Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीगाळ उपसा केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा, टाकाऊ वस्तू टाकू नये

गाळ उपसा केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा, टाकाऊ वस्तू टाकू नये

महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई : गाळ उपसा केलेल्या आणि तरंगता कचरा काढलेल्या नदी नाल्यांच्या ठिकाणी आजूबाजूच्या वसाहतींमधून कचरा तसेच टाकाऊ वस्तू टाकून देण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यातून प्रशासनाला वारंवार त्याच ठिकाणी तरंगता कचरा काढण्यासाठी यंत्रणा खर्च करावी लागते. तसेच स्वच्छता केल्यानंतरही नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकून दिल्याने अकारण महानगरपालिका प्रशासनावर त्याचे खापर फोडले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारचा कचरा आणि मोठ्या आकाराच्या अवजड वस्तू नदी नाल्यांमध्ये अडकून जोरदार पावसाच्यावेळी पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. अशा घटना टाळण्यासाठी मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करुन गाळ उपसा केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा तसेच वस्तू टाकू नयेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेकडून मुंबईतील लहान मोठे नाले, नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण करावीत, जिथे गाळ उपशाची कामे पूर्ण झाली असतील तेथील मनुष्यबळ आणि संयंत्रे आवश्यक त्या ठिकाणी न्यावीत, असे निर्देश अति. पालिका आयुक्त अश्विनी जोशी तसेच अति. पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करताना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, मुंबई शहराच्या नद्या-नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे.

या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ते निर्देश देण्याच्या दृष्टीने अति. पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी शहर विभागात, तर अति. पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली.

डॉ. जोशी यांनी एफ दक्षिण विभागातील प्रतीक्षा नगर बस डेपो कंपाऊंड नाला, जे. के. केमिकल नाला, शास्त्रीनगर नाला, डब्ल्यूटीटी नाला या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर जी उत्तर विभागात शीव रुग्णालय परिसरातील रावळी नाला, दादर धारावी नाला, राजीव गांधी नगर नाला, राजीव गांधी नगर, लूप रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे देखील प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

त्याचप्रमाणे विविध ठिकाणी मलनिःसारण, पर्जन्य जल आदी वाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी लावलेल्या प्रतिबंधक जाळी तसेच झाकणांची देखील पाहणी केली. आवश्यक त्या सर्व ठिकाणी मनुष्य प्रवेशिकांवर जाळी आणि झाकणे लावण्याची कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांसह रस्ते कामांनाही वेग आला असून अभिजीत बांगर यांनी पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यातून गाळ काढण्याच्या तसेच रस्ते कामांचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.

बांगर यांनी पूर्व उपनगरातील पीएमजीपी नाला, देवनार नाला, मिठी नदीचा बक्षीसिंग कंपाऊंड येथील परिसर, पश्चिम उपनगरातील एसएनडीटी नाला लिडो टॉवर, मीलन भूयारी मार्ग तसेच अंधेरी भूयारी मार्ग येथे जाऊन गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. नाल्यातून गाळ काढण्याचे काम वेगाने करून कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही बांगर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -