Wednesday, May 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजDeath : मृत्यू : आत्महत्या की अपघात की आत्मत्याग?

Death : मृत्यू : आत्महत्या की अपघात की आत्मत्याग?

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

नैसर्गिक मृत्यू तर सर्वच जीवांचा होतो. त्यात विशेष काहीच नाही. परमेश्वरी शक्तीने प्रत्येक जीवाची निर्मिती ही निसर्गमय पंचतत्त्वात विलिन होण्याचीच केली आहे. या निसर्गाचे रहस्य हे न उलगडणारे आहे. त्यातीलच पक्ष्यांचा मृत्यू हे सुद्धा एक आहे. अनेक पक्ष्यांचा मृत्यू हा नैसर्गिक होतच असतो. पण आज किती पक्ष्यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे? आत्महत्या की अपघात की आत्मत्याग? आज अशा अनेक घटना आहेत की, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पक्षी झुंडीने मरताना दिसतात ज्यांना आपण आत्महत्या म्हणतो. पण खरंच का?

आसाम हे एक सृष्टीसौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याबरोबरच दक्षिण आसाममधील दिमाहासा जिल्ह्यातील पर्वत घाट येथील एक गाव “जटिंगा” जे अत्यंत रहस्यमय आहे. येथील “जटिंगा व्हॅली” ही दरी अत्यंत सृष्टीसौंदर्याने परिपूर्ण अशी आहे. चारही बाजूने डोंगर, भरपूर वृक्षसंपदा. जणू काही रत्न-मोत्यांची (फळा-फुलांची) कशीदाकाम केलेली हिरवीगार मखमली चादर ओढून घेतलेला हा घाट धुक्यांमध्ये लपेटला गेलेला दिसतो. जरी जटिंगा व्हॅली ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असेल तरीपण ही दरी अत्यंत रहस्यमय आणि कुप्रसिद्ध आहे ती पक्ष्यांची आत्महत्या यामुळेच. खरंच का सारं जग यांच्या आत्महत्या पाहायला येथे येतं? वाईट वाटतं! पण मला या आत्महत्या नाही, तर त्यांच्या निरागस भोळसटपणामुळे झालेला अपघात, आत्मत्यागच वाटतो. सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणजेच कृष्णपक्ष या काळात संध्याकाळी सात ते दहा दरम्यान या घटना खूप वाढतात. वैज्ञानिकांच्या तर्कानुसार हे पक्षी उडतात आणि दरीत, कपारीत, झाडे, दगड यांवर आपटून मरतात किंवा जखमी होतात. पण मीही एक सृष्टीसंशोधक असल्यामुळे माझ्या मते झाडांवर तिन्ही सांजेनंतर म्हणजे सातनंतर विश्राम करायला बसलेले पक्षी का बरं उडतात? मूळ सुरुवात इथूनच आहे. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का? की, तिन्ही सांजेनंतर हवेत एकदम बदल होतो आणि जिथे तीव्र हवा असेल, तिथे एक विशिष्ट ध्वनी निर्मित होतो. एक तर सर्व पक्षी सातनंतर झाडांवर स्थिर होऊन झोपतातच. पण घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे नाजूक जीव घाबरतो. हे पक्षी झाडांवर विश्राम करू शकतील याच्या शोधात एकंदरीत वातावरणामुळे, अंधारामुळे, धुक्यांमुळे आणि मनातील भीती यांमुळे ते सैरावैरा धावतात म्हणजे उडतात आणि शेवटी त्यांची दिशाभूल होऊन मगच ते या झाडांवर, कपारींवर आपटून हा अपघाती मृत्यू होतो.

नुकतेच रोममध्ये अचानकपणे रात्री साडेदहाच्या सुमारास अनेक पक्षी एकत्र येऊन रस्त्यावर मरून पडलेत. याचे कारण इलेक्ट्रिक वायरी आणि अचानक त्यांना झालेला रक्तस्त्राव असे सांगण्यात आले; परंतु हे पक्षी उडालेच का? अगदी जटिंगासारखीच इथे स्थिती झाली असावी. तसं म्हटलं तर पक्षी थोडेसे घाबरटही असतात. म्हणजे एक उडाला की त्याच्यामागे सर्व उडतात आणि असुरक्षिततेची जराही जाणीव झाली की पक्षी एकमेकांशी ताबडतोब संवाद साधतात आणि कोणताही विचार न करता लगेच ॲक्शन घेतात.

बऱ्याचदा वादळामध्ये सुद्धा जोरदार वाऱ्यामुळे हे नाजूक पक्षी एकत्र येऊन एका ठिकाणी कुठेतरी मरून पडतात. दुसरे कारण खिडक्यांच्या काचा आरशासारख्या असतात. त्या बिचाऱ्यांना ते समजतच नाही. जर त्या काचेसमोर नैसर्गिक रचना असतील, तर काचेत पण त्याच प्रतिबिंब दिसतं आणि मग हा पक्षी तिकडे आकर्षित होऊन त्या दिशेने उडतो आणि काचेवर आपटतो. मग हे पक्षी जखमी होऊन मरतात.
टिटोनी पक्षी चिमणीपेक्षा खूप लहान असतो. जेव्हा त्याला स्पर्श होतो, तेव्हा त्याची धडधड खूपच वाढते. त्याचे स्नायू आखडायला लागतात. थोडक्यात काय तर आपल्याला घाबरून त्याला हार्टअटॅक येतो. त्यामुळे लहान पक्ष्यांना कधीच गरज नसेल, तर स्पर्श करू नये. मी बऱ्याचदा पाहिलंय काही पक्ष्यांमध्ये मानवाला स्पर्श केल्यावर त्या पक्ष्याला इतर पक्षीसुद्धा स्वीकारत नाहीत. चोचीने टोचून टोचून त्याला मारून टाकतात. बहुतेक मानवाचा त्यांना वास स्वीकारार्ह नसावा. जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाला निसर्गाचे ज्ञान आहे. या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे उपाय नैसर्गिकरीत्या स्वतःच केलेत. त्या बिचाऱ्या पशु-पक्ष्यांना आणि कीटकांना प्रदूषणामुळे अन्न मिळत नाही, तिथे नैसर्गिक औषधं काय मिळतील?

पूर्वीच्या काळी आपल्याला किती तरी चिमण्या, कावळे, कबुतर दिसायचे; परंतु आता दिसतात का? सर्व विश्वात असलेले शहरातील पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचे कारण आपणच आहोत. आपण केलेल्या ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणामुळे यांची संख्या कमी झाली. सेल फोन टॉवरची वाढती संख्या. टॉवरमधून येणाऱ्या (रेडिएशन) किरणांमुळे अंडी व पिल्ले यांच्यावर परिणाम होतात. आपल्या प्रगती प्रकल्पांमुळे त्यांना अनेक आजारनिर्मिती झाली. बर्ड फ्ल्यू, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजार आपल्याला माहीतच आहेत. मुळात प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम झाला. नर आणि मादी दोघेही कमकुवत झाले. साहजिकच हा परिणाम पिल्लांवरही झाला. पक्षी मादीला बाळंतपणात पिल्लांना जन्म देताना खूप त्रास होतो, पिल्लं विकृत आणि कमजोर होत आहेत. जर पिल्लच जगली नाहीत, तर पक्ष्यांची संख्या वाढणार कशी? वृक्षतोडीमुळे त्यांना सकस आहार मिळत नाही. त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता सुद्धा कमी झाली.

आजच्या काळात वायू गुणवत्ता मापन केले, तर कितीतरी प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांना अॅटॅक येण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढले. मानवाची बुद्धी दुष्ट प्रवृत्तीच्या प्रगती प्रकल्पांची झाली आहे. प्रगती प्रकल्पांच्या नावाखाली सतत होणारी वृक्षतोड, हायव्होल्टेज मोबाइल टॉवर सिस्टीम आपले हृदय कमजोर करीत आहेत, तर त्या पशु-पक्ष्यांची अवस्था काय होत असेल? आपण तरी डॉक्टरांकडे जाऊन उपाय करतो. पण निसर्गच कमजोर केल्यामुळे या पशु-पक्ष्यांनी जायचं कुठे? जर मानवालाच त्याचेच प्रदूषणप्रकल्प प्रभावित करतात, तर बिचाऱ्या नाजुकशा पक्ष्यांचं काय? मानवाची बुद्धी दुष्ट प्रवृत्तीच्या प्रगती प्रकल्पांची झाली आहे. कारण निसर्गाची अपरिमित हानी ही त्यांच्या स्वार्थापोटी केल्यामुळे निसर्गातील बदल प्रत्येक जीवसृष्टीतील घटकाला गुदमरून मारणारा आहे.

पक्ष्यांनी कुठेतरी जाऊन धडकणे ही गोष्ट नेहमीचीच आहे. कारण पक्ष्यांची दृष्टी कितीही तीक्ष्ण असली तरी मानवाच्या करामती बिचाऱ्यांना माहीतच नाही ना! म्हणजेच मानव कायम स्वतःच्या स्वार्थासाठी जे काही प्रगती प्रकल्प करत आहे ते त्याच्यासाठी फायद्याचे असले तरी निसर्गासाठी धोक्याचेच आहेत. पक्षी हे हुशार असले तरी मानवी कर्माची त्यांना जाणीवच नाही. म्हणूनच शहरातील पक्षी कधी खिडकीच्या काचांवर आपटून, पाण्याच्या टाकीत पडून किंवा विशिष्ट ध्वनी उजेड यांना पाहून त्यांना दिशा न समजल्याने भरकटत जाऊन त्यांचा अपघात होतो.

जेव्हा पक्षी मरतात आणि त्याचे कारण आपल्याला समजत नाही, तेव्हा आपल्याला खोलवर जाऊन संशोधन करावंच लागेल. नैसर्गिक रचना सुद्धा आपल्याला समजून घेतलीच पाहिजे. एकाच वेळेला पक्षी झुंडीने मरतात, तेव्हा त्याची अनेक कारणे असतात. मी थोडक्यात सांगते. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, आजूबाजूची परिस्थिती, अन्नामुळे झालेला विषप्रयोग, अन्न न मिळाल्यामुळे असलेला भूकबळी, नैसर्गिक आणि निर्मित त्यांचे आजार, वृक्षतोड, उंच इमारती, कारखाने, विषारी खते, शिकार.

एक भवितव्यातली चिंता मी व्यक्त करीत आहे. जेव्हा सर्व पक्षी मरण्याची ही संख्या वाढेल, तेव्हा पशु मरायला लागतील आणि त्याचबरोबर मानवसुद्धा. याचे कारण हवेतील ऑक्सिजन लेव्हल ही अचानकपणे कमी होऊन जाईल. इतकी की आपल्याला उपाय करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. आत्ता ही प्रक्रिया चालू आहे. पण ती कोणाच्या किती निदर्शनास आली माहीत नाही. पण भवितव्यातला हा धोका आहे. आता तो धोका सुरू झालेलाच आहे. याचे कारण हार्टअॅटॅक येण्याच्या संख्या आता वाढायला लागल्यात. कालांतराने रक्तप्रवाहात अडथळा येऊन अनेक आजार होऊ लागतील, शरीरात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ लागेल, श्वास घेण्याची प्रक्रिया अचानक थांबेल. याचे मूळ कारण निसर्ग (पर्यावरण) यांचे असंतुलन. ही सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. हे आपल्या सर्वांनाच भोगावे लागेल. जर मानवाला थोडी जरी दयामाया असेल आणि स्वतःच्या भवितव्याची जाणीव असेल, तर तो शांत डोक्याने या प्रगती प्रकल्पांची दिशा बदलेल आणि ही बदलावीच लागेल.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -