Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमीहिंदू, मुसलमान आणि मोदी!

हिंदू, मुसलमान आणि मोदी!

  • अरविंद कुळकर्णी ज्येष्ठ पत्रकार

मनुजमंगलाचे तत्त्वज्ञान भारताच्या वतीने परिपूर्ण अवस्थेत साकार झालेले जगाला पाहावयास मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना शंभराहून अधिक वर्षे आयुष्य लाभावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीयांना त्यांची अनिरुद्ध ऊर्जा अभूतपूर्व आणि आनंदमय स्वरूपात व्यक्त करण्याची संधी मिळावी, अशी श्री गणेशाच्या चरणी मोदींच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करतो.

आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान म्हणून आपल्या नरेंद्र मोदींसारखे चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व लाभले, हा योगायोग लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रदीर्घ पारतंत्र्यामुळे अवरुद्ध राहिलेली राष्ट्रीय ऊर्जा मोकळी होऊन राष्ट्रनिर्माणाच्या रचनात्मक कामात प्रत्येक भारतीय गुंतून पडेल आणि त्याचे व्यक्तीश: आणि समूहश: उन्नयन होऊन भारताचे अव्यक्त परब्रह्म सुंदर रूपात प्रगट होईल, अशी अपेक्षा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा करण्यात चूक नव्हते. पारतंत्र्यात हाडीमासी खिळलेले नकारात्मक प्रवृत्तींचे विकार निर्धारपूर्वक उपटून फेकायचे असतात. ते काम आपल्याकडे दुर्दैवाने झाले नाही. आपल्याला पंतप्रधानपदावर आरूढ होण्यासाठी लाभले ते नेता होते; राष्ट्रनिर्माता नव्हते. नरेंद्र मोदी अन्य पंतप्रधानांपासून वेगळे वाटतात. कारण, त्यांनी राजधानीतील राजकीय मंचावर पाऊल टाकले ते राष्ट्रनिर्मात्याच्या भूमिकेत. तेव्हापासून ते सतत घाईत असतात. क्षणाचीही उसंत घेत नाहीत. कारण त्यांना सहासात दशकांचा अनुशेष भरून काढायचा आहे आणि दमदार पावले टाकीत पुढच्या पंचवीस वर्षांत लक्ष्य गाठायचे आहे. हे लक्ष्य जागतिक महासत्ता बनण्याचे आणि वैचारिक क्षेत्रात अनुकरणीय बनण्याचे असावे.

संसारातील पटकन समजणारी उपमा देऊन मोदींचे वेगळेपण सांगता येईल. घराबाहेर एखादे प्रकरण असलेला माणूस घरी येतो, तेव्हा तो त्याचे सर्वस्व शतप्रतिशत बरोबर घेऊन आला आहे, असे घरच्यांना वाटत नाही. त्यांच्याविषयीचा विश्वास तेवढ्या प्रमाणात कमी होतो. पण मोदींसारखा माणूस घरी येतो, तेव्हा बाबा बाहेर होते तेव्हा आपलाच विचार करीत होते आणि घरी आलेत, तर आता ते आपल्याला सोडून कोठेही जाणार नाहीत, असा विश्वास घरच्यांना वाटत असतो. ह्या उपमेचा संबंध हिंदू-मुसलमान ह्यांच्याविषयीच्या निष्ठेशी आहे. भारतात राज्यकर्ते, हिंदू आणि मुसलमान ह्यांचे परस्परांशी संबंध अत्यंत चमत्कारिक आणि तर्कविहिन अवस्थेत नांदत आले आहेत. आपण हिंदुहिताचा विचार केला, तर ते मुसलमानांवर अन्याय केल्यासारखे होईल, अशी अपराधीपणाची भावना आधीच्या पंतप्रधानांना सतावत होती. म्हणून ते सराईतपणे हिंदुहिताकडे दुर्लक्ष करीत असत. मुसलमानांच्या मागण्या मुकाट्याने मान्य करणे म्हणजे मुसलमानांचे पर्यायाने राष्ट्राचे हित जपणे, अशी त्यांची धारणा झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात आणि स्वातंत्र्योत्तर भारतात ते ह्या धारणेशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी फाळणीची आणि पाकिस्तान निर्मितीची किंमत मोजली. पण “आधी मुसलमानांचे हित” ह्या आपल्या अग्रक्रमात बदल केला नाही. मोदींनी लोकांचा कौल मिळवून ज्यांच्याकडून भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्याकडे घेतली ते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ह्यांनी, “भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे”, असे उद्गार प्रगटपणे काढले आहेत आणि नंतरच्या काळात त्यांनी किंवा काँग्रेसच्या वतीने अन्य कोण्या नेत्याने त्याहून वेगळे मत मांडलेले नाही. प्रचलित आणि सोप्या भाषेत सांगायचे, तर काँग्रेसचे तत्त्वज्ञान आणि धोरण १९२० पासून आजपर्यंत मुसलमानधार्जिणे आणि हिंदुहितविरोधी राहिले आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय स्वार्थावर कसाही आणि कितीही आघात झाला तरी त्याची चिंता काँग्रेसने केलेली नाही.

मोदींना महात्मा व्हायचे नाही. त्यांना राष्ट्रपिता किंवा जागतिक शांतीचे दूत म्हणून मिरवायचे नाही. ते भक्त पुंडलिकाच्या निष्ठेने भारतमातेची सेवा करू पाहणारे धडपड्या वृत्तीचे राजकीय कार्यकर्ते आहेत. ते सकारात्मक विचार करतात आणि दुसऱ्याच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलतात. बहुसंख्यांकांना सतत न्यूनगंडात्मक अवस्थेत ठेवून आणि अल्पसंख्यांकांचे फाजील लाड करून कोणतेही राष्ट्र आपली स्वतंत्रता, सार्वभौमता, एकात्मता आणि अखंडता टिकवू शकलेले नाही. इतपत राज्यशास्राचे अध्ययन मोदींचे झाले आहे. इतिहासाच्या प्रारंभापासून हिंदू प्रशासन धर्मनिरपेक्ष आणि अनाक्रमक राहिले आहे, ह्याची त्यांना अभ्यासपूर्ण जाणीव आहे. गेली आठ वर्षे पंतप्रधान म्हणून मोदी समर्थपणे राज्यशकट हाकीत आहेत. त्यांचा मार्ग सुनिश्चित आहे. हिंदुंमधील नकारात्मकता त्यांना उपटून टाकायची आहे. त्यांना सकारात्मक करायचे आहे. हिंदुहित डोळ्यांसमोर ठेवून ह्या देशावर राज्य करण्याचा विश्वास त्यांना हिंदूंमध्ये निर्माण करायचा आहे.

मुसलमानांच्या मागण्या भारतहितविरोधी असल्या तरी त्या मुसलमानांच्या आहेत म्हणून मान्य केल्या पाहिजेत, ही काँग्रेस संस्कृतीने निर्माण केलेली घाबरट वृत्ती त्यांना समूळ नष्ट करायची आहे. म्हणून मोदींनी संविधानाचा अनुच्छेद ३७० रद्द केला आणि भारताचा तुटत चाललेला स्वर्गीय निसर्गसौंदर्याचा प्रदेश पुन्हा आत खेचून घेण्याची शस्रप्रक्रिया वेगाने सुरू केली. नेहरूंनी भारतीय सैन्याला काश्मीर पाकिस्तानपासून पूर्ण मुक्त करू दिला नाही. काश्मीरचा एक भाग त्यांनी पाकिस्तानला दिला आणि दुसरा भाग इस्लामी आतंकवाद्यांच्या आणि फुटीरवाद्यांच्या हातात असा सोपविला की, आपण भारताशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, अशी भावना तेथील लोकांच्या मनात कधी निर्माणच होणार नाही. कारसेवकांनी पाडलेल्या बाबरी मशिदीच्या ठिकाणी पुन्हा भव्य राम मंदिर बांधण्याचे काम राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा प्रकल्प म्हणून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मोदींनी मार्गाला लावले. प्रभू रामचंद्र हा भारताचा सर्वोत्तम आदर्श राष्ट्रीय पुरुष आहे, असे जणू त्यांनी हिमालयाच्या शिखरावर उभे राहून जगाला गर्जून सांगितले आणि त्यातून जो आत्मविश्वास प्राप्त झाला, त्या बळावर त्यांनी काश्मीर प्रश्नाला हात घातला. आता तिसरा कार्यक्रम म्हणून ते पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता २०२४ पूर्वी किंवा आसपास करतील, असे मानता येऊ शकते. हिंदूंची मानसिकता आतून-बाहेरून पूर्णपणे बदलू शकणारे हे तीन मोठे निर्णय असू शकतात.

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात, १८८५ वर्षी, हिंदूंचे राजकीय धर्मांत करण्यात आले आणि ते हिंदी झाले. हिंदुहित विसरले. हिंदी झालेल्यांना पुन्हा हिंदू करायचे आहे असे मोदींनी ठरविले आहे, असे वाटते. म्हणजे ते राष्ट्रीय हित विसरणार नाहीत. मुसलमानांचे मोदी काय करणार आहेत? मुसलमानांना मोदी भारतीय करणार आहेत. काँग्रेस संस्कृती मुसलमानांना केवळ मतदार मानते. काँग्रेस संस्कृती इस्लामी आतंकवादाला टरकून आहे. म्हणून ती आपणच मुसलमानांचे खरेखुरे रक्षणकर्ते आहोत, असे सांगत असली तरी मुसलमानांच्या फार जवळ जात नाही. मोदी मुसलमानांना सहोदर मानतात. काँग्रेस संस्कृती मुसलमानांना राष्ट्रिक, भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक मानते. मोदी त्यांना केवळ धार्मिक अल्पसंख्यांक मानतात. राष्ट्रिक आणि भाषिकदृष्ट्या ते बहुसंख्यांकांचाच भाग आहेत, असे मोदी मानतात. धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून मोदींच्या राज्यात मुसलमानांना विपुल स्वातंत्र्य आहे. मोदींची खरी ओळख मुसलमानांना होऊ लागली आहे आणि तेवढे हिंदू-मुसलमानांतील अंतर कमी होऊ लागले आहे. अर्थातच संयमाचा कस बघणारी ही प्रक्रिया आहे.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेथे दंगली झाल्या, तेव्हा “मला दंगली नको आहेत आणि त्या मोडून काढण्यासाठी मी कितीही कठोर होऊ शकतो”, असा संदेश त्यांनी गुंडांच्या साम्राज्यात पसरविला आणि दंगली थांबल्या. काँग्रेसच्या काळात राज्यकर्त्यांना असा निर्धार दाखविता येत नसे. लोकांना मोदी आवडतात, कारण मोदींना जीवनाचा उद्देश सापडला आहे, असे त्यांना वाटते. प्रत्येक भारतीयाला त्यांना विजिगीषू बनवायचे आहे. त्याच्यातील लपलेली सृजनात्मकता त्यांना फुलवायची आहे. ह्या कामात सतत मग्न असणे हीच त्यांना विश्रांती वाटते. ते सतत टवटवीत आणि अद्यावत असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या प्रकल्पाशी जोडलेले असतात. ते योद्धा संन्यासी आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य आंदोलनात काहीही सहभाग नाही, असा आरोप करीत राष्ट्रभक्तांची संघटना म्हणवून घेण्याचा संघाला अधिकार नाही, असा प्रचार संघाच्या स्थापनेपासून अव्याहतपणे काँग्रेस करीत आली आहे. वास्तविक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढवले गेलेले स्वातंत्र्य आंदोलन हा सखोल संशोधनाचा विषय आहे. इस्लाम आणि युद्धशास्त्र ह्या दोन्ही विषयांचा काँग्रेस नेतृत्वाचा अभ्यास कच्चा राहिला. परिणामी इस्लामी आतंकवादाचे प्रमुख केंद्र बनू शकेल, असे पाकिस्तान नावाचे शत्रुराष्ट्र भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे फलित म्हणून काँग्रेस संस्कृतीने निर्माण केले. काँग्रेस मुसलमानांच्या स्वातंत्र्यासाठी लढली नि हिंदूंना तिने वाऱ्यावर सोडले, असे म्हटले तर काँग्रेसला राग येता कामा नये. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी भारतीय भावविश्वाच्या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो? ते मुसलमानांना समजावून सांगत आहेत. वादळात धुळीच्या कणांप्रमाणे उधळल्या गेलेल्या हिंदूंना धीर देऊन ते स्थिर करीत आहेत. त्यांना भविष्याची रम्य स्वप्ने दाखवीत आहेत आणि ती पूर्ण करण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात संक्रमित करीत आहेत. हेच संघाचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान आहे. गांधी-नेहरूंच्या हिमालयाएवढ्या चुका संघाचा एक प्रचारक दुरुस्त करीत आहे. हे संघटन शास्रातील दैनंदिन शाखा पद्धतीचे सामर्थ्य आहे. काँग्रेसने सावरकर, गोळवलकर, हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ ह्यांना स्वातंत्र्य आंदोलनातील खलनायक ठरविण्याचा खटाटोप केला. आज जनता ती चूक दुरुस्त करीत आहे व काँग्रेसला बाजूला सारून भाजपच्या हाती आपले भवितव्य विश्वासाने सोपवित आहे.

arvindvk40@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -