने ग्रासले होते. सीनिअर कमांड फोर्समध्ये आपल्याला कायम ठेवतील की नाही, या प्रश्नाने त्यांच्या मनात कल्लोळ निर्माण केला होता. उपचारानंतर कुबड्या घेऊन ते चालत होते. महिन्याभरात ते बरेही झाले. बिपीन रावत यांनी दाखवलेले धाडस पाहून त्यांना सन्मानपदक देण्यात आले.

सन २०१५ मध्ये ते लेफ्टनंट जनरल होते. त्यांच्यावर नागालँड दिमापूर येथील ३ कॉर्प्स मुख्यालयाची जबाबदारी होती. दि. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते स्वतः एक कर्नल व दोन वैमानिकांना बरोबर घेऊन हेलिकाॅप्टरने निघाले. हेलिकाॅप्टरने जमिनीवरून आकाशात झेप घेतली आणि वीस फूट उंचीवर असतानाच इंजिनमध्ये बिघाड झाला. काही सेकंदातच हेलिकाॅप्टर जमिनीवर कोसळले. सर्व जण जखमी झाले. बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा मृत्यूवर मात केली. नियमित उड्डाण करणाऱ्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले.

दि. ९ डिसेंबर २०२१, हेलिकाॅप्टर दुर्घटनेत रावत व त्यांच्या पत्नीला मृत्यूने गाठलेच. सुलूर येथून वेलिंग्टनकडे जात असताना हेलिकाॅप्टरने अचानक पेट घेतला व कोसळले. त्यांच्यासमवेत अन्य बारा जणांचाही मृत्यू झाला. ते वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ काॅलेजमध्ये भाषण देण्यासाठी निघाले होते. जिथे हेलिकाॅप्टर उतरणार होते, तेथून अवघ्या सोळा किमी अंतरावर ते कोसळले.

कशाची व कोणाचीही पर्वा न करता चीनला थेट आव्हान देणारा आणि पाकिस्तानला दुष्ट राष्ट्र म्हणून संबोधणारा हा योद्धा होता. त्यांच्या धाडसापुढे ड्रॅगनही बिथरला होता. आम्हाला उत्तेजित करू नका, आमच्या वाट्याला जाऊ नका, अशी चीनने प्रतिक्रिया दिली होती. दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी जनरल बिपीन रावत यांनी भारताच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका चीनकडून आहे, असे म्हटले होते. गेल्या वर्षापासून भारत-चीन सरहद्दीवर लाखो भारतीय सैनिक आणि शस्त्रसाठा तैनात करण्यात आला आहे. तो कधी माघारी बोलवणार, हे कोणीच सांगू शकत नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रावत यांच्या वक्तव्यानंतर दोन देशांत ताणतणाव वाढेल, असे म्हटले होते. बिपीन रावत हे चीन व पाकिस्तानवर उघडपणे भाष्य करायचे, त्याबद्दल दोन्ही देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दि. १५ एप्रिल २०२१ रोजी रावत रायसिना संवादात म्हणाले, माय वे ऑर नो वे… अशी चीनची भूमिका असते. पण भारत त्याविरोधात मजबुतीने उभा आहे. कोणताही दबाव आम्ही मान्य करणार नाही किंवा आम्हाला मागे हटवता येणार नाही.
दि. ८ एप्रिल २०२१ रोजी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात जनरल रावत म्हणाले, चीन भारतावर सायबर हल्ले करणार असेल, तर भारतानेही आपली डिफेन्स सायबर सिस्टिम मजबूत करण्याच्या कामात लक्ष केंद्रित केले आहे.
जानेवारी २०१८ मध्ये लष्करप्रमुख असताना रावत यांनी म्हटले होते, चीन शक्तिमान असेल, तर भारतही कमजोर नाही. भारत आपल्या सीमेवर चीनला आक्रमण करू देणार नाही. आता १९६२ प्रमाणे परिस्थिती नाही. प्रत्येक क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये लष्करप्रमुख असताना रावत यांनी म्हटले होते, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी भारताने सज्ज असले पाहिजे.

बिपीन रावत यांच्या जाण्याने भारतीय सैन्य दलात आत्मविश्वास निर्माण करणारा, सैन्य दलाच्या आधुनिकीकरणाला गती देणारा, पाकिस्तानला कापरे भरवणारा आणि ड्रॅगनला आवाज देणारा धाडसी योद्धा भारताने गमावला.
sukritforyou@gmail.com

थांबू नका, हार मानू नका

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

अनेकदा सासर खूप चांगलं मिळालं म्हणून, घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं म्हणून, अथवा प्रेमविवाह केला म्हणून महिलांचं शिक्षण अर्थवट अपूर्ण राहते. एकदा संसारात गुंतल्यावर मग त्याबद्दल काही वाटेनासे होते. महिला स्वतःला घर एके घर या पिंजऱ्यात बंद करून घेते. एकदा मुलं मोठी झाली, संसारातील नवीन नवलाई संपली की, आपण कोण आहोत, आपली ओळख काय, बाहेरील जगात काय सुरू आहे, आपल्याला समाजात कोण कोण ओळखतं, काय म्हणून ओळखतं, हे प्रश्न मनाला सतावू लागतात.

घरातल्याशी मला काहीतरी करावंसं वाटतंय! या विषयावर बोलायला गेलं, तर अनेकदा असे पाहिले आहे की, तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जास्तीत जास्त उत्तर मिळतं की, काही कमी पडतंय का तुला? सगळं तर आहे तुझ्या मनासारखं, या वयात काय करणार आहेस आता? कोण तुला उभं करेल बाहेरच्या जगात? घराकडे दुर्लक्ष व्हायला नकोय, मुलांना पूर्ण वेळ तुला देणं आवश्यक आहे. हे वाढीचे नाजूक वय असतं मुलांचं, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं कोण पाहणार? आला गेला, पै-पाहुणा कोण बघणार? सणवार व्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे. आजवर तर सगळं तूच केलंस, तुला ते सगळं व्यवस्थित जमतं या कामासाठी, तुझी घरात जास्त गरज आहे, त्यामुळे नको ते खूळ डोक्यातून काढून टाक, असा सल्ला दिला जातो.

मुळात लग्नाच्या आधीच काही गोष्टी विशेषतः करिअर बाबतीतले आपले विचार आणि निर्णय ठामपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लग्नानंतर मुलींना नोकरी सोडायला सांगितले जाते. भविष्यात नोकरी करण्याबाबत विचारल्यास लग्नानंतर बघू, करू, मुलं मोठी झाल्यावर करू, असं म्हणता-म्हणता स्त्री आयुष्यभर या रहाटगाडग्यातून बाहेर पडू शकत नाही.

कालांतराने स्वतःच शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय इतकंच नाही, तर महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत, राहणीमान, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी याबद्दल देखील अतिशय निरुत्साही झालेल्या दिसतात. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून घेणे, आता आपण कधी काहीच करू शकणार नाही, अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यातून स्वतःला कोसत राहणे, कुढत राहणे अथवा इतरांना, परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहणे, अशा गोष्टी महिलांमध्ये उदयाला येतात.

खरंतर, आपण रोज नव्याने आयुष्य सुरू करू शकतो, कोणत्याही क्षणी नवीन कार्याची, कामाची, दिनचर्येची सुरुवात करू शकतो, फक्त त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक आहे. समुपदेशनमार्फत आपण अनेक महिलांना अशा प्रकारे संसार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या सांभाळून देखील स्वतःला आत्मिक समाधान, आनंद मिळण्यासाठी आवडीचे उपक्रम, उद्योग, छोटे व्यवसाय, सामाजिक कार्य, छंद, समाजात मानसन्मानाचे स्थान, स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याचे विविध उपाय यावर चर्चा करून त्यांना कोणत्याही वयात स्त्री भरारी घेऊ शकते, याबद्दल मार्गदर्शन करीत असतो.

घरच्यांना विश्वासात घेऊन, त्यांचं सहकार्य मिळवून, कोणतेही नातेसंबंध न दुखावता, न दुरावता देखील आपण आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी, आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी, आपल्यातील आत्मसन्मान, स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्याने कशा प्रकारे अॅक्टिव्ह राहावे, स्वतःला आनंदी, फ्रेश आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व कसे बनवावे यावर चर्चा करीत असतो. आयुष्य कोणत्याही वळणावर बदलू शकते, तुम्ही ध्यास घेतला, दृढ निश्चय केला, तर अशक्य काहीच नसते, हे महिलांना पटवून देणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच स्वतःला अनेक कुचकामी कारण आणि सबबी देऊन अडकवून घेतलेले लक्षात येते. त्याच-त्याच रुटीनमधून, रोजच्या त्याच बहाण्यांमधून बाहेर पडणे ठरवलं, तर अतिशय सोपं आहे, फक्त कोणीतरी योग्य दिशा दाखवणे आवश्यक असते. इतर महिलांनी देखील अशा प्रकारे काहीतरी करू पाहणाऱ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महिलांना आपल्यात सामावून घेणे, त्यांना आत्मविश्वास देणे, त्यांना संधी देणे आवश्यक आहे.

प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख होणे, आपली क्षमता जाणून घेणे, स्वतःला बाहेरील जगाशी संपर्कात राहण्याचा मूलभूत अधिकार नक्कीच आहे. त्यामुळे घरातल्या लोकांनी देखील तिला फक्त कामवाली म्हणून गृहीत न धरता, तिचा विविध अंगांनी विकास कसा होईल, तिचं मनोधैर्य आबाधित कसे राहील, तिला तिच्या आयुष्यात समाधान कशात मिळेल, यावर विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
‘स्त्री शिकली, प्रगती झाली’ इतकंच म्हणून उपयोग नाही, तर स्त्रीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ देखील घेता आला पाहिजे. युवतींना, महिलांना फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडं फार शिक्षण देणे इतकंच अपेक्षित नसून त्यासोबतच त्यांना स्वतःसाठी जगण्याचे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, थांबू नये, हार मानू नये, यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत राहणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
meenonline@gmail.com

ऋतुराजचा तुफान फॉर्म कायम

सौराष्ट्र (वृत्तसंस्था): महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे काही खरे नाही. ड गटात पाचव्या सामन्यात मंगळवारी चंदिगडविरुद्ध त्याने १६८ धावांची चमकदार खेळी करत संघाला पाच विकेटनी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाच सामन्यांत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. चार शतकांमध्ये ५१ चौकार अन् १९ षटकारांचा समावेश आहे.

चंदिगडविरुद्ध ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व वाय नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या. पण, नाहर ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राची गाडी घसरली. राहुल त्रिपाठी ( ०), अंकित बावणे ( १२), नौशाद शेख ( ०) हे झटपट माघारी परतले. ऋतुराजने १३२ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १६८ धावांची खेळी केली. ए काझीनं नाबाद ७३ धावा करताना महाराष्ट्राला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना मनन वोहराच्या १४१ धावा आणि अर्सलन खान ( ८७) व कौशिकच्या ( ५६) अर्धशतकांच्या जोरावर चंदिगडगने ७ बाद ३०९ धावा केल्या.पी. दाधेने ४९ धावांत ४ विकेट घेतल्या. विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२मध्ये १६८ धावांची खेळी ही ऋतुराजची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने या स्पर्धेत १५०.७५च्या सरासरीने धावा कुटल्या. त्यानं एकूण ५१ चौकार व १९ षटकारही लगावले.

ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश ( १३६ धावा), छत्तीसगड (नाबाद १५४), केरळा ( १२४) व चंदिगड (नाबाद १६८) अशी चार शतकं ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीत झळकावली आहेत. विराट कोहली (२००८-०९), पृथ्वी शॉ (२०२०-२१) व देवदत्त पडिक्कलनंतर ( २०२०-२१) एका पर्वात चार शतकं करणारा तो चौथा फलंदाज बनला.

कोविड काळात मुंबई पालिकेकडून घोटाळा

मुंबई (प्रतिनिधी): कोविड काळात मुंबई महापालिकेकडून कोविड घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळातील अधिकाराचा वापर करून शिवसेना नेते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये कोविडचे कंत्राट मिळवण्याची स्पर्धा सुरू होती असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी कोविड काळातील १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या आणि वडीलांच्या तसेच मित्रांच्या कंपन्यांमध्ये मिळवले आहे. मनीष वाळुंज हे कुर्ला एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त होते; सध्या ते भायखळा येथील सहाय्यक आयुक्त आहेत. तर मनीष यांचे वडील राधाकृष्ण वाळुंज यांनी २१ ऑगस्ट २०२० रोजी जेनेहेल्थ डायग्नोस्टिक प्रा. लि. कंपनीची स्थापना केली होती. मात्र या कंपनीला अवघ्या काही दिवसांत ३० कोटींहून अधिक रक्कमेचे टेंडर दिले. यात आरटीपीसीआर, कोविड टेस्टिंग हे काम नवीन सुरू झालेल्या कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

तर १८ जून २०२१ रोजी जेनेसी डायग्नोस्टिक या कंपनीची स्थापना केली. या कंपनीला देखील मोठमोठे कोविडचे टेंडर देण्यात आले. यात आरटीपीसीआर टेस्ट, अॅन्टीजेन टेस्ट, स्वॅब टेस्ट अशा अनेक ऑर्डर या कंपनीला मिळायला लागल्या. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या नवीन असून या व्यवसायाचा त्यांना अनुभव नाही किंवा ते वैद्यकीय तज्ज्ञ देखील नाही. अशाच पद्धतीने कोविड काळातील अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट पालिका अधिकारी व सत्ताधारी राजकीय नेत्यांचे नातेवाइक मित्रपरिवार यांना मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान अशा प्रकारच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली असून मनीष वाळुंज यांच्या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही सोमय्या यांनी केली आहे.