Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीसंस्कृती, सुरक्षा आणि स्वाभिमान रक्षक नरेंद्रभाई मोदी

संस्कृती, सुरक्षा आणि स्वाभिमान रक्षक नरेंद्रभाई मोदी

  • सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री

भाजगी वाढविला, भारताचा मान,
आदराचे स्थान, मिळविले!!
सगळ्यांचा विश्वास,
सगळ्यांचा विकास,
प्रगतीचा ध्यास! क्षणोक्षणी…
सांगितले जगा, राष्ट्रहित आधी,
जग मोदी मोदी! म्हणताहे!!

रताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे कणखरता आणि कर्तव्यपरायणता, नवनवीन कल्पनांची पेरणी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची उभारणी, भारताची संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधणारा युगपुरुष, सामान्य माणसांची संवेदना जाणणारा आणि भारताची विविधता जवळून समजून १३० कोटी भारतीयांचा विश्वास संपादन करणारा, जागतिक राजकारणावर स्वतःच्या परराष्ट्र नीतीचा ठसा उमटवून भारताचा सन्मान वैश्विक पटलावर प्रतिष्ठित करणारा आणि “इदम न मम” म्हणत आपली संपूर्ण ऊर्जा राष्ट्राला समर्पित करणारा निष्काम कर्मयोगीच म्हणावे लागेल.

नरेंद्रभाई मोदी यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ‘स्व’च्या शोधाची एक अद्भुत संघर्षगाथाच होय. लहानपणी वडिलांना मदतीचा हात देत रेल्वेस्थानकावर चहा विकणे, तिथे येणाऱ्या मंडळींकडून हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, आपल्या आयुष्याच्या प्रयोजनाच्या शोधात घराबाहेर पडणे, ईश्वराच्या शोधात भारत पालथा घालणे, अखेरीस संघकार्याच्या आणि देशकार्याच्या माध्यमातून आयुष्याचे इप्सित गवसणे हे सारं सारं रोमांचक आणि अद्भुत आहे. त्यांचा हा प्रवास एकाच वेळेस ‘स्व’चा शोध होता, त्याचसोबत तो भारतातील विविधतेचा शोध होता. सामान्य माणसाच्या जगण्याचा शोध होता. आज मोदी जेव्हा सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करीत त्यांचे पाय धुतात तेव्हा सामान्य माणसांच्या जगण्याचा त्यांनी घेतलेला शोध आणि सामान्य माणसांशी त्यांच्या असलेल्या नात्याचा परिचय होतो.

‘ग्रेट’ माणसं अत्यंत सजग असतात, वरकरणी छोट्या, सहज वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा जाणीवपूर्वक करणे त्यांना जमतं; यासाठी ते संधीची वाट बघत नाहीत किंवा मिळालेल्या संधीचं सोनं केल्याशिवय राहात नाहीत. मिळालेलं दायित्व गांभीर्यानं स्वीकारून त्या जबाबदारीचं भान ठेवत धाडस, सामर्थ्य, चिकाटी आणि बुद्धिमत्ता पणाला लावून अखंड निष्ठेने काम करणारी माणसं जगात नावलौकिक प्राप्त करतात; त्यातीलच एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी होय. कविश्रेष्ठ स्व. सुरेश भट यांच्या “गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे…” या ओळी वर्तमानस्थिती बघता नरेंद्रजी मोदी यांच्याकरताच लिहून ठेवल्या की काय असे आता वाटू लागले आहे.

“राष्ट्र सर्वोपरि” या विचारधारेचा पाईक म्हणून काम करताना सन २०१४ मध्ये देशातील कोट्यवधी जनतेने दिलेला कौल शिरसावंद्य मानून भारताची संस्कृती, सुरक्षा आणि स्वाभिमान यांच्या रक्षणासाठी एकाहून एक सरस निर्णय घेण्याचा सपाटाच लावला. हे धाडसी निर्णय घेत असताना लांगूलचालन, राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार, राजकारणातील गुन्हेगारीकरण आणि राष्ट्रद्रोही प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

रोखण्यात वाट माझी, वादळे होती आतर
डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही

असे म्हणत विकासाच्या आणि राष्ट्र पुनर्निर्माण कार्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर मात करीत संवेदनशील भारतीय मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नरेंद्रजी मोदी यांनी आतापर्यन्तच्या राज्यकर्त्यांना अत्यंत जटिल वाटणारा किंवा मुद्दाम दुर्लक्षित ठेवण्यात आलेला कलम ३७० चा तिढा सोडवून भारतमातेच्या वेदनेवर फुंकर घालत, “तेरा वैभव अमर रहें माँ”चा नारा बुलंद केला. जम्मू-काश्मीर हे हिंदुस्थानचं वैभव आहे, ती आमची अस्मिता आहे; त्याकडे कुणाचीही वक्रदृष्टी पडल्यास परिणामासाठी तयार राहा असा इशारा दिला आणि सर्जिकल स्ट्राईक करून सिद्धही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातीलच नव्हे जगभरातील भारतीयांमध्ये त्यांचे विचार, कार्य आणि यशस्वी कामगिरीसाठी लोकप्रिय आहेत. सर्वसमावेशक विकास म्हणजे देशाच्या संरक्षणाची अशा प्रकारे सुनिश्चिती करणे जेणेकरून आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणीही पाहू शकत नाही, याची देशातील लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला पूर्ण खात्री वाटणे होय, हाच संदेश मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत दिला. आपल्या राज्यघटनेने देशातील गरिबात गरीब माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचे, देशाला सुरक्षित, समृद्ध, शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचे, आपल्या संस्कृतीची प्रगती करण्याचे आणि आपल्या देशाचा जागतिक पातळीवरील सन्मान वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पंतप्रधानांनी योजनांचा आकार आणि दर्जा बदलला, आजची धोरणे कुण्या एका व्यक्ती, गट, राज्य अथवा पक्षासाठी नसतात, तर ती फक्त देशहितासाठी असतात असा विश्वास जनमाणसांत रुजविला. जागतिक मंचावर पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे आघाडीचे पुरस्कर्ते झाले आहेत, योग दिनासाठी त्यांनी जगातील १७७ देशांची स्वीकृती मिळवली आणि योग संस्कृतीला तसेच आयुर्वेदाला जगासमोर मानाने स्थापित केले.एखाद्या गंभीर आव्हानाला संधींमध्ये परिवर्तित केले जाऊ शकते, ही क्षमता मोदींनी या काळात दाखवली. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकण्याचा अधिकार असेल, मजुरांसाठी एक राष्ट्र एक शिधापत्रिका व्यवस्था असेल, लघू व मध्यम उद्योगांची व्याख्या बदलणे असेल, किंवा मोठ्या प्रमाणावर भारताला विमानांची देखभाल, दुरुस्ती तसेच डागडुजीसाठीचे केंद्र म्हणून विकसित करणे असेल, असे सगळे निर्णय गेल्या एका वर्षांत घेण्यात आले आहेत; ज्यांचा प्रभाव पुढील दशकांमध्ये दिसायला लागेल. या आधीच्या सत्ताकाळात ‘एक पद-एक निवृत्तिवेतन’ या मुद्द्यावर त्यांनी तोडगा काढला होता व आता दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संरक्षण दलप्रमुख या मुद्द्यावर तोडगा काढला. भारताला सुरक्षेच्या दृष्टीने स्वावलंबी करण्यासाठी शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन, खासगी क्षेत्राच्या सहकार्याने बंदूक व रायफलींची निर्मिती, भारताच्या आयुध कारखान्याला व्यावसायिक दक्षतेचे स्वरूप देणे व या सगळ्यांबरोबरच आधुनिक राफेल लढाऊ विमानांची उपलब्धता तसेच भारतात निर्मित तेजस लढाऊ विमानाचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अभूतपूर्व निर्णय होते.

जनता जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवते, तेव्हा राजकीय व्यक्तीसाठी तो विश्वास धारण करणे एक मोठे आव्हान असते. म्हणूनच आज राजकारणात विश्वसनीयता एक आव्हान व आता काही प्रमाणात संकट बनले आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा २०१९ मध्ये दुसऱ्यांदा भाजपचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले, तेव्हा असे अनेक निर्णय घेण्यात आले, जे भाजपच्या वैचारिक अधिष्ठानाच्या विश्वासार्हतेचा आधार होते, त्यांना धाडस व दृढ निश्चयाची साथ देत मोदींनी ध्येयापर्यंत पोहोचवले. जनसंघाच्या काळापासून आतापर्यंत भाजपसाठी ही विश्वासार्हतेची कसोटी होती व त्या कसोटीवर शंभर टक्के खरे उतरले आहेत. गेल्या ८ वर्षांत नरेंद्र मोदी एकदाही आजारी न पडता सतत काम करत आहेत. मोदींकडून विविध कार्यक्रम, उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत, नोटाबंदी, उडान, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, उदय यांसारख्या योजनांबरोबरच नवे शैक्षणिक धोरण, स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ , जलजीवन मिशन, नमामि गंगे यांसारखे धोरणात्मक निर्णय राबविले. योगला आंतरराष्ट्रीय मान्यता देऊन २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास पहिल्यांदा भारतापासून सुरू करण्यात आली.तर बालाकोट सर्जिकल स्ट्राइक, व्हॅक्सिन डिप्लोमसी, भारत बांगलादेश सीमा करार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असे निर्णय घेत रणनीतीक निर्णयातून आपली समर्थता दाखवून दिली. देशाला वेगळा विचार आणि कार्यक्रम घेऊन आलेला, लोकांशी थेट संवाद साधणारा आणि कारभारात पारदर्शकता आणणारा पंतप्रधान म्हणून संपूर्ण विश्वातील लोक त्यांच्याकडे बघत आहेत, याचे कारण केवळ आणि केवळ त्यांची राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यपरायणता व शुद्ध हेतू हेच म्हणावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -