Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजाणता राजा...

जाणता राजा…

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी!

अद्वितीय, अलौकिक असा प्रजाहितदक्ष राजा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती भूपती दलपती हिंदवी स्वराज्य प्रतिपालक क्षत्रिय धर्मरक्षक छत्रपती शिवराय हे आमचे आराध्यदैवत. स्वराज्य हे सुराज्य व्हावं प्रजाहितदक्ष दीनदुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा, स्त्रियांचा आदर यासाठी विशेषतः ज्या देवाचे मनामनांत, घराघरांमध्ये शिवराय म्हणून पूजन केले जाते, वंदन केले जाते. असे साऱ्या जगभर लोकप्रिय राजे, ज्यांच्यात असणारे विशेष गुण ऊर्जा, क्षमता, वेळ, साधनसामग्री, कृतिशीलता, विवेक, संयम, उत्साह, सावधता, धाडस, धैर्य, शौर्य, औदार्य, संघर्ष, चिकाटी, आत्मविश्वास, निर्णय, शक्ती, रणनिश्चिती, विस्ताराची रणनीती, समाजाभिमुख विकासाकडे वेगाने वाटचाल, अपयशातून धडा, नियोजनपूर्व माहिती, तयारी, प्रतिकूलतेतही यश, स्वप्नांना सत्यात साकारणे, गनिमी कावा, स्वयंशिस्त, सकारात्मकता, जिद्द, चिकाटी, हिंमत, चारित्र्य, वैचारिक, प्रगल्भता, अजिंक्य, संग्राम, सतर्कता, सजगता, संवेदनशीलता, विज्ञाननिष्ठ, तत्त्वनिष्ठ, स्वबळ, समानता, ऐक्य असे सर्व गुण राजांच्या ठायी होते. राजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला ईश्वरी अधिष्ठानसुद्धा आहे. हे शुभकार्य कोटकिल्ले मंदिरे व ती मांगल्यता जपण्यासाठी प्रति किल्ल्यावर शंभू महादेव आणि विठ्ठलाचे मंदिर आहे. तेव्हाही नित्यसैनिकांना आपण घेतलेल्या स्वराज्याची शपथ स्मरण देत दिशादर्शन करणारी ही मंदिरे चिरकाल आहेत.

आणखी एक आठवण सांगावीशी वाटते, राजमाता जिजाऊ या छत्रपतींच्या पहिल्या गुरू. त्यांनी छत्रपतींच्या आपल्या राजमुद्रेची सुरुवात असणारी अक्षरे प्रतिपश्चंद्रलेखेव. कपाळावर चंद्रकोर करायची. आपल्या राजमुद्रेचा भाग जो पूर्णत्वाचा प्रतीक आहे. तो विश्ववंदिता हा शब्द लक्षात राहावा म्हणून आपली रयत आणि सैनिक यांनी कपाळावर चंदनाचा गंधगोळीचा गोल पूर्ण कोरावा. असा चंद्र स्वराज्याची सुरुवात ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे की शून्यातून करायची आणि शेवटी ते स्वराज्य विश्वबंधुता म्हणजे जगनमान्य होईल. अशा स्वरूपाचे पूर्णत्वाला नेण्याचे प्रतीक म्हणून गोल चंद्र पौर्णिमेचा चंद्र याची आठवण म्हणून कपाळावर टिळा लावायचा. रयत आणि सैनिक सर्वांनी स्वराज्यासाठी सहभाग मोलाचा ठरला. छत्रपतींनी मंदिराचा कळस, अंगणीची तुळस कधीच उद्ध्वस्त होऊ दिली नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठा धर्म वाढविला. सर्वांगीण विकासातून स्वराज्याचे मंगल तोरण बांधून परकीयांचा डाव उधळून लावला. गनिमी काव्याने प्रसंगी शक्तीयुक्तीने डावपेच वार झेलले. अजिंक्य ठरले, कधीच हार मानली नाही.

छत्रपतींची दुसरी महत्त्वाची आठवण म्हणजे मोरोपिसांची, या माय-लेकरांची… ध्येयप्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी माँसाहेब मोरपीस सर्वोच्च मानबिंदू मानीत. राजेंनी विचारले असता माँसाहेब म्हणतात, “राजे मोरपीस हे यशोदामैयाने लाडक्या श्रीकृष्णास सदैव मुकुटात धारण करण्यास लावले कारण, हे राजेपणाचे लक्षण. मोर हा पक्ष्यांचा राजा असे तुम्ही रयतेचे राजे आहात. मोर सापाला खातो तुम्हीही रयतेच्या अन्यायाला कारणीभूत दृष्ट साप संपवावेत.” मोरपिसाचा असा प्रबोधनात्मक संदेश आपल्या सर्वांना यातून मिळतो.

ऐक्य भावनेची गोष्ट : रयतेत सर्वांनी एकत्र येऊन आपापली जबाबदारी नेमून दिलेले काम करावे. ते कार्य करत असताना स्वतः स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. यासाठी स्वराज्यप्रेरिका माँसाहेब छत्रपतींस विश्वबंधुत्वाची शिकवण देताना सुंदर उदाहरण देतात आणि ते प्रेरणादायी ठरते. जसे वर टांगलेल्या शिक्क्यावर लोणी प्राप्त करण्यासाठी एकावर एक दहीहंडी उभारायची. ध्येयप्राप्तीसाठी स्वराज्याचे मंगल तोरण बांधण्यासाठी एकमेकांच्या साथीने जातीभेदाला मूठमाती देऊनच ऐक्याची आणि ध्येयरूपी स्वराज्य निर्मितीची ऐक्यसंगत समानता प्रस्थापित केली. व्यवस्थापक ते कर्मचारी आणि ग्राहक सर्वांना बरोबर घेऊन वेगाने प्रगतिपथावर नेत सर्वात महत्त्वाचे रयतेस लाभ व्हावा ही महत्त्वाची गोष्ट. रयतेचे राजे आणि शत्रूचा कर्दनकाळ अशा छत्रपती शिवरायांना शतशः मानवंदना.

आजच्या युवा पिढीने, तरुणाईने शिवरायांचे आदर्श, शौर्य, धैर्य अंगीकारले पाहिजे. राज्य व्यवस्थापनाचे धडे यांचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. शिवजयंती उत्सव आपण दिमाखात साजरा करतो. पण केवळ वाद्यांचा गजर नको, तर छत्रपतींच्या विचारांचा जागर व्हायला हवा, हीच खरी त्यांना मानवंदना…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -