Wednesday, June 26, 2024

मोतीबिंदू

माणसांच्या दृष्टीस खरंच नैसर्गिकपणे डोळ्यात निर्माण होणारा मोतीबिंदू कारणीभूत असतोच, असे नाही. आपल्याला विचार करण्याच्या पद्धतीमुळे वाटू लागते. त्यामुळेच ‘दृष्टी तशी सृष्टी’ असे म्हटले जाते.

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर आईकडे गेले. आईला म्हणाले की, “अगं आपण घराला तुझ्या रंग लावून घेऊया का, हा पिवळा रंग आता काळपट वाटायला लागलाय.”

“माझी बाई तर आठवड्याला जाळ्या काढते.” “जाळ्या आहेत असं कुठे म्हटलं गं आई, मी तुला म्हटलं की, रंग आता काळपट वाटायला लागलाय.” हा संवाद अधूनमधून वर्षभर चालू होता आणि आई नेहमी वेगवेगळी कारणं द्यायची. वेगळेच बोलायची. एकंदरीत काही गरज नाही, असे तिला वाटायचे.

काही दिवसांनी तिला डोळ्यांच्या डॉक्टरकडे डोळे तपासण्यासाठी नेले. मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रथेनुसार एकावेळेस एकाच डोळ्याचे ऑपरेशन करतात आणि आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या डोळ्याचे. त्याप्रमाणे आम्ही तिच्या एका डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. त्यानंतर ती आठवडाभर माझ्याच घरी राहायला होती. मग मी तिला सोडायला घरी गेले, कारण आठवडाभरानंतर पुढच्या डोळ्याचे ऑपरेशन होते. घरात छोटी-मोठी कामं करत, ती बाहेर हॉलमध्ये आली. मी मोबाइल स्क्रोल करत होते. मला उत्स्फूर्तपणे म्हणाली की, “तुला वाटत नाही की, घराला एखादा हात रंगाचा लावावा म्हणून…” मी हसले.

“अगं हसू नकोस. बघ… आता दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन आहे ना, तेव्हा मी तुझ्या घरी असेन, तेव्हा एखादा पेंटर पाठवून, माझ्या घराचं पेंटिंग करून टाक म्हणजे रंगाचाही मला त्रास होणार नाही.”

मी हसले आणि म्हणाले, “आई तुझ्या एकाच डोळ्याचे ऑपरेशन झाले, तर इतका फरक पडला आहे. हा फरक दृष्टीमध्ये पडला की, मानसिकतेत माहीत नाही. माणसाला स्वतःच्या दृष्टीस जे पडते, त्यावरच पूर्ण विश्वास ठेवून, त्याप्रमाणे निर्णय घ्यायची सवय असते. ‘दृष्टीआड सृष्टी’ म्हणूनच म्हटले जाते. माझ्या दृष्टीस जे पडत होते, त्याच्यावर तिचा फारसा विश्वास नव्हता, तर तिच्या दृष्टीस जेव्हा तो काळपटपणा पडला, तेव्हा तिला रंग लावण्याची आवश्यकता जाणवली.

मी ‘हो’ म्हटले. मनातल्या मनात हसले. अजून तर तिच्या एकाच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. जेव्हा दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन येईल, तेव्हा तिला आणखी काय काय ठळकपणे दिसेल, माहीत नाही. आई दृष्टीने तरी तरुण झाली, याचे बरेच वाटले!

आता गोष्ट मोतीबिंदूचीच आहे, तर सांगायला काहीच हरकत नाही की, माणसांना मोतीबिंदू झाल्यावर स्पष्ट दिसत नाही. भिंत दिसते, पण भिंतीवरचा रंग स्पष्ट दिसत नाही किंवा ओटा दिसतो; परंतु ओट्याला पडलेल्या भेगा दिसत नाहीत. आणखी काही काही. त्यामुळे मोतीबिंदू काढल्यावर त्यांच्या दृष्टीत खरंच फरक पडतो, हे मी आईच्या उदाहरणावरून निश्चितपणे सांगू शकते. माणसांच्या दृष्टीस खरंच नैसर्गिकपणे डोळ्यात निर्माण होणारा मोतीबिंदू कारणीभूत असतोच, असे नाही. कधी कधी तो नसूनही त्यांची मानसिकता अशी काही असते की, जणू त्यांना मोतीबिंदूच झालेला आहे, असे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे वाटू लागते. त्यामुळेच ‘दृष्टी तशी सृष्टी’ असे म्हटले जाते. त्यामुळे मोतीबिंदू झाल्यासारखे जग न्याहाळू नका, तर मोतीबिंदू होऊनसुद्धा दुसऱ्यांच्या स्वच्छ दृष्टीतून कधीतरी जग न्याहाळून पाहा.

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -